यंदा ठाण्यातील चेंदणी कोळीवाडावासीयांनी नारळी पौर्णिमा दोनदा साजरी केली. कारण नारळी पौर्णिमेच्याच दिवशी प्रसारित झालेल्या एका रिअॅलिटी शोचे तिथे चित्रीकरण करण्यात आले आणि त्यासाठी दोन दिवस आधीच तिथे अगदी बोट सजवून मिरवणूक वगैरे काढण्यात आली. टी.व्ही. वाहिन्यांवरील कार्यक्रमांचा वाढता प्रभाव यानिमित्ताने अशा रितीने संपूर्ण वसाहतीत आणि रस्त्यावर पाहायला मिळाला. हल्ली अशाच क्लृत्या लढवून अत्यंत सफाईदार पद्धतीने परंपरांचे देखणे सादरीकरण करून टी.व्ही. मालिका आपापला टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सण आणि उत्सव म्हणजे त्यांच्यासाठी मोठी पर्वणीच असते.
आकाशवाणी, वर्तमानपत्रे आणि चित्रपटांमधूनही प्रासंगिक सण आणि उत्सवांचे संदर्भ कळत-नकळतपणे येतात. मात्र प्रत्येक घरातील एक होऊन राहिलेले टी.व्ही. माध्यम मात्र दिनविशेष साजरे करण्यात दरवर्षी एक पाऊल पुढे टाकत असल्याचे दिसून येत आहे. वर्षांनुवर्षे सुरू असणाऱ्या मालिका, ब्रेकिंग न्यूजच्या शोधात असणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि निरनिराळ्या पर्वामधून सत्य दाखविण्याचा आभास निर्माण करणाऱ्या रिअॅलिटी शोमधून आता प्रत्यक्षाहुनी अधिक उत्साहात सण साजरे केले जाऊ लागले आहेत. विद्यमान जीवनशैलीत परंपरांचे संचित हरवून बसलेला अनोळखी श्रावण आपल्यापैकी बहुतेकांच्या अनुभवास येतो. टी.व्ही.वरील कार्यक्रमांमधून मात्र त्याचे साजिरेगोजिरे, आपल्या मनात असणाऱ्या चित्रासारखे श्रावणाचे स्वरूप पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच ते पाहायला आवडते. म्हणूनच ‘उंच माझा झोका’मधील छोटय़ा रमेपासून ते इतर बहुतेक मालिकांमधील सासू-सुना आणि नणंद-भावजया एकमेकींविरुद्धची आपापली कट-कारस्थाने एखाद्या एपिसोडपुरती बाजूला ठेवून सामूहिकरीत्या मंगळागौर साजरी करताना दिसतात. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रसारित होणाऱ्या भागात मालिकेतील एखाद्या नायिकेचा दूरदेशी राहणारा भाऊ येतो आणि मग मूळ कथानकाला ‘पॉझ’ देऊन त्या दिवशी मग राखी उत्सव साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी निरनिराळ्या समुद्रकिनारी चित्रित करण्यात आलेली सामूहिक कोळीनृत्ये दाखवली जातात.
दहीहंडीच्या उत्सवाचा आता दिसणारा ज्वर तर वृत्तवाहिन्यांचीच वाढविला. पूर्वी अष्टमीच्या मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा झाला की सकाळी दहीहंडी बांधून ती साधारण दुपापर्यंत फोडली जायची. दुपारी तीननंतर या उत्सवाचा कुठे मागमूसही नसायचा. वृत्तवाहिन्यांनी या उत्सवास ‘लाइव्ह’ करून प्राइम टाइममध्ये आणले. मग दहीहंडीची उंची, त्यासाठी जाहीर होणारी बक्षिसे आणि त्यातून मिळणारी प्रसिद्धी वाढत गेली. आता पूर्वीसारखा हा उत्सव परिसरातील घरांमधून गोळा केल्या जाणाऱ्या वर्गण्यांमधून साजरा करता येत नाही. त्यासाठी प्रायोजक मिळवावे लागतात. आयोजक म्हणून नावाला एखादे सांस्कृतिक अथवा क्रीडा मंडळ असते. मात्र हल्ली बहुतेक दहीहंडी उत्सव आपापली राजकीय ताकद दाखविण्यासाठी अथवा आजमाविण्यासाठी साजरे केले जातात. प्रेक्षक किती काळ मानवी थरांची ही कसरत पाहणार? मग त्यांच्या मनोरंजनासाठी गोविंदा उत्सवाच्या जोडीने लोकप्रिय गाण्यांचे लाइव्ह शो होतात. अनेक नामवंत गायक, सिने-नाटय़ कलावंत सेलिब्रेटी म्हणून या उत्सवांना हजेरी लावतात. त्या दिवशी दुपारी १२ ते रात्री साधारण ११ वाजेपर्यंत दहीहंडी ही एकच मोठी बातमी असते.
श्रावण महिन्यातच येणारा भारतीय स्वातंत्र्य दिनही रिअॅलिटी शोज्मधून मोठय़ा पद्धतीने साजरा होताना दिसतो. वैशिष्टय़पूर्ण नेपथ्य रचनेच्या पाश्र्वभूमीवर देशप्रेमाने भारलेली गाणी यानिमित्ताने सादर केली जातात. समाज प्रबोधनाच्या हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. आता हे व्यासपीठ जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी वापरले जाऊ लागले आहे. टी.व्ही. माध्यमही त्याचा पुरेपूर वापर करून घेते. अष्टविनायक दर्शन दरवर्षी असतेच, पण त्याबरोबरीनेच आडगावच्या प्राचीन, अर्वाचीन आणि आधुनिक गणेश मंदिरांची माहितीही दिली जाते. राज्यभरातील मानाच्या गणपतींचे थेट मंडपातून घरबसल्या दर्शन घडविले जाते. वर्षभर आठवडय़ातून पाच अथवा सहा अशा मात्रेने घराघरात दिसणाऱ्या विविध मालिकांचे कलावंत सामूहिकपणे ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन आपापला टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात. वास्तवात पूर्वीइतका सण आणि उत्सवांचा उत्साह आता राहिला नाही, असे म्हणणारे आपण सारे सणांचे टी.व्ही.वरील कार्यक्रमांमधील हे देखणे रूप मात्र कौतुकाने पाहत असतो.
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
यंदा ठाण्यातील चेंदणी कोळीवाडावासीयांनी नारळी पौर्णिमा दोनदा साजरी केली. कारण नारळी पौर्णिमेच्याच दिवशी प्रसारित झालेल्या एका रिअॅलिटी शोचे तिथे चित्रीकरण करण्यात आले आणि त्यासाठी दोन दिवस आधीच तिथे अगदी बोट सजवून मिरवणूक वगैरे काढण्यात आली.
आणखी वाचा
First published on: 04-08-2012 at 04:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narali paurnima festival shravan