‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहेत.

‘नाळ’ या चित्रपटाचा टीझर फेसबुकवर शेअर करत नागराज यांनी त्याविषयीची माहिती दिली. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘माझ्याच मनातली गोष्ट सुधाकर सांगतोय. नितीन वैद्य, विराज लोंढे, निखिल वराडकर, प्रशांत पेठे हे या निर्माणातील सोबती आहेतच,’ अशी पोस्ट नागराज यांनी फेसबुकवर लिहिली.

‘नाळ’च्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरने चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार आहेत हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यातच आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader