भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती काल मोठ्या उत्साहात पार पडली. महामानवाच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांबरोबरच अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरही बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही आपल्या फेसबुकवरुन आगळ्यावेगळ्या शैलीत आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करत शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध भीम गीत गायिका कडूबाई खरात यांच्यासोबतचा सेल्फी काढतानाचा फोटो पोस्ट करुन नागराज यांनी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोला दिलेले कॅप्शनचीही चांगलीच चर्चा झाली.

कडूबाई खरात यांच्यासोबतचा फोटो नागराज यांनी फेसबुकवर पोस्ट करण्याबरोबरच आपली फेसबुक स्टोरी म्हणूनही ठेवला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नागराज यांनी कडूबाईंच्याच गाण्याच्या ओळी वापरल्या होत्या. ‘मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं.. आपुन खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रं…’ असे कॅप्शन नागराज यांनी दिले होते.

कोण आहेत कडूबाई खरात

औरंगाबादमधील चिखलठाणाला राहणाऱ्या कडूबाई यांनी गायलेलं गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालं होतं. आंबेडकरांच्या कार्याची महती सांगणारं गाणं बघता बघता गावावात पोहचलं. कडूबाईंनी एकतारीवर गायिलेल्या ‘मह्या भीमानं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी…’ या गाण्याला यू-ट्यूबवर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले असून सोशल नेटवर्किंगवरुनही हे गाणे चांगलेच व्हायरल झाले. या गाण्याबरोबरच नागराज यांनी कॅप्शन म्हणून ठेवलेले ‘मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं, आपुन खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रं…’ हे गाणेही चांगलेच व्हायरल झाले होते. आपल्या सुरेल आवाजामुळे कडूबाई स्टार झाल्या आहेत. ही गाणी व्हायरल झाल्यानंतर कडूबाईंना मोठ-मोठ्या कार्यक्रमात भीमगीते गाण्यासाठी आमंत्रणे मिळू लागली.

भीमानं माय सोन्यानं भरली ओटी…

मायबापाहून भिमाचे उपकार लय हाय रं…

अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारे नागराज सोशल नेटवर्किंगवर जास्त अॅक्टीव्ह नसतात. मात्र विशेष दिवसांना ते आवर्जून पोस्ट करतात. अशीच पोस्ट त्यांनी काल आंबेडकर जयंतीनिमित्त केली होती. नागराज हे सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांवर सिनेमा बनवणारे दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी आपल्या सैराट, फँड्री आणि पिस्तुल्या सारख्या सिनेमांमधून नागराज यांनी जातीव्यवस्थेवर भाष्य केले आहे. त्यांच्या या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कारांपासून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

१९ फेब्रुवारी रोजी काऊंन्सलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्यावतीने न्यूयॉर्क येथे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागराजही सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी सेल्फी पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या होत्या.