एका अवैध व्यावसायिकाची तक्रार करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याशी नायब तहसीलदाराने असभ्य वर्तन केल्याची घटना गुरुवारी जुहू येथे घडली. हा व्यावसायिक देव यांच्या घरासमोरील एका मोकळ्या भूखंडावर वेश्याव्यवसाय करत असल्याची तक्रार देव यांनी केली होती.
जुहू येथील रमेश देव यांच्या इमारतीसमोर एक मोकळा भूखंड आहे. हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र या जागेवर अतिक्रमण करून एका बिहारी व्यक्तीने वेश्याव्यवसाय सुरू केला आहे. तेथील गिऱ्हाईकांच्या दररोजच्या भांडणांमुळे तेथील नागरिकही वैतागले आहेत. याप्रकरणी देव यांनी पोलीस व तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत तहसीलदार आनंद सावळे यांनी गुरुवारी या भागाची पाहणी केली. मात्र त्या वेळी येथील नागरिक या भूखंडावरील झाडीझुडुपे हटवून येथे साफसफाई करत होते. सावळे यांनी नागरिकांना रोखत भूखंडाच्या फाटकाला टाळे ठोकले. त्या वेळी देव यांनी, तुम्ही कोणाच्या आदेशावरून भूखंडाला टाळे ठोकले, असा प्रश्न सावळे यांना विचारला. तसेच संबंधित अधिकाऱ्याचा दूरध्वनी क्रमांक देण्याची विनंती केली.
सावळे यांनी क्रमांक देण्यास नकार देत आपल्या गाडीच्या दिशेने मोर्चा वळवला. रमेश देव यांनी सावळे यांना थांबवत पुन्हा एकदा विनंती केली. त्यावर सावळे यांनी ‘असे खूप ज्येष्ठ अभिनेते पाहिले,’ असे उद्गार काढत गाडीचा दरवाजा जोरदार लावला. त्या वेळी देव यांच्या बोटांना दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार केले.