दूरदर्शनवर एकेकाळी गाजलेले रुडयार्ड किपलिंगच्या ‘जंगलबुक’चे विश्व आता मोठय़ा पडद्यावर जिवंत होणार आहे. डिस्नेची निर्मिती असलेल्या या हॉलीवूडपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी शेरखानला आवाज देणाऱ्या अभिनेता नाना पाटेकर यांच्याबरोबर अभिनेत्री प्रियांका चोप्रा, इरफान खान आणि शेफाली शहा यांनी आवाज दिला आहे.

‘डिस्ने’चा ‘जंगलबुक’ सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. आत्तापर्यंत अ‍ॅनिमेटेड स्वरूपात मोगली आणि त्याचे जंगलबुकमधील सहकारी कित्येक वेळा पडद्यावर आले आहेत. मात्र, पहिल्यांदाच ‘लाइव्ह अ‍ॅक्शन’ स्वरूपात हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या हॉलीवूडपटाशी भारतीय कलाकारांचा मोठा संबंध आहे. चित्रपटात मोगलीची भूमिका नील सेठ या भारतीय पण अमेरिकोवासी असलेल्या लहान मुलाने केली आहे. मात्र मोगलीच्या आईसह, बघीरा, भालू, शेरखान यांच्यासाठी बेन किंग्स्ले, इद्रीस अल्बा, स्कार्लेट जॉन्सन, बिल मुरेसारख्या हॉलीवूड कलाकारांनी आवाज दिला आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी अभिनेता नाना पाटेकर, ओम पुरी, इरफान खान, प्रियांका चोप्रा आणि शेफाली शहासारख्या बॉलीवूड कलाकारांच्या टीमने आवाज दिला आहे.

‘दूरदर्शन’वर कधीकाळी बच्चेकंपनीला भुलवणाऱ्या ‘जंगलबुक’मधला शेरखानचा आवाज आजही कित्येकांच्या आठवणीत आहे. नाना पाटेकर यांच्या आवाजातील शेरखानची डरकाळी पुन्हा या हॉलीवूडपटाच्या हिंदी आवृत्तीच्या निमित्ताने दुमदुमणार आहे. अभिनेता इरफान खानने भालूला आवाज दिला असून याआधीही ‘डिस्ने’च्या ‘प्लेन’ या अ‍ॅनिमेशनपटासाठी आवाज देणाऱ्या प्रियांकाने ‘का’साठी आवाज दिला आहे. ‘रक्षा’ या कोल्ह्य़ासाठी शेफाली शहाने आवाज दिला आहे. नाना पाटेकरांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या भारदस्त आवाजात बघीराचे संवाद ऐकू येणार आहेत. ‘द जंगलबुक’ हे भारतीयांसाठी खूप खास आणि जिव्हाळ्याचे आहे. त्यामुळे ‘डिस्ने’च्या ‘जंगलबुक’ची हिंदी आवृत्ती इथल्या प्रेक्षकांना आपलीशी वाटावी हा आमचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नातूनच बॉलीवूडच्या मोठय़ा कलाकारांचे आवाज या चित्रपटाशी जोडले गेले आहेत. बिग बजेट हिंदी चित्रपटासारखीच ‘जंगलबुक’ची हिंदी आवृत्ती प्रेक्षकांसमोर येईल, असा विश्वास ‘डिस्ने इंडिया’ स्टुडिओच्या उपाध्यक्षा अमृता पांडे यांनी व्यक्त केला.

Story img Loader