दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष लागलेलं असतं. सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिर्यानी’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, आज ते सोलापूरमध्ये ‘घर बंदूक बिर्यानी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना त्यांच्या आत्मचरित्र लिहिण्यावरही भाष्य केलं.
हेही वाचा – ‘शकुंतलम’ चित्रपटासाठी समांथा रुथ प्रभूने परिधान केले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दागिने, आकडा वाचून व्हाल थक्क
काय म्हणाले नागराज मंजुळे?
स्वत:चं आत्मचरित्र लिहण्याचा सद्या कोणताही विचार नाही. भविष्यात कधी आत्मचरित्र लिहावं वाटलं तर नक्कीच लिहीन. पण फॅन्ड्री आणि सैराट हे सिनेमे एका अर्थानं माझं आत्मचरित्रच आहेत. या सिनेमांमध्ये मी माझं म्हणणं मांडलं आहे. खरं तर माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही लपलेलं नाही. माझ्याबद्दलच्या सर्वच गोष्टी आता लोकांना माहिती आहे, असं मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा – हनिमूनसाठी गेलेल्या टीव्ही अभिनेत्रीने खाल्ली तब्बल १८०० रुपयांची मॅगी, पती फोटो शेअर करत म्हणाला…
‘घर बंदूक बिर्यानी’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, झूंडच्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एक आगळावेगळा प्रयोग आपल्यासाठी घेऊन येत आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘घर, बंदूक, बिर्यानी’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओ यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर हेमंत जंगल अवताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. याबरोबरच या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं संगीत ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांनी दिलं आहे. या चित्रपटात नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.