मनीषा कोईराला तिच्या रोमॅण्टीक भूमिकांसाठी नेहमीच गाजली. पण तिच्या प्रेमसंबंधांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल तर ती नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांचीच. २० वर्षांनी मोठ्या, विवाहित माणसाच्या प्रेमात मनिषा होती. इतर कलाकारांप्रमाणे नाना आणि मनिषा यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवले नाही. उलट ते नेहमीच याबद्दल बोलायचे.

९० दशकाच्या सुरुवातीलाच हे प्रेमप्रकरण सुरु झाले. नाना पाटेकरांच्या अभिनयाबद्दल कोणीच प्रश्न उभारू शकत नाही. पण असे असले तरी त्यांच्याकडे हिरोला साजेसे लूक कधीच नव्हते.. शिवाय एक रागीट माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. तर दुसरीकडे मनिषाचा विवेक मुशरन (सौदागर सिनेमातला सह कलाकार) याच्याशी नुकताच प्रेमभंग झाला होता. नाना आणि मनिषा अग्निसाक्षी सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. लवकरच नाना पाटेकरांची मोहिनी तिच्यावर पडली आणि ती स्वतःला त्यांच्या प्रेमात पडण्यापासून अडवू शकली नाही. सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान ते एकमेकांना डेटही करु लागले. पण त्यांचे हे प्रेम प्रसारमाध्यमांपासून काही लपून राहिले नाही. मनिषाचे शेजारी आणि सेटवरची काही माणसे नाना पाटेकर मनिषाला कधी भेटतात याची माहिती आनंदाने देतच होते. अनेकदा नाना पाटेकर यांना मनिषाच्या घरुन पहाटे निघतानाही पाहिले गेलेले.

त्यानंतर हे दोघं दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या खामोशी सिनेमात एकत्र आले. पण यावेळी प्रसारमाध्यमांकडून दोघांनाही पडद्यामागील त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दलच अधिक प्रश्न विचारले जाऊ लागले. मनिषाने नंतर ही गोष्ट मान्यही केली की ती आणि नाना एकमेकांसोबत आहे. नंतर नाना यांनीही या गोष्टीचा स्विकार केला.

flashback-friday-nana-patekar-manisha-koirala-tumultuous-affair-hounded-by-infidelity-and-volatile-temper-3_0

पण ही जोडीही फार काळ टिकली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नाना आणि मनिषाचे स्वभाव. दोघांचेही अस्थिर स्वभाव त्यांच्या नात्यामध्ये दुरावाच आणत गेले. नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांशी भांडतानाही त्यांना पाहिले गेले आहे. नाना, मनिषासोबतच्या नातेसंबंधांबाबत फार आग्रही होते. कोणत्याही सह कलाकारासोबत प्रेमाचे सीन चित्रित करताना ते अनेकदा आक्षेप घ्यायचे. तसेच मनिषाने फार तोकडे कपडे घालू नये असेही त्यांना वाटायचे. युगपुरूषच्या चित्रिकरणावेळी मनिषाने घातलेले कपडे त्यांना न आवडल्यामुळे त्यांच्यात मोठे भांडणही झाले होते. त्यांच्यातले हे मतभेद नंतर एवढे वाढले की त्यांनी एकमेकांशी काही दिवस न बोलण्याचा निर्णय घेतला. या कठीण वेळेत तिने अनेक मुलाखतीत हेही म्हटले की तिचे नानांवर प्रेम आहे पण त्याचे हे नाते कुठे जाणार हे मात्र माहित नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघंही एकमेकांना तेवढेच प्रेम करत होते यात काही शंका नाही. पण नानांच्या स्वभाव तिला पटत नव्हता.

पण एकदा मनिषाने नाना आणि आयेशा झुल्का यांना एका खोलीत एकत्र पाहिले. जेव्हा तिने या दोघांना एकत्र पाहिले तेव्हा सगळ्यात आधी नाना पाटेकर यांच्यावर रागावण्यापेक्षा तिचा पूर्ण राग आयेशावर निघाला. माझ्या नानापासून दूर हो असे म्हणत ती आयेशावरच रागावली. पण नाना आणि आयेशा दोघांनीही त्याच्यात काही प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले नाही. शिवाय नानांना मनिषाला हे पटवून देण्यासाठी फार कष्ट पडले नाहीत.

पण त्यांनी वेगळे होण्याचे खरे कारण म्हणजे नाना पाटेकर यांनी मनिषाशी लग्न करायला नकार दिला. त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले होते की, नीलकांतीला (नानांची बायको) कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट देणार नाही. शिवाय दुसरी बाई असा ठपका मनिषाला स्वतःच्या नावावर नको होता. म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती दुसऱ्या एका व्यक्तीला डेट करत होती तर नाना आणि आयेशा यांनी आपल्या नातेसंबंधांवर एकत्र राहून शिक्कामोर्तब केले होते.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले होते की, त्यांना मनिषाची फार आठवण येते. ‘ती सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी हरणासारखी आहे. तिला हे कळले पाहिजे की तिला दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करायची काहीच गरज नाही. तिच्याकडे सर्व काही आहे. तिने स्वतःची जी अवस्था करुन घेतली आहे ते पाहून मला खूप रडू येतं. कदाचित माझ्याकडे आज तिच्याबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही. प्रेमभंग ही खूप कष्टदायक गोष्ट आहे. वेदना म्हणजे नक्की काय हे अनुभवण्यासाठी हा अनुभव घेणेही गरजेचे असते. मला तेव्हा झालेल्या वेदना मी सांगू शकत नाही. कृपया याबद्दल आपण नको बोलूया. मला आजही मनिषाची आठवण येते.’

मनिषाने नंतर नेपाळी व्यावसायिक सम्राट दाहलशी विवाह केला. पण २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर नाना पाटेकर आणि नीलकांती यांना मल्हार हा एक मुलगा आहे.

Story img Loader