राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंग्यांच्या वादावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी भोंगे काढण्यासंदर्भात ३ मेचा अल्टिमेटम दिला असताना राज्य सरकारनं त्याला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मशिदींवरील भोंगे हा चर्चेचा विषय झाला आहे. नेहमी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देखील माध्यमांनी भोंग्यांच्या राजकारणाविषयी आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या वातावरणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
नागराज मंजुळे यांनी पुणे श्रमिक मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना भोंग्यावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी विचारणा केली गेली. त्यावर बोलाताना नागराज मंजुळे म्हणाले, “माझ्या उत्तराने काय होणार आहे? माझी मतं मी अनेक वेळा मांडतो. प्रेम हाच जगण्याचा मार्ग आहे. एकमेकांवर प्रेम करत रहावं. पण मी असं म्हटल्यावर देखील आपली भांडणं होतच राहणार आहेत”, असं नागराज मंजुळे म्हणाले.
“मी येडा आहे, काहीही म्हणेन”
यावेळी बोलताना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नागराज मंजुळे यांनी मिश्किल टिप्पणी देखील केली. “एक काळ होता जेव्हा बाबासाहेब लिहायचे, टिळक लिहायचे, आगरकर लिहायचे. त्यातून काहीतरी दिशा मिळायची. पण आता तुम्ही माझ्यासारख्याला विचारता आणि तेच मत हेडलाईन म्हणून छापता. मी येडा आहे. मी काहीही म्हणेन. माझं मत कशाला छापता तुम्ही? जे समंजस आहेत, जे बुजुर्ग माणसं आहेत, दिशादर्शक माणसं आहेत, त्या लोकांची मतं हेडलाई म्हणून छापा. मी समाजातील खूप छोटा माणुस असून माझ्या बोलण्यामुळे काहीच होणार नाही”, असं ते म्हणाले.
“मला सोशल मीडियाची भीती वाटते”
दरम्यान, आपल्याला सोशल मीडियाची आता भीती वाटत असल्याचं मंजुळे म्हणाले. “मला सोशल मीडियाची भिती वाटते. मी काही तरी फेसबुकवर लिहिले की तुम्ही त्याची हेडलाईन करता. मी एवढंच सांगेन की प्रेमानं राहायला पाहिजे. आपल्यात फरक राहणारच. माणसं लगेच एकसारखे होत नाहीत. पण जितक्या सह्रदयतेनं वागता येईल, तितकं वागायचं”, असं नागराज मंजुळे यांनी नमूद केलं.