अभिनेता विजय देवरकोंडा व अभिनेत्री रश्मिका मंदाना एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. तेलुगू अभिनेता नानीच्या आगामी चित्रपट ‘हाय नन्ना’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे कथित व्हेकेशन फोटो मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. हे फोटो हे दोघेही डेटिंग करत असल्याचे संकेत देणारे होते. अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्यासह अनेकांना या दोघांचे फोटो अशा रितीने दाखवलेले आवडले नाहीत, त्यानंतर आता नानीने माफी मागितली आहे.
विशाखापट्टणम इथे झालेल्या ‘हाय नन्ना’ नावाच्या कार्यक्रमात ही घटना घडली. मोठ्या स्क्रीनवर रश्मिका व विजयचे फोटो दाखवण्यात आल्याने उपस्थितानांही धक्का बसला. नानी आणि मृणाल तिथे उपस्थित होते. त्यानंतर शोच्या अँकरने तंत्रज्ञांना ते फोटो हटवण्यास सांगितले, परंतु हे सर्व पूर्वनियोजित स्टंट असल्यासारखं वाटत होतं.
“माझा मुलगा जर रणबीर कपूर किंवा आलिया भट्टइतका…”, परेश रावल यांनी केलेले विधान चर्चेत
याबद्दल विचारल्यावर नानी ‘एम ९’ शी बोलताना म्हणाला, “हे दुर्दैवी आहे. खरं तर नेमकं काय घडलंय ते समजण्याआधीच ते फोटो हटवले गेले. आम्ही सर्व जवळचे मित्र आहोत. विजय आणि रश्मिकाला देखील माहीत आहे की या गोष्टी घडत आहेत. पण, यामुळे जर कोणी खरोखरच दुखावलं गेलं असेल, तर मी आणि माझी टीम त्यांची माफी मागतो. स्टेजवर काय होणार आहे, याची अँकर किंवा आपल्याला माहिती नव्हती.”
“हा एक मूव्ही इव्हेंट आहे, असे स्टंट्स करण्यासाठी ही काही गॉसिप वेबसाइटसाठी नाही,” असंही नानी नंतर म्हणाला. दरम्यान, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांनीही अद्याप या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. मागच्या खूप दिवसांपासून हे दोघेही डेट करत असल्याची चर्चा आहे, पण दोघांनी आतापर्यंत आपण फक्त चांगले मित्र आहोत असंच म्हटलं आहे. त्यांनी ‘गीता गोविंदम’ व ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.