आपल्या बुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, असं सांगणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना स्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व घेऊन येत आहे. मराठीच्या या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार यावरून पडदा उचलण्यात आला आहे. अवघ्या महाराष्ट्राला ‘सैराट’ चित्रपटाद्वारे याड लावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. नागराज यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर प्रोमो शेअर केला आहे.
‘कोण होणार करोडपती’चे हे तिसरे पर्व आहे. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले होते. तर दुसऱ्या पर्वात ती जबाबदारी स्वप्निल जोशीने पार पाडली होती. कौन बनेगा करोडपतीच्या यशात या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा असतो. नवीन पर्वाची घोषणा झाल्यापासूनच सूत्रसंचालक कोण असणार याची उत्सुकता होती. आता नागराज मंजुळेंचं नाव समोर येताच या पर्वाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नागराज यांना प्रेक्षकांनी पाहिलं. आता सूत्रसंचालक म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाइफलाइन्स असतील हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.