यंदाच्या वर्षात लोकप्रियतेचे विविध प्रांत काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एका क्षेत्रात मुसंडी मारल्याचे ‘पेटा’ने ( पिपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आले आहे. ‘पेटा’च्या या अहवालानुसार, नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी भारतामधील शाकाहारी सेलिब्रेटींच्या यादीत आघाडीचे स्थान पटकावले आहे. आघाडीच्या स्थानासाठी नरेंद्र मोदी, रेखा, शाहीद कपूर , कंगना रणावत, अमिताभ बच्चन, आर. माधवन, जॅकलीन फर्नांडिस आणि हेमामालिनी यांच्यात जोरदार चुरस होती. मात्र, संस्थेतर्फे करण्यात आलेल्या जनमत चाचणीत नरेंद्र मोदी आणि रेखा यांची सरशी झाली.
यानंतर बोलताना अभिनेत्री रेखा म्हणाल्या की, ‘मी माझ्या जीवनात ब-याच काळापासून शाकाहारी आहारपद्धतीचे पालन करतेय. शाकाहारामुळे तुमच्या विचारपद्धतीत आणि आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात निश्चितच फरक पडत असल्याचेही त्यांनी म्हटले. तर अगदी परदेशी शिष्टमंडळांबरोबर असतानाही नरेंद्र मोदी करत असलेले शाकाहाराचे सेवन हा अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. भारतीय समाजातील या प्रथितयश व्यक्तींमुळे शाकाहारी चळवळीला बळ मिळेल, अशी आशा आता व्यक्त होत आहे. जगामध्ये दयाभावनेपेक्षा काहीही मोठे नसल्याचा संदेश मोदी आणि रेखाजी आपल्या रोजच्या आचरणातून देत असल्याची प्रतिक्रिया ‘पेटा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुर्वा जोशीपुरा यांनी दिली.

Story img Loader