बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह रूग्णालयात दाखल झाले असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नसिरुद्दीन शाह यांना न्यूमोनिया झाला असून त्यांच्या फुप्फुसात एक पॅच आढळला आहे. अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी ही माहिती दिलीय. गेल्या दोन दिवसांपासून त्या आपल्या मुलांसोबत रूग्णालयात आहेत.
यापूर्वी अनेकदा अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या तब्बेतीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. परंतु आज त्यांच्या प्रकृतीबाबत आलेली माहिती ही खरी ठरलीय. ७० वर्षीय नसीरुद्दीन शाह यांना दोन दिवसांपासून खार इथल्या हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. याच रूग्णालयात दिलीप कुमार यांना मंगळवारी श्वास घेताना अडचणी येत असल्याने दाखल करण्यात आलंय.
नसीरुद्दीन शाह यांना न्यूमोनिया झालाय. त्यामुळे त्यांच्या फुप्फुसात एक पॅच आढळून आलाय. यावर उपचार घेण्यासाठीच त्यांना दोन दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नाही. तसंच त्यांना करोना किंवा इतर कोणताही आजार नसल्याचं त्यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी सांगितलं.
नसीरुद्दीन शाह यांच्यावर आणखी एक-दोन दिवस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिरावल्यानंतरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांना डिस्चार्ज कधी द्यायचा याबाबत डॉक्टर निर्णय घेतील, असं देखील पत्नी रत्ना पाठक यांनी सांगितलंय.