डायलिसिसच्या रुग्णांना अल्प दरात उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशातून रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे ठाण्यातील रुग्णालये आणि सामाजिक संस्थांना डायलिसिस मशिन्स देण्यात येणार आहे. या उपक्रमाकरिता निधी संकलित करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची मुलाखत घेणार आहेत.    
ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये येत्या २७ एप्रिल रोजी सायंकाळी ८.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रोटरीच्या ‘आशाए’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सध्या डायलिसिस करावे लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. अनेकांना यासाठी येणारा खर्च परवडण्यासारखा नसतो. यामुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि गरिबांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना पाच डायलिसिस मशिन देण्याचा निर्णय रोटरीने घेतला आहे. या मशिनद्वारे गरजू रुग्णांवर अतिशय अल्प दरात उपचार करण्यात येतील. यासाठी ४८ लाखांच्या निधीची आवश्यक्ता आहे. यामुळे निधीसंकलनाबरोबरच सर्वसामान्यांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने रोटरीच्या वतीने शनिवारी या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. यावेळी नाना पाटेकर हे डॉ.प्रकाश आमटे यांची मुलाखत घेणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणीच आहे. सिनेकलावंत आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, सतीश तारे, कुशाल बद्रिके, सुप्रिया पाठारे, हेमांगी कवी, स्पृहा जोशी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी भार्गवी चिरमुले आणि आदिती भागवत या नृत्याचा तर बेला शेंडे आणि मिलिंद इंगळे हे गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री आणि उंच माझा झोका मालिकेतील स्पृहा जोशी करतील. ठाणेकरांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून मनोरंजनासह निधीसंकलनास हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तिकीट आणि अधिक माहितीसाठी संपर्क- विलास भांडारकर-९८२११४९७३६,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा