‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरांत पोहचलेले लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर यांची निर्मिती असलेली ‘नांदा सौख्य भरे’ ही मालिका येत आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम एन्टरटेनमेंटची निर्मिती असलेली ही मालिका येत्या २० जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी  ७.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत असून यात सुहास परांजपे (ललिता), ऋतुजा बागवे (स्वानंदी) आणि चिन्मय उदगिरकर (नील) मुख्य भूमिकेत दिसतील.
ललिता आणि स्वानंदीची एक सासू सुनेची जोडी आहे. दोघीही परस्परभिन्न स्वभावाच्या. ललिताची प्रत्येक गोष्ट दांभिकतेवर आधारलेली तर खरेपणा हा स्वानंदीचा पाया. बडेजाव हा ललिताचा स्वभाव तर साधेपणा हे स्वानंदीचं वैशिष्ट्य. अशा या दोन विरूद्ध टोकाच्या बायका एकाच घरात एकत्र येतात तेव्हा त्या घरात घडणा-या घटना या तेवढ्याच रंजक असतील. या सासू सुनेची आणि घराची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ‘नांदा सौख्य भरे’ या झी मराठीवरील आगामी मालिकेतून.

‘नांदा सौख्य भरे’ ही कथा आहे देशपांडे आणि जहागिरदार कुटुंबियांची. कधी काळी आपल्या पूर्वजांकडे असलेलं ऐश्वर्य आणि जमिन जुमला पुढच्या पिढीच्या नाकर्तेपणामुळे गमावून बसलेलं जहागिरदार कुटुंब. पण अजूनही डोक्यात आणि स्वभावात तीच मिजास कायम असलेलं. विशेषतः ललिता अजूनही त्याच खोट्या रुबाबात वावरत स्वतःचं खोटं वैभव मिरवतेय. हा खोटेपणा जणू तिच्या जगण्याचाच भाग बनलाय. तिचा मुलगा नील परदेशात शिकून भारतात आलाय. त्याच्या वधू संशोधनाची जबाबदारी ललिताने वच्छी आत्याकडे दिलीये. दुसरीकडे देशपांडे कुटुंब अतिशय इमानदार आणि साधं सरळ. आयकर विभागात मोठ्या पदावर असलेले देशपांडे अतिशय प्रामाणिक अधिकारी. एकत्र कुटुंबात आपल्या प्राध्यापक भावासोबत राहतात. देशपांडेंना संपदा आणि स्वानंदी अशा दोन मुली. संपदाची स्वप्नं या कुटुंबापेक्षा खूप वेगळी. तिला हे मध्यमवर्गीय जगणं आवडत नाही तर स्वानंदी अगदी आपल्या वडिलांसारखी. तत्वनिष्ठ आणि कायम खरं बोलणारी. जिला स्वतःला खोटं बोलायला आवडत नाही आणि इतरांचा खोटेपणाही जी खपवून घेत नाही. या स्वानंदीसाठी विवाहाचा प्रस्ताव येतो तो जहागिरदार कुटुंबातून आणि यासाठी कारणीभूत ठरते वच्छी आत्या. ललिताकडे नीलच्या लग्नासाठी अनेक प्रस्ताव घेऊन गेलेल्या वच्छी आत्याचा ललिताबाई प्रचंड अपमान करतात. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि ललिताबाईच्या खोट्या वैभवाची मिजास उतरविण्यासाठी वच्छी आत्या नियोजित पद्धतीने स्वानंदीचं स्थळ ललिताबाईकडे नेते. ललिताही स्वानंदीसाठी पसंती देते आणि इथूनच सुरुवात होते ते खोटेपणाच्या चालीवर खरेपणाने केलेल्या विजयी खेळीची.
मालिकेत ललिताच्या भूमिकेत सुहास परांजपे, वच्छी आत्याच्या भूमिकेत वर्षा दांदळे, नीलच्या भूमिकेत चिन्मय उदगिरकर तर स्वानंदीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे ही नवोदित अभिनेत्री आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा