घाबरलेल्या परिस्थितीत तुम्ही अनेकदा मिस्ड कॉल दिले असतील ना, पण आत्मविश्वासाने उत्तर माहितीये म्हणून कधी मिस्ड कॉल दिलाय का, असा प्रश्न आम्ही नाही तर दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळे विचारत आहेत. बुद्धीच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’चं नवीन पर्व तुम्हाला देणार आहे. विशेष म्हणजे नागराज मंजुळे याचं सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच सूत्रसंचालकाच्या चेहऱ्यावरून पडदा उचलण्यात आला होता. नागराज मंजुळे या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन करणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ११ मार्चपासून ‘कोण होणार करोडपती’चं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मिस्ड कॉल द्यावं लागणार आहे. त्याची माहिती या प्रोमोमध्ये देण्यात आली आहे.

‘कोण होणार करोडपती’चे हे तिसरे पर्व आहे. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले होते. तर दुसऱ्या पर्वात ती जबाबदारी स्वप्निल जोशीने पार पाडली होती. आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नागराज यांना प्रेक्षकांनी पाहिलं. आता सूत्रसंचालक म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाइफलाइन्स असतील हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Story img Loader