नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील गाण्यांपासून ते अगदी नवख्या कलाकारांपर्यंत सर्वांनाच सिनेरसिकांनी जणू भुरळच घातली आहे. ‘सैराट झालं जी….’ असं म्हणत या चित्रपटाला सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाने सर्वांनाच याड लावलं. सोशल मिडियावर सध्या अशाच एका ‘सैराट’ व्हिडिओची चर्चा सुरु आहे. पण हा व्हिडिओ गाजतोय त्याच्या ‘बालिश’पणामुळे.
चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार-या आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिकली होती. त्यांची ही पात्र पुन्हा रंगवत ‘सैराट झालं जी..’ (किड्स वर्जन) हा व्हिडिओ चर्चेत आहे. आर्ची आणि परशा यांच्या भूमिका रंगवत चित्रपटाच्या अगदी जवळ जाणारा हा व्हिडिओ सुयश वाघमारे याने दिग्दर्शित केला आहे. काही दिवसांपूर्वीच यू ट्युबवर प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओला तब्बल ३ लाखांपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. चिमुरड्यांचं हे ‘सैराट’ प्रकरण अनेकांना आवडलं असलं तरीही काहीजणांनी मात्र या बाबतीत नाराजीचा सूर लगावला आहे.

वाचा- ‘सैराट’वर बोलून वैताग आला- नागराज मंजुळे

चित्रपटाची गाणी आणि त्याच्या कथानकाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ‘सैराट’च्या यशाने अनेक विक्रम मोडित काढले आहेत. या चित्रपटाने सातासमुद्रापलीकडे जात विदेशी प्रेक्षकांचीही दाद मिळवली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा महिने लोटून गेले असले तरी ‘सैराट’ काही ना काही कारणांमुळे अजूनही चर्चेत आहे. एक चांगला चित्रपट म्हणून सर्वांनीच चित्रपटाचे कौतुक केले असले तरी आता त्याचा आसरा घेऊन काही भलतेच प्रयोगही सुरू झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे.