रवींद्र पाथरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘आस्तिक किंवा नास्तिक हे भांडण केवळ तत्त्वज्ञानापुरतं नाही, तर हे भांडण सामाजिक प्रश्नांसाठी आहे. ‘देव’ ही संकल्पना माणसाला शांततेसाठी उपयोगी पडली नाहीच; उलट माणसं देवाचं नाव घेऊन एकमेकांची डोकी फोडत राहिली.. आणि हाच जगाचा इतिहास आहे. धर्म जर माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडला असता तर एकाही मंदिरात एवढी संपत्ती जमाच झाली नसती..’
प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी नांदेड येथील राम मंदिर संस्थान आयोजित ‘मी आस्तिक का नाही?’ या विषयावरील व्याख्यानात केलेले हे विवेचन विवेकबुद्धी शाबूत असलेल्या कुणालाही सहज पटेल. परंतु आज कुरुंदकर हयात असते तर या आणि अशा अनेक कळीच्या विषयांवरील त्यांची तर्कशुद्ध, बुद्धिप्रामाण्यवादी वक्तव्यं तसेच विचारांबद्दल त्यांना जगणे मुश्कील झाले असते, अशी साधार भीती वाटावी अशीच परिस्थिती भोवताली आहे. आणि दिवसेंदिवस ती अधिकच भीषण होत चालली आहे. आपल्या देशाची ‘मध्यममार्गी, सहिष्णु देश’ ही प्रतिमा हळूहळू धूसर होत चालली आहे. कट्टर ‘हिंदुत्ववादी देश’ ही नवी ओळख त्याला मिळते आहे. आणि कुणाही संवेदनशील माणसाच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेचीच बाब आहे. देशाचं नेतृत्वच धर्माधता आणि उजव्या ‘राष्ट्रवादी’ विचारांचे असल्याने गोबेल्स तंत्राधारे विखारी प्रचारातून लोकांची माथी भडकवली जात आहेत. त्यास बळी पडून सारासार विवेकशक्ती हरवून बसलेल्या आजच्या समाजात प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत नरहर कुरुंदकर ‘संदर्भहीन’ ठरले नसते तरच नवल! त्यात वैचारिक जागल्याची भूमिका निभावणारे विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, यू. आर. अनंतमूर्तीसारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे काळाच्या पडद्याआड गेल्याने सभोवतीचा काळोख अधिकच दाटून आलेला आहे. अशा वातावरणात नरहर कुरुंदकरांवर एखादी कलाकृती यावी हा एक आशेचा किरणच म्हणावा लागेल.
‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ या अजय अंबेकर लिखित साभिनय रंग-अभिवाचनाचा प्रयोग नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानतर्फे नुकताच मंचित झाला आहे. खरं तर कुरुंदकरांवर नाटय़कृती सादर करावी हा विचारच काहीसा धाडसी म्हणता येईल. कारण त्यांचं आयुष्य हे काही नाटय़मय घडामोडींनी युक्त नाही. उलट, एका करकरीत बुद्धिवाद्याची रूक्षताच त्यात आढळेल. परंतु लेखक अजय अंबेकरांनी त्यांच्या वैचारिक प्रवासातील जडणघडण, त्यांचं स्वच्छ बुद्धिवादावर आधारीत आयुष्य, त्यांचा किंचित अहंकारी तिरसटपणा आणि विक्षिप्त वागणं-बोलणं याचे वानगीदाखल प्रसंग निवडून एक उत्तम नाटय़ाविष्कार रचला आहे. त्यातून कुरुंदकर साक्षात् उभे राहतातच; त्याचबरोबर त्यांचं एक विलक्षण विचारवंत म्हणून असलेलं वेगळेपणही ठोसपणे अधोरेखित होतं. यासाठी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग निवडताना त्यांनी निरक्षीरविवेक दाखवला आहे. कुरुंदकरांच्या या प्रवासातले काही विरोधाभासही त्यांनी त्यामागील भूमिका व तर्कासह आत्मीयतेनं रेखाटले आहेत.
सहसा समाजवादी विचारवंत म्हणूनच कुरुंदकरांकडे पाहिलं जातं. परंतु समाजवाद्यांचा भोंगळपणाही त्यांनी प्रसंगी उघड केला आहे. सध्या देशात हिंदू-मुस्लीम दरी कमालीची रुंदावली आहे. त्याबद्दलची कारणमीमांसा करताना कुरुंदकरांनी दोन्ही धर्माच्या मूलतत्त्वांतील वेगळेपणा, त्यातल्या विसंगती, उभय धर्माच्या अनुयायांची अज्ञानमूलक कट्टरता, त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांची स्वार्थाध, आपमतलबी वृत्ती याची सप्रमाण चिरफाड केली आहे.. तीसुद्धा या दोन्ही धर्माभिमान्यांच्या व्यासपीठांवर जाऊन! बौद्ध धर्म व त्याच्या उदयास्ताची चिकित्साही त्यांनी याच निर्मम वृत्तीनं केली आहे. भारतीय इतिहासाबद्दल पसरवले गेलेले समज-गैरसमज त्यांनी पुराव्यांच्या आधारे खोडून काढले आहेत. आस्तिक्य-नास्तिक्याची त्यांची व्याख्याही तर्कशुद्ध आहे. ते समुदायाच्या श्रद्धेचं भंजन करत असतानाच त्यांना दुखावून चालणार नाही, ही आस्तिक्यबुद्धीही त्यांच्यापाशी आहे. म्हणूनच आईनं केलेला नवस फेडणं तसंच मुलीचं लग्न व मुलाची विधीवत मुंज करण्याबाबत पुरोगाम्यांचा रोष पत्करून त्यांनी घरच्यांची मनं राखण्यासाठी ‘माणूसपणा’तून केलेली तडजोड त्याच्या दुष्परिणामांसह त्यांनी हलाहलासारखी स्वीकारली. त्याबद्दल त्यांनी कुणापाशी तक्रार केली नाही की त्याचं दुबळं समर्थनही केलं नाही.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनातील त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. परंतु ती त्यांनी काहीएक विचारपूर्वक घेतली होती. यासंबंधात त्यांनी एका पत्रकाराकडे केलेलं विवेचन त्यांच्या तटस्थतेचं निराकरण करणारं आहे.कुरुंदकरांच्या घडणीचा भाग लेखकानं मोजक्या प्रसंगांतून उभा केला आहे. त्यातून विचारक कुरुंदकर कसकसे घडत गेले हे नर्मविनोदी घटनांतून कळून येतं. त्याचबरोबर आई व पत्नी प्रभावती यांच्यासोबतचं त्यांचं नातं उलगडणारे प्रसंग हृदयस्पर्शी तर आहेतच; त्याचबरोबर प्रज्ञेला माणूसपणाची जोड असेल तर ती व्यक्ती रूक्ष, कर्कश्श न होता ‘माणूस’ म्हणून आणखीनच उंच होते याचा प्रत्यय देणारे आहेत. कुरुंदकर आपले विचार टीकाकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कधी कधी ‘नाथाघरची उलटी खूण’ या प्रकारे युक्तिवाद करत आणि त्यांना सहजी जाळ्यात ओढत निरुत्तर करीत. तर बऱ्याच वेळा समोरच्याची भीडभाड न ठेवता थेट हल्लाही चढवीत. ही रणनीती त्या, त्या वेळची परिस्थिती पाहून ते अंगीकारीत. मात्र काही केल्या आपली मतं आणि म्हणणं निर्भयपणे मांडल्याविना ते राहत नसत.
एकीकडे संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करायची आणि धर्माच्या नावाखाली नेहमी परिवर्तनविरोधी भूमिका घ्यायची हे बिलकूल चालणार नाही, असे त्यांनी मुल्ला-मौलवी आणि मुस्लिमांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनाही सुनावायला कमी केलं नव्हतं. धार्मिक पुस्तकांमुळेच आपण नास्तिक झाल्याचं त्यांनी एके ठिकाणी नमूद केलंय. रामायण-महाभारतातील कथांचे सार हे आहे की, ‘भोळ्याभाबडय़ांचा पराभव आणि लबाडांचा विजय होतो,’ हे त्यांनी लहानग्या वयात हिंदू धर्ममरतडांना निर्भीडपणे सांगितलं होतं. यातून त्यांची उपजत प्रखर बुद्धिमत्ताच दिसून येते.
प्रचलित राजकीय, सामाजिक व धार्मिक तत्त्वज्ञानं, साहित्य, कला, विविध विचारसरणी आदींचा गांभीर्याने सखोल अभ्यास करून त्यांनी त्यांतले कच्चे दुवे, त्यातली वैय्यर्थता कुणाचाही व कशाचाही मुलाहिजा न बाळगता समाजासमोर मांडली. त्याद्वारे असंख्यांचा रोषही ओढवून घेतला. मात्र त्यांनी कधीही माघार घेतली नाही. आणीबाणीच्या काळात इसापनीती व पंचतंत्राच्या कथांतून त्यांनी तत्कालीन परिस्थितीवर कोरडे ओढले.अशा नरहर कुरुंदकरांचं झळझळीत वैचारिकत्व ठाशीवपणे मांडणारा हा रंगप्रयोग प्रत्येकानं पाहायलाच हवा. पार्श्वपडद्यावर प्रसंगानुकूल रेखाटलेली स्केचेस, घटना-प्रसंग खुलवणारं पार्श्वसंगीत, ध्वनिसंकेत, वेश-केशभूषा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचिक अभिनय यांच्या उपयोजनेतून हा रंगाविष्कार खिळवून टाकणारा झाला आहे. मंचीय हालचाली वगळता वाचिक अभिनयातून दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, राजीव किवळेकर, गणेश पांडे, अजय अंबेकर, स्वाती देशपांडे, जिगीषा देशपांडे आणि श्रीनिवास नार्वेकर यांनी तो समर्थपणे सादर केला आहे. आपापल्या वाटय़ाला आलेली पात्रं प्रत्येक कलाकारानं सजीव केली आहेत.नरहर कुरुंदकर या प्रज्ञावंताच्या प्रवासाची ही अनोखी गाथा वैचारिक प्रगल्भतेबरोबरच एक कलाकृती म्हणूनही आपल्याला खूप काही देते.