व्यक्तिचित्रण, सौजन्य –
पोलीस हवालदार, सिक्युरिटी गार्ड, इस्त्रीवाला अशी कामं करणाऱ्या नागराज मंजुळेची आजच्या घडीची ओळख आहे ती पिस्तुल्या, फॅण्ड्रीसारख्या पुरस्कारप्राप्त चित्रपटांचा दिग्दर्शक अशी. त्याच्या या प्रवासाचे साक्षीदार ठरलेल्या त्याच्या सुहृदाने रेखाटलेले नागराजचे व्यक्तिचित्र-
अवघा दहा-बारा वर्षांचा असताना कोऱ्या करकरीत देशी दारूची चव त्याने चाखली.
त्याच वयात पोटफाडीच्या रूममध्ये मृत स्त्रीदेहासोबत चाललेले ओंगळवाणे प्रकार त्याने पाहिले.
पैशाची सुगी अनुभवली आणि गरिबीचे चटकेही.!
शाळा कशीबशी सुरूच होती, पण दहावीच्या उंबरठय़ावर गणिताचे माप ओलांडताना त्याचा जीव मेटाकुटीस आला.
पण कोणत्याच उंबरठय़ात अडकायचा त्याचा स्वभाव नव्हता आणि आजही नाही.
सारं निळंशार आभाळ मुठीत घेऊ पाहणाऱ्या जिवाला कसल्या भिंती, कसल्या चौकटी आणि कसले उंबरे!
पण..
तो आरशात पाहत होता आणि आपलं काळं, येडंइद्र रूपडं त्याला डाचत होतं.
त्याला आपलं खरं रूप दावणारा आरसा अजून गवसायचा होता, तेव्हाची गोष्ट.!
‘तो राजहंस एक!’ हे सांगणारा आत्मसाक्षात्कारी क्षण अजून उगवायचा होता.
विशी-पंचविशीत तो महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाला. का कोण जाणे, आतली घुसमट थांबत नव्हती.. जीव कुठंच लागत नव्हता.. आपण कदाचित जगायलाच नालायक असू. मन स्वत:लाच कुरतडत होतं.. काही महिन्यांतच आपली ट्रंक, बाडबिस्तारा गुंडाळून आणि सोन्यासारख्या नोकरीला राम राम ठोकून त्यानं गाव गाठलं.. घरीदारी नोकरी गमावली म्हणून पोटभर शिव्या खाल्ल्या..
गरज पडली तेव्हा सिक्युरिटी गार्डची नोकरीही केली, इस्त्रीचे दुकानही चालविले..
‘जहां नहीं चैना, वहां नहीं रहना’ असं म्हणत चालणं सोपं असतं, पण ते समाधानाचं, संतुष्टीचं स्टेशन गाठणं, मुख्य म्हणजे, स्टेशन आलेलं कळणं महाकठीण..!
अशाच वाटचालीत तो मला भेटला..
त्याची माझी पहिली भेट कधी झाली, मी आठवू लागतो.
खरंतर तो मला पहिला भेटला ‘संचार’ नावाच्या एका छोटय़ा स्थानिक वर्तमानापत्रातून..! मला आठवते, २००१-०२ च्या आसपासची गोष्ट असावी. ‘संचार’मधल्या एका छोटय़ा बातमीचा मथळा होता- ‘जेऊरच्या काव्यस्पर्धेत नागराज मंजुळे प्रथम..’ कवितेच्या क्षेत्रात एवढं रस्टिक नाव ऐकायची माझ्या मध्यमवर्गीय अभिरुचीला सवय नव्हती. मी मनाशीच हसलो आणि म्हणालो, ‘जेऊरच्या सोकॉल्ड महाविद्यालयाची काव्यस्पर्धा..! मग त्यात नागराज मंजुळे काय आणि कुणी काय.. चालायचंच!’ त्याची कविता अजून माझ्या कानावर पडायची होती आणि तोही योग लवकरच आला..!

‘कविता लिहिण्याची प्रक्रिया ही विहिरीत श्वास रोखून बुडी मारून तळचा दगड आणण्यासारखी दमछाक करणारी आहे,’ असे नागराज नेहमी म्हणतो

कुर्डूवाडीला माझे सर्जन मित्र डॉ. दिनेश कदम दरवर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य पुरस्कार देत. एके वर्षी या कार्यक्रमाला नारायण सुर्वे आले होते. आम्ही आजूबाजूचे सारे साहित्यिक, साहित्यरसिक या कार्यक्रमाला हजर होतो. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर रात्री उपस्थितांचे काव्यसंमेलन सुरू झाले. मी कोणती कविता वाचली ते आठवत नाही, पण माझ्या काव्यवाचनानंतर सूत्रसंचालन करणाऱ्या राजेंद्र दास यांनी पुढील नाव पुकारले- ‘नागराज मंजुळे.’ त्याचा परिचय करून देताना दास सर काय म्हणाले, हे मला आज आठवत नाही, पण मी उत्सुकतेने पाहू लागलो. एक उंचेला, शिडशिडीत, धारदार नाकाचा सावळा तरुण पुढे आला आणि आपल्या धीरगंभीर आवाजात कविता म्हणू लागला,
‘पावसालाही आवडावी
इतकी ती सुंदर होती..
म्हणूनच की काय
वेळी अवेळी
रस्त्याने येता जाता
पाऊस तिची वाट अडवायचा
पावसाला चुकवून
ती घर गाठायची
पाऊस मागं मागं जाऊन
तिच्या घराच्या खिडकीसमोर
कोसळत राहायचा
तासन् तास…!’
कविता बरसू लागली, पावसाच्या अफलातून प्रतिमेतून उलगडत जाणारी ‘एका पावसाची गोष्ट’ त्याच्या आवाजात ऐकताना आपणच पावसात भिजतो आहोत असा भास मला झाला. पाऊस माझ्या डोळ्यांतून झरू लागला. या एका कवितेने, या एका क्षणाने आम्हा दोघांना आमच्या सनातन नात्याची आठवण करून दिली. कविसंमेलनानंतर आम्ही कधीतरी पहाटे घरी परतलो. जेऊर येईपर्यंत आम्ही बोलत होतो.. बॅकड्रॉपला पाऊस पडतोय असा भास सारखा होत होता. मध्यरात्र उलटून गेली होती आणि पूर्वेकडे लाली पसरूलागली होती. एका विलक्षण क्षणी नागराज आणि त्याचे शब्द मला भेटले होते.
आणि मग आम्ही भेटत राहिलो.
साहित्यात रमणारा दुसरा कोणी मित्र भेटला तरी नागराजचा विषय निघाला नाही असे कधी झाले नाही. अगदी नागपूरला यशवंत मनोहर भेटले तरी नागराजचा विषय होताच!
नागराज सोलापूर जिल्ह्य़ातील जेऊरचा.! करमाळ्यापासून १८-२० किलोमीटरवरील मध्य रेल्वेचे छोटे स्टेशन असलेले हे गाव आठ-दहा हजार लोकसंख्येचे..! रेल्वे लाइनला लागूनच वडार समाजाची काही घरं, नागराजचे घरही याच वस्तीत..!

प्रिय पिस्तुल्या,
वैशाख माखून पडलेल्या
धूळभरल्या वाटेवरले
काळे कातळ फोडताना  
कोणत्या गुर्जीनं शिकवली तुला
इतकी अचूक नेमबाजी
हृदयाच्या आरपार जाणारी!

अरे,
इथल्या प्रत्येक चार भिंतीच्या
चौकटीतल्या वर्गात
नांदतो आहे द्रोणाचार्य
वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या वेशात,
न दिलेल्या विद्येबद्दलही
एकलव्याचा अंगठा मागणारा!
तुझा अंगठा न मागता
तुझी झोळी भरणारा द्रोण
तुला कुठे भेटला रे पिस्तुल्या?

पण
आता आठवते,
तू नव्हतासच कधी
त्याच्या माझ्या वर्गात
तुझी जागा कायम,
शाळेच्या मैदानाच्या काटेरी कुंपणाबाहेर!
अनेक वेळा दुर्लक्षिले आहेत आम्ही
तारेच्या कुंपणाने रक्ताळलेले तुझे डोळे.!
उखणलेल्या रस्त्यासारखे
नजरेआड केले आहेत वेळोवेळी
तुझ्या पोटाला पडलेले जीवघणे खड्डे.!

मला सांग पिस्तुल्या,
या इतभर दर्यात उसळणाऱ्या आगीनेच
तुला दिली का रे ठिणगी
हा चौसोपी वाडा भस्मसात करण्यासाठी!

आज बघ,
तुझ्या एका नेमक्या उठावासरशी
जमीनदोस्त झाल्या आहेत
साऱ्या काळ्याकभिन्न भिंती
पाचोळ्यासारखी उडून गेली आहेत
सारी काटेरी कुंपणे!

तुझ्या रक्ताळलेल्या डोळ्यांत आता बुद्ध हसतो आहे
त्या धूळभरल्या रस्त्यावरील प्रत्येक पाऊलचिन्हातून
नवा बोधिवृक्ष फुटतो आहे!
काल आवसेचं आभाळ पांघरून झोपलेल्या वस्तीतून
अंधाराच्या कुशीतून
 नवा सूर्य उगवतो आहे.!

– प्रदीप आवटे.
(नागराजच्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यावेळी लिहिलेली कविता.)

आप्पा, भारत, नागराज आणि भूषण ही चार भावंडे..! आप्पा गवंडी काम करतो. ‘फॅण्ड्री’तील जब्याचे घर त्यानेच तर उभारले आहे. भारत आणि भूषण ही दोन्ही भावंडे पोलीस खात्यात..! वडार समाजात दगड फोडणाऱ्या आई-बापांच्या पोटी जन्माला आलेल्या नागराजच्या जगण्याची चित्तरकथा ‘उचल्या’, ‘उपरा’ आणि ‘बलुतं’चा पुढचा अध्याय आहे.
लहान असतानाच नागराज आपल्या चुलत्यांना दत्तक गेला म्हणून त्याचं बरंचसं बालपण करमाळ्याला गेलं. या दत्तक जाण्याचा काही परिणाम त्याच्या एकूणच मानसिक जडणघडणीवर झाला असावा. ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ या म्हणीप्रमाणे त्याची जी भावनिक उपासमार या कोवळ्या वयात झाली त्याचे व्रण त्याच्या कवितेत आणि चित्रकृतीतही दिसतात. घर आणि समाज या दोन्ही पातळींवर आलेला भावनिक एकाकीपणा या संवेदनशील मनाला कासावीस करत होता, हे मला त्याच्या प्रत्येक भेटीत जाणवत होते. ‘कविता लिहिण्याची प्रक्रिया ही विहिरीत श्वास रोखून बुडी मारून तळचा दगड आणण्यासारखी दमछाक करणारी आहे,’ असे नागराज नेहमी म्हणतो तेव्हा त्याच्या कवितेची सेंद्रियताच तो स्पष्ट करत असतो. जगतात, भोगतात अनेक जण; पण त्या जगण्याचा, भोगण्याचा नेमका तळ किती जणांना गवसतो? किती जणांना ही पुन:निर्मितीमधली दमछाक सोसते.
आपल्या कवितेची जगण्याची नाळ त्याने पुन:पुन्हा तपासून घेतली आहे, ती त्याच्या जगण्याची जणू पूर्वअटच आहे. कौटुंबिक अडचणी, नोकरी नाही, पैशाची चणचण अशा अवस्थेत कवितेची सोबत सोपी नव्हती. नागराज नेहमी गमतीने सांगतो, ‘‘माझी कविता छापलेली नियतकालिके नाना अभिमानाने पाहत, इतरांना दाखवत, पण आईने मात्र एकदाच मार्मिक प्रश्न विचारला, याचे किती पैसे मिळतात? बाभळीला झोके घेत घेत उपाशीपोटी झोपी गेलेली त्याची मलूल कविता पोट भरायचे साधन नव्हतीच, पण ती जगण्याचे विलक्षण इंधन देणारी होती आणि आहे. आणि म्हणूनच माझ्या समानधर्मी मित्राने आत्महत्या केली, मी मात्र कविता केली असे तो लिहितो तेव्हा कविता नेमका कशाचा पर्याय असते, जगण्याचा की मरण्याचा, असा तिरपागडा प्रश्न तो आपल्या उशाशी ठेवून जातो.
नागराज रूढार्थाने कोणत्याही चळवळीत नव्हता आणि नाही. पण त्याचे पुरोगामित्व त्याच्या जगण्यातून आणि त्याच्या चिंतनातून काळ्या वावरात उगवणाऱ्या धानासारखे आपसूक उगवले आहे. नागराजचे वडील नाना हा त्याच्या भावजीवनाचा विलक्षण हळवा कोपरा आहे. आयुष्याचं सारं वादळवारं सहजतेने अंगावर घेत असतानाही त्यांचं हसतमुख आणि जीवनाभिमुख असणं नागराजला आजही वाट दाखवीत राहतं. पण असे नाना गेले तेव्हा त्याने धर्मसंस्काराप्रमाणे केस कमी करण्यास नकार दिला. घरचेदारचे त्याची मनधरणी करू लागले, अखेरीस एक बट कापली तरी चालेल इथवर सारे आले, पण हा बधला नाही. गावगाडय़ातील जातपात, शिवताशिवत आणि देवभोळेपणा या साऱ्यांचा प्रचंड तिटकारा त्याला त्याच्या जीवनानुभवातून आला आहे. बंदुकीच्या गरम धूर ओकणाऱ्या नळ्यांपेक्षा माणसं देवादिकांच्या तसबिरींना अधिक घाबरतात, या तसबिरी त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजवितात, हे त्यानं पाहिलं आहे, अनुभवलं आहे.
माझ्या बौद्ध तत्त्वज्ञानावरील ‘धम्मधारा’ काव्यग्रंथाला मूर्त रूप मिळण्यामध्ये नागराज आणि कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. २००९-१० मध्ये जवळपास दर वीकेंडला नागराज, गार्गी, मिथुन, पूजा, कुतुब, प्रियांका, गणेश, निवास ही सारी मंडळी माझ्याकडे जमत आणि मग देर रात तक आमची मैफील रंगे. याच मैफिलीत मी कधीतरी माझ्या ‘धम्मधारा’तील रचना वाचून दाखविल्या. नागराजला त्या इतक्या आवडल्या की तो म्हणाला, ‘डॉक्टर, अहो, हे विचार, या रचना प्रत्येक घराघरापर्यंत जायला हव्यात. तुम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा.’ ‘धम्मधारा’चा देखणा प्रकाशन समारंभसुद्धा या मंडळींनी पार पाडला.

मनातला कोलाहल उपसण्यासाठी एक नवीनच साधन त्याच्या हातात आले होते. सिनेमाची भाषा, ही नवी चित्रलिपी त्याने लीलया आत्मसात केली.

पाच-सात वर्षांपूर्वी नानांचा मृत्यू झाला आणि नागराज खूप हलला. जगण्या-मरण्याच्या दोन ध्रुवांवर त्याचा लंबक झोके घेऊ  लागला. कौटुंबिक अडचणी, त्यात नानांचे जाणे यामुळे नागराज उदासीच्या प्रचंड भोवऱ्यात सापडला. भोक पडलेल्या रांजणात पाणी भरावे तसे दिवस जात होते. आशयशून्य, निर्थक..! सारेच संपवावे असे वाटणारे क्षण आले, पण मित्र ही नागराजचे मोठे भांडवल..! त्याचे शिक्षक असलेल्या संजय चौधरींपासून संजय साठे, राम पवार, संतोष झांजुर्णे, मिथुन चौधरी, हनुमंत लोखंडे, गणेश जसवंत असे एक ना अनेक. हे मित्र त्याच्यासोबत होते, आणि तो कुठेही असो कविता सोबत होतीच. त्याचदरम्यान त्याचा मित्र मिथुन चौधरीला नगर कॉलेजला मास कम्युनिकेशन विभागात लेक्चरर म्हणून नोकरी लागली. पुण्याबाहेरचे कॉलेज, त्यात मास कम्युनिकेशनसारखा विषय, विभागाला विद्यार्थी मिळावेत म्हणून मिथुन आणि मिथुनचे मित्रच आपल्या परिचितांना या कोर्सकरता अॅडमिशन घ्या म्हणून विनंती करू लागले. नागराजही आपल्या जवळच्या मित्रांना या कोर्ससाठी प्रेरित करू लागला. त्यातला कोणी तरी एक जण नागराजलाच म्हणाला, ‘‘अरे तू आम्हाला सांगतोयस, तू स्वत:च का घेत नाहीस प्रवेश या कोर्ससाठी?’’
नागराजने हा विचार तोवर केलाच नव्हता, पण मग सगळ्यांनीच आग्रह केला आणि नागराज मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी बनला. त्याचा मित्र मिथुनच त्याचा शिक्षक! सारं मोठय़ा अनौपचारिकरीत्या सुरू झालं आणि रेस्ट इज हिस्टरी! नागराजच्या हातात आता नवे साधन आले होते- कॅमेरा! दोन डोळ्यांत न मावणाऱ्या त्याच्या दु:खाला, त्याच्या अवघ्या जगण्याला सामावून घेण्यासाठी त्याला जणू तिसरा डोळा मिळाला होता. त्यानेच लिहिले आहे ना-
    माझ्या हाती
    नसती लेखणी
    तर
    तर असती छिन्नी
    सतार, बासरी
    अथवा कुंचला
    मी कशानेही उपसतच राहिलो असतो
    हा अतोनात कोलाहल मनातला!
आता हा कोलाहल उपसण्यासाठी एक नवीनच साधन त्याच्या हातात आले होते. सिनेमाची भाषा, नवी चित्रलिपी त्याने लीलया आत्मसात केली आणि कोर्सचा भाग म्हणून तयार केलेल्या ‘पिस्तुल्या’ या त्याच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्या हातातला कॅमेऱ्याला पोपटी पालवी फुटली, एक नवा दिग्दर्शक जन्माला आला आहे, हे त्यालाही उमगले होते. ‘फॅण्ड्री’ने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
नागराज प्रत्येक क्षण मनमुराद जगणारा आदिवासी आहे. त्याला मराठी साहित्य क्षेत्रातला मानाचा मानला जाणारा दमाणी पुरस्कार मिळाल्यावर मी त्याच्यासोबत जेऊरला गेलो होतो. जेऊरवासीयांनी आणि त्याच्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या त्याच्या मित्रांनी हलगी-ताशाच्या तालावर त्याची मस्त मिरवणूक रेल्वे फाटकापासून त्याच्या घरापर्यंत काढली होती. लॉन्ड्रीवाला, चहा टपरीवाला, फिटर, कापड दुकानदार त्याला येऊन हार घालत होते, फेटा बांधत होते, गावातील सानथोर हलगीवर नाचत होते. नागराजचीही पावले थिरकत होती. उद्या अनेकांना ज्ञानपीठही मिळेल, पण ही आपल्या माणसांची अशी उत्कट पोचपावती किती जणांना पावेल माहीत नाही. अत्यंत सटल पद्धतीने कवितेतून व्यक्त होणारा, आपल्या चित्रपटात कोणतीही लाऊड गोष्ट टाळणारा नागराज आणि आपल्यावर प्रेमाचा वर्षांव करणाऱ्या चाहत्यांसोबत रस्त्यावर हलगीच्या तालावर नाचणारा नागराज ही एकाच माणसाची दोन विलोभनीय रूपे आहेत.
नागराज दिग्दर्शक म्हणून किती मोठा आहे, हे येणारा काळ अधिकाधिक स्पष्ट करेलच, पण तितकेच त्याचे माणूसपणही उबदार आहे. ‘फॅण्ड्री’च्या शूटिंगच्या वेळी किशोर कदमसारख्या स्टार कलाकाराइतकीच केमहून आलेल्या हलगी वादकांची किंवा करमाळ्याहून आलेल्या वडार मंडळींची काळजी घेणारा नागराज आपल्यासोबतच्या प्रत्येकाची डिग्निटी जपणारा प्रतिभावंत आहे. चित्रपटातील कलाकारांसोबतचे त्याचे नाते केवळ कलाकृतीपुरते मर्यादित राहत नाही. ते त्याहून अधिक खोल, अधिक गहिरे आणि कलाकृतीतील आशयाला कृतिशील करणारे असते. ‘पिस्तुल्या’त त्याने पारधी समाजाच्या आणि पालावर राहणाऱ्या सूरज पवारला प्रमुख भूमिका दिली. सूरजने या भूमिकेसाठी राष्ट्रपती पदक पटकाविले, पण नागराज येथेच थांबत नाही. वडिलांच्या छत्रछायेशिवाय वाढणाऱ्या या सूरजच्या शिक्षणाची सोय तो पाहतो. आजही सूरज नागराजसोबत राहतो आहे. नव्या शहरी वातावरणात त्याने नीट जुळवून घ्यावे म्हणून नागराज आणि कंपनी त्याला पर्सनल कोचिंग देते आहे. जी गोष्ट सूरजची तीच ‘फॅण्ड्री’तील सोमनाथ अवघडेची!
नागराज कधी कधी मला अतीव प्रेमाने म्हणतो, ‘‘डॉक्टर, तुम्ही सावली देणारं झाड आहात.’’ स्तुती न आवडणाऱ्या जुलियस सीझरलाही आवडावं असं हे वाक्य! ‘मला माझं ठावं नाही नागराज.!  संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावर जळून.!’ ही आरती प्रभूंची ओळ मी मनाशी म्हणतो आणि तुझ्याकडे पाहतो. तुझ्या पारावर बघ किती मंडळी विसावलीत! नागराज बघ तरी खरं, किती मोठी झालीय तुझी सावली! तुला भीती होती
‘जाहिरातीच्या या बोलघेवडय़ा युगात
कोण ऐकेल माझ्या स्पंदनाची विराणी!’
आज तुझी विराणी नव्या युगाचे, नव्या मनूचे गाणे झाले आहे. तुझ्या प्रकाशाने उजळणाऱ्या पडद्यापुढे सारे डोळ्यांत प्राण आणून बसले आहेत. काळीज काढून ठेव बिनधास्त प्रत्येकाच्या तळहातावर!

Story img Loader