नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. मराठी रंगभूमीवर अढळ स्थान असणारे ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या रूपात पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. नटसम्राटमधील गाजलेल्या ‘टू बी ऑर नॉट टू बी…. जगावं की मरावं’ या वाक्यांनी टीझरची सुरूवात होते. याशिवाय, टीझरमध्ये आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेतील नाना पाटेकरच्या तोंडून ‘कुणी घर देता का घर’ हा अजराअमर संवादही ऐकायला मिळतो. एकुणच हा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे.
जबरदस्त संहिता, मर्मभेदी संवाद आणि अभिनयाची जुगलबंदी असलेल्या ‘नटसम्राट’ने मराठी नाटय़सृष्टीत एक अनोखी उंची गाठली होती. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी अशा अनेक प्रतिभावान कलाकारांच्या अभिनयाची जादू या नाटकाद्वारे पाहावयास मिळाली होती. ‘नटसम्राट’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांच्या अभिनयाची जादू अनुभवता येणार आहे.
नाना पाटेकर यांव्यतिरीक्त रिमा लागू, विक्रम गोखले हे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. फिनक्राफ्ट मीडिया अ‍ॅण्ड एण्टरटेनमेंट प्रा. लि., गजानन चित्र आणि आणि ग्रेट मराठा एण्टरटेनमेंट प्रस्तुत विश्वास विनायक जोशी, नाना गजानन पाटेकर निर्मित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा