‘सैराट’ म्हणजे कुठलीही बंधनं न मानता मनमोकळं जगणं, वावरणं.. ‘पिस्तुल्या’पासून ‘फँ ड्री’ ते ‘सैराट’पर्यंत पोहोचलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या चित्रपटांची वाटही अशीच सैराट आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ‘फँड्री’ ही त्याची लोकांना भिडलेली पहिली गोष्ट होती. त्यात प्रखर सामाजिक भाष्य होतं. आता दुसऱ्याच चित्रपटातून प्रेमकथा रंगवताना एकाच वेळी ‘माझी गोष्ट मी सोडणार नाही’ हा बाणा कायम आहे, पण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला कलात्मकतेच्या कोंदणात सजवण्याचं भानही त्याने राखलं आहे. खरंतर, ‘फँ ड्री’नंतर नागराज त्याच सामाजिक चौकटीतून बोलणार अशी काहीशी लोकांची धारणा होती आणि तरीही तो कुठल्याही जातीपातीच्या विद्वेषाच्या चौकटीत बसत नाही म्हणूनही त्याचं कौतुक होत आहे. जगण्याबद्दलच्या प्रेमाची भाषा शिकवणाऱ्या या दिग्दर्शकाच्या मनात मुळात ही भावना कशी रुजली त्याविषयी ‘सैराट’च्या निमित्ताने जाणून घेण्याचा योग आला.
दिग्दर्शक म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन चित्रपट करणारा असं त्याचं कौतुक होत आहे. याचं श्रेय नागराज आपल्या जडणघडणीला देतात. मी लहानपणी खूप विचित्र घरात वाढलो. मी ज्या जातीत वाढलो तिथे अज्ञान, हाणामारी-रक्तपात, दारू पिणे या सगळ्या सामान्य गोष्टी आहेत. बायकांना मारणं, बायकांनी एकमेकांशी मारामारी करणं हे रोजचं आहे. त्यातून माझ्यावर वेगळा संस्कार कसा झाला हे माहीत नाही, पण आपण द्वेष करता कामा नये. रागाने राग वाढतो हे मला त्या वयातच कळून चुकलं होतं. कुणी द्वेष केला तर मी त्याच्यावर प्रेम करीन ही एकच शक्यता आहे; ज्याने राग संपेल असं माझ्या मनात कायम यायचं, असं नागराज सांगतात. ‘लहानपणी मी खूप रागीट होतो, मारामाऱ्या केल्यात. पण त्याचे परिणाम पाहिले तेव्हा ते काही चांगले नव्हते. आता मी जेव्हा आलिशान गाडीतून फिरतो तेव्हाही गाडीतून बाहेर कधीकाळी पायी चालणारा मी मला दिसतो. तुझ्यावरचा तो दगड सुटला आहे, पण अजून दुसरा कोणी त्याच दु:खात आहे ही जाणीव कायम राहते. आणि मग आपल्याला फारसं खूश व्हायची गरज नाही हे मन सांगत राहतं. याबाबतीत एका गोष्टीने आपल्यावर खूप परिणाम केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘पिक्चर ऑफ डोरियन’ नावाची एक कादंबरी मी वाचली होती. त्यात एका चित्रकाराला निष्पाप मुलाचं चित्र काढायचं असतं. त्यासाठी तो खूप फिरतो आणि त्याला गावात एक मुलगा दिसतो, बहुधा तो डोरियन असावा. आता तेवढं लक्षात नाही, पण तो त्या निष्पाप मुलाचं चित्र काढतो. नंतर चाळीसएक वर्षांनी याच चित्रकाराला सर्वात क्रूर माणसाचं चित्र काढायचं असतं आणि म्हणून तो अनेक तुरुंग पालथे घालतो. तिथे त्याला एक खूप कुरूप आणि क्रूर अशी व्यक्ती भेटते. त्याचं चित्र काढत असताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा तो क्रुर माणूस चित्रकाराला आठवण करून देतो की लहानपणी निष्पाप मुलगा म्हणून तू माझंच चित्र काढलं होतं. या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम झाला. सुंदर गोष्टही क्रूर होऊ शकते. द्वेषाचं उत्तर द्वेष होऊ शकत नाही हे मनाशी खूप पक्कं बसलं आहे. ज्याने मला दु:ख दिलं त्याला त्याचं आनंदाचं फूल करून त्या माणसाला परत देणं यातच खरं माणसाचं कौशल्य आहे. त्यामुळे आपण कितीही वाईट अनुभव घेतले असले तरी त्याचा राग आपल्या चित्रपटातून दिसणार नाही, हेही नागराज तितक्याच विश्वासाने सांगतात.
‘सैराट’ची जोडी आर्ची आणि परश्या यांचंही ते भरभरून कौतुक करतात. या चित्रपटात आर्ची म्हणजे मुलगी डॅशिंग आहे. आणि परश्या हा हळवा, जबाबदारी घेणारा आहे. व्यक्तिरेखांची ही उलटापालट करून आपल्याला मजा आल्याचं त्यांनी सांगितलं. सौंदर्य हे वेगळं असतं. त्याचे तुम्ही मांडलेले प्रमाण मोडून आर्चीचं सौंदर्य ठसेल. तसंच परश्याचंही आहे. हिरो म्हणजे नुसता भांडणारा, राऊडी असा नाही. तो हळवा आहे, संवेदनशील आहे. चित्रपटात परश्या नास्तिक आहे. नास्तिक माणसं भारी असतात, कारण ते स्वत:वर विश्वास ठेवतात आणि ते दुसऱ्यावर प्रेम करतात. परश्या तसा आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र परश्यापेक्षा आर्चीची व्यक्तिरेखा कथेत जास्त सशक्त होती हेही ते मान्य करतात. आर्चीची भूमिका लिहिली तेव्हाच तिला पुरस्कार मिळणार हे माहिती होतं. आर्चीची व्यक्तिरेखा पटकथेतच इतकी मजबूत होती की तिला कोणी नाकारूच शकणार नाही हे माझं ठाम मत होतं. म्हणजे खरंतर तिला मुख्य अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळायला हवा होता इतकं छान काम केलं आहे तिने. खूप छटा होत्या तिच्या व्यक्तिरेखेत आणि ती १५ वर्षांची असूनही एवढा मोठा ग्राफ तिने सुंदर रंगवला आहे, अशा शब्दांत नागराजने आर्ची रंगवणाऱ्या रिंकू राजगुरूचे कौतुक के ले. ‘सैराट’ चर्चेत असतानाच नागराजच्या डोक्यात चौथ्या चित्रपटाची कथाही तयार झाली असून त्याच्यावर कामही सुरू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
लोकांना शिकायला मिळेल- रिंकू राजगुरू
नववीत शिकणारी ही अकलूजची मुलगी पडद्यावर जेव्हा बुलेट चालवत लोकांसमोर येते तेव्हा भल्याभल्यांची दिल की धडकन वाढते. आर्चीच्या भूमिकेत जीव ओतणाऱ्या रिंकू राजगुरूला तिच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे खरा, पण तिच्या या बुलेट चालवण्याने खुद्द अकलूजमध्येही क्रांतिकारी बदल घडले असल्याचे तिने सांगितले. गावांमध्ये आजही मुलींवर अनेक बंधनं आहेत. आर्ची जशी चित्रपटात बुलेट, ट्रॅक्टर चालवते तसे प्रत्यक्षात करण्याची परवानगी मुलींना नाही. मात्र ‘सैराट’मुळे खुद्द अकलूजमध्येही आपल्या बुलेट चालवण्याचं कौतुक होतं आहे. या चित्रपटातून लोकांना खरंच खूप काही शिकायला मिळेल, असे मत रिंकूने व्यक्त केलं. आर्चीची भूमिका ऐकल्यानंतर भारी वाटलं होतं, पण ती कशी करायची काही कल्पना नव्हती. म्हणजे मला कॉलेज माहिती नव्हतं, प्रेम कसं करायचं, नजरेला नजर भिडवून ते व्यक्त कसं करायचं? काहीच कळत नव्हतं. मग बऱ्याचदा मी माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी असलेली आर्ची काय करेल, कशी रडेल असं स्वत:च आर्ची होऊन विचार करायचे, असं रिंकूने सांगितलं. अर्थात, यामागे नागराज दादाचा मोठा हात आहे, असं ती म्हणते.
परश्या व्हावं असं प्रत्येकाला वाटेल- आकाश ठोसर
पुण्यात वाढलेला, तिथेच शिक्षण झालेल्या आकाश ठोसर हा कुस्तीच्या आवडीपायी नागराजच्या गावात वास्तव्याला होता. एकीकडे एमएचे शिक्षण आणि दुसरीकडे कुस्तीचा सराव असं आयुष्य सुरू असताना त्याला या चित्रपटासाठी ऑडिशन देण्याची संधी मिळाली. नागराजना मी अण्णा म्हणतो. त्यांना जशी व्यक्तिरेखा हवी असेल तशा प्रकारचे कलाकार निवडणं ही त्यांची खासियत आहे. त्यांना हवा तसा परश्या माझ्यात होताच. मलाही शूटिंग सुरू झाल्यानंतर माझ्यातल्या परश्याची जाणीव झाली. माझ्यातला परश्या अण्णांनी काढून घेतला, असं आकाशने सांगितलं. या चित्रपटात त्याच्यापेक्षा रिंकूची भूमिका जास्त सशक्त आहे. यावर बोलताना तो म्हणतो, ‘‘आर्ची डॅशिंग आहे. मुली प्रत्यक्षात तशा नसतात, पण त्यांनी तिच्यासारखं व्हायला पाहिजे तर त्यांना ते त्यांच्या आयुष्यात उपयोगी पडेल.’’ मात्र परश्याची भूमिकाही तितकीच चांगली आहे, असं तो म्हणतो. परश्या गुणी आहे, शांत आहे, जबाबदारी घेणारा आहे. चित्रपटात परश्याला पाहिल्यावर आपण त्याच्यासारखं असायला पाहिजे, ही भावना मुलांमध्ये निर्माण होईल, असा विश्वास आकाशला वाटतो.
‘फँ ड्री’ची कथा लोकांमध्ये हळूहळू झिरपली हे मला मान्य आहे. ‘सैराट’ची कथा मात्र लोकांना आवडेल याची पहिल्यापासून कल्पना होती. तसं पाहायला गेलं तर ‘फँ ड्री’च्या तुलनेत ‘सैराट’ हा खूप भव्य चित्रपट आहे. ‘झी स्टुडिओ’ची निर्मिती, अजय-अतुलचं संगीत या सगळ्यामुळेच खूप मोठा चित्रपट आहे हा..पण लोक ठरावीक चित्रपटच का पाहतात? हा नेहमी प्रश्न पडतो. ‘सैराट’ करताना मला तरुणवर्गाच्या भाषेत किंबहुना भारतीय चित्रपट रसिकांच्या भाषेत बोलायचं होतं आणि आपल्याला गाणी खूप आवडतात. ते का हे माहिती नाही पण, ‘फँड्री’ हा पूर्णत: माझा चित्रपट होता. त्यात माझी भाषा होती. पण ‘सैराट’च्या बाबतीत आपण थोडा बदल केला आहे. ‘सैराट’च्या लोकप्रियतेत गाण्यांचा मोठा हात आहे. त्यामुळे या चित्रपटाची भाषा ही काहीशी सगळ्यांना माहिती असणारी आहे. तो लोकांना आवडणाऱ्या पद्धतीचा चित्रपट बनवला असला तरी त्यातलं मत माझंच आहे आणि हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही.
नागराज मंजुळे