राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे मराठीत बरेच चित्रपट आले, त्यापैकी एक चित्रपट आजच्या काळाशीही सुसंगत आहे तो चित्रपट म्हणजे म्हणजे ‘सिंहासन’. १९७९ साली प्रदर्शित झालेला ‘सिंहासन’ कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान ‘सिंहासन’ चित्रपटाच्यावेळी नेमकं काय घडलं? चित्रपटादरम्यानचे किस्से उपस्थितांनी सांगितले. शिवाय नाना पाटेकर यांनीही या चित्रपटादरम्यानच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. नाना पाटेकरांनी नसीरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी नवस केला होता हा गमंतीशीर किस्सा त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितला.
आणखी वाचा : “ब्राह्मण हे इब्राहिमचे वंशज आहेत” या वादग्रस्त विधानानंतर लकी अलीने मागितली जाहीर माफी!
याबद्दल बोलताना नाना म्हणाले, “सिंहासननंतर जब्बार यांनी मला कोणत्याच चित्रपटात घेतलं नाही. मराठीत जब्बार हे नेहमी मोहन आगाशे यांना चित्रपटात घेत. हिंदीत श्याम बेनेगल, गोविंद नीहलानी हे ओम पुरी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर काम करत. मी खरंच सांगतो की मी देव मानत नाही यामागील कारण नसीरुद्दीन शाह. त्यावेळी मी नसीरुद्दीनला अपघात व्हावा, त्याचे हातपाय मोडावेत यासाठी बरेच नवस केले, जेणेकडून नसिरच्या भूमिका मला मिळतील, पण तो नवस काही पूर्ण झाला नाही यामुळेच माझा देवावरचा विश्वास उडाला. पण अगदी खरं सांगतो यांच्या नशिबी जे होतं ते त्यांच्या पदरात पडलं. आम्हालासुद्धा नंतरच्या काळात भरभरून मिळालं.”
सिंहासन चित्रपटाचं नाव आजही गाजलेल्या श्रेष्ठ अजरामर कलाकृतींमध्ये घेतलं जातं. या चित्रपटात अरुण सरनाईक, सतीश दुभाषी, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, निळू फुले, दत्ता भट, नाना पाटेकर, असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या कादंबऱ्यातील काही प्रसंगावर हा चित्रपट बेतलेला आहे.