नागराज मंजुळेचं नाव घेतलं की डोळ्यासमोर त्याचे वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट डोळ्यासमोर येतात. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ हे त्याचे चारही चित्रपट तुफान गाजले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यातील ‘नाळ’ हा चित्रपट मराठीतील त्याचा आतापर्यंतचा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळेने चैत्या, देविका दफ्तरदार यांनी त्याची आई आणि नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचा शेवट बघता या कथानकामध्ये पुढे काय होईल असा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला होता. अखेर हे गुपित आता उलगडणार आहे.
आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ?
नागराज मंजुळेने एक पोस्ट शेअर ‘नाळ’चा पुढील भाग अर्थात ‘नाळ २’ची घोषणा केली आहे. नागराजने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये सुधाकर, नागराज, देविका आणि श्रीनिवास दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात? नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या ‘नाळ’ प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे! ‘नाळ २’च्या नावानं चांगभलं!”
हेही वाचा : ‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
नागराजच्या या पोस्टमुळे नेटकरी खुश असल्याचं दिसत आहे. या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे चाहते तसेच मनोरंजनसृष्टीतील अनेकजण त्याला शुभेच्छा देत आहे. हा चित्रपट कधी येणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. नुकतंच ‘नाळ 2’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे या कथानकात पुढे काय घडतं हे बघण्यासाठी प्रेक्षकांना आणखीन काही महिने वाट बघावी लागणार आहे.