रवींद्र पाथरे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या दफ्तरात धूळ खात पडलेला (की मुद्दाम टाकण्यात आलेला?) आहे. महाराष्ट्राबद्दलचा द्वेषभाव त्यामागे नसेलच असं नाही. अन्यथा दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या आणि त्यासंदर्भात विद्वज्जनांनी सज्जड पुरावे देऊनही तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये यामागचं सबळ तार्किक कारण सर्वसामान्य पामरांना तरी उमजू शकत नाही. आपले राजकारणीही लाचार, लाळघोटे असल्याने ते याबाबतीत केंद्रावर दबाव आणण्यास सर्वथा अक्षम ठरत आहेत. असो.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…
Indus Script
Harappan Script: हडप्पाकालीन लिपी उलगडणं इतकं कठीण का आहे?

मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. तरीदेखील ती अस्ताला जाईल की काय, अशी भीती मराठीप्रेमींना सतत वाटत असते. याचं कारण विश्वभाषा आणि ज्ञानभाषा मानल्या जाणाऱ्या इंग्रजीचा दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रभाव हेच आहे. त्यापायी ‘मराठी वाचवा’चा गजर सदासर्वकाळ आपल्याकडे सुरू असतो. अर्थात मराठीची हेळसांड होते आहे ही वस्तुस्थिती आहेच. त्याचं कारण व्यवहारोपयोगी इंग्रजीचा सर्वसामान्य मराठीजनांनी मोठय़ा प्रमाणावर केलेला स्वीकार हे आहे. जगात टिकायचं असेल तर एक वेळ मातृभाषा आली नाही तरी चालेल, पण इंग्रजी यायलाच हवी, ही मराठी जनमानसावर ठसलेली निकड त्यामागे आहे. खरं तर भारताच्या दक्षिणी प्रांतांतून इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणून आत्मसात करतानाच स्वकियांशी मात्र मातृभाषेतूनच संवाद करण्याची त्यांची रीत आपण का अंगीकारू नये? जेणेकरून मराठीचंही संगोपन, संवर्धन होईल आणि ज्ञानभाषेचंही आपल्याला वावडं राहणार नाही. अर्थात हा सगळा ऊहापोह लेखन, भाषणांतून मराठीचा हिरीरीनं पुरस्कार करताना होत असतोच. परंतु तरी प्राप्त परिस्थितीत मात्र काहीच बदल होत नाही, ही आपली समस्या आहे. तर ते असो.

अभिनेत्री मधुरा वेलणकर- साटम यांनी यावर आपल्या परीनं तोडगा काढला आहे. समीरा गुजर- जोशी या विदुषीला हाताशी धरून त्यांनी ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ हा रंगाविष्कार संकल्पित आणि सादरीत केला आहे. मराठी भाषेचा दोन हजार वर्षांचा प्रदीर्घ इतिहास, त्यातले महत्त्वाचे टप्पे, मराठी भाषेनं यादरम्यान घेतलेली वळणंवाकणं, तिच्या सुपुत्रांनी तिच्यासाठी केलेले अपार कष्ट, त्यांची आत्यंतिक तळमळ आणि त्यातून जन्माला आलेली आजची आधुनिक मराठी भाषा असा सुदीर्घ प्रवास त्यांनी रंजकरीत्या ‘मधुरव’ या रंगाविष्कारातून साकारलेला आहे.

इसवी सनपूर्व काळातील महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचं मूळ रूप मानलं जातं. सातवाहन काळापासून या भाषेत उत्क्रांती सुरू झाली. पुढे यादवकाळात महानुभाव पंथातील वाग्येय्यकारांनी तिला आपल्या साहित्यातून अंगडं-टोपरं बहाल केलं. ‘गाथा सप्तशती’ हा लोकमानसाने प्रसवलेला ग्रंथ ही भाषा तळागाळात सर्वदूर पोहोचल्याचा वानवळा म्हणता येईल. पुढच्या राजवटींनीही तिच्या विकासात अडथळे आणले नाहीत. बहामनी सल्तनत, आदिलशाही यांनीही तिच्या व्यवहारोपयोगी वापरास आडकाठी केली नाही. मात्र या काळात फारसी भाषेतील शब्द तिच्यात प्राधान्यानं समाविष्ट होत गेले. शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकरवी ‘राजव्यवहारकोश’ तयार करवून घेऊन मराठीला राजमान्यता आणि लोकमान्यता मिळवून दिली.

त्याआधीच्या काळात प्राकृतचं मराठी रूप होण्याचा टप्पा पार पडला होता. संत-पंत-तंतकवींचा त्यात अर्थातच मोलाचा वाटा होता. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठीत भाषांतरित करून तिला ज्ञानभाषेचं रूप प्राप्त करण्याचा पाया घातला. तुकाराम, एकनाथ, नामदेव आदींनी हा वारसा पुढे नेला. लोकपरंपरेतील शाहीर तसंच लोककलावंतांनी हे काम अधिक जोमानं आपल्या कलांच्या जोरकस सादरीकरणांतून केलं.

इंग्रजी अमदानीत आपला इंग्रजीशी आणि त्यातील ज्ञानाशी, विचारांशी परिचय झाला. त्यायोगे आपली क्षितिजंही विस्तारली. त्याचवेळी इंग्रजीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या स्थिती-गतीचं भानही आपल्याला येत गेलं. मुद्रणकलाही एव्हाना आपल्यापर्यंत पोहोचली होती; जेणेकरून मराठीत साहित्य प्रसवलं जाऊ लागलं. आणि तिच्या उत्थानाच्या दिशा अधिकाधिक उजळ होत गेल्या. तद्नंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठीभाषकांचं ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. त्यायोगे मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि स्वत:ला ऊर्जितावस्था प्राप्त करून घेण्याचा मराठीचा मार्ग अधिकच प्रशस्त झाला. या सगळ्या प्रवासात साहित्यिक, वक्ते, कलावंत, भाषा-अभ्यासक आणि संशोधकांनी काळाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर मराठीची नानाविध रूपं विकसित केली होती.

मराठीचा हा सगळा इतिहास आपल्याला ज्ञात असतोच असं नाही. साहित्य, कला आणि व्याख्यानांतून जरी तो आपल्यापर्यंत पोहोचवायचे प्रयत्न सातत्याने होत राहिले असले तरी या सगळ्याला काहीएक अंगभूत मर्यादा आहेत. ही अडचण ओळखून मराठीच्या अभ्यासक आणि मराठी भाषेची गोडी जाणणाऱ्या समीरा गुजर- जोशी आणि मधुरा वेलणकर- साटम यांनी ‘हे सगळं रंगाविष्कारातून मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलं तर..? तर ते अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचल..’ हा विचार त्यांच्या मनी येताच त्या दिशेनं त्यांनी पावलं उचलली. त्यातून जन्माला आला- ‘मधुरव’ हा भाषिक रंगाविष्कार! भाषेचा इतिहास रंजकरीत्या प्रेक्षकांसमोर मांडणं एवढाच यामागे त्यांचा हेतू नव्हता, तर त्यानिमित्तानं मराठी भाषेला योगदान देणाऱ्या महानुभावांची गाथाही त्यांना रसिकांपर्यंत मांडायची होती.

त्याकरता संकल्पना आणि संशोधनाची जबाबदारी समीरा गुजर यांनी स्वीकारली. त्यांचा मराठी भाषेचा अभ्यास सखोल आणि सर्वस्पर्शी आहे. तो मनोरंजनाच्या अवगुंठनातून कसा सादर करता येईल याचंही भान त्यांच्यापाशी आहे. मग त्यांच्या प्रवाही संहितेचं रंगाविष्कारात रूपांतर करण्याची दिग्दर्शकीय कामगिरी मधुरा वेलणकर यांनी आपला कलाकीर्दीतील दीर्घ अनुभव पणास लावून स्वीकारली. आकांक्षा गाडे आणि आशीष गाडे या मराठी भाषेच्या लय-ताल-रंग-रूपांची चांगली जाण प्रकट करणाऱ्या सहकलाकारांसोबत त्यांनी स्वत:च ‘मधुरव’चं हे शिवधनुष्य पेलण्याचं ठरवलं. आणि आकारास आला- ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ हा रंगाविष्कार!

खरं तर मराठी भाषेचा रंगमंचीय इतिहास म्हणजे काहीतरी कंटाळवाणं सादरीकरण असणार असा आपला (नाहक) समज होऊ शकतो. परंतु ‘मधुरव’मध्ये हा प्रवास अत्यंत सुखद आणि मनोरंजकरीत्या होतो. याचं कारण कालानुरूप मराठीच्या विकासाचे जे अनेक टप्पे यात उलगडले गेले आहेत, त्यात म्हाइंभटाचं ‘लीळाचरित्र’, मराठीची प्राचीनता दर्शवणारे अक्षी (जि. रायगड) तसंच दिवेआगारचे पुरातन शिलालेख, सातवाहन, यादव आणि वाकाटक राजवटींतील बोलीचं रूप, ‘गाथा सप्तशती’ची विलक्षण निर्मितीकथा, ज्ञानेश्वरीचं प्राकृत रूप, संत-पंत-तंत कवींच्या रचना, शिवाजी महाराजांच्या काळातील मराठीचा लहेजा, पुढे ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकरांचं विलक्षण विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्व, त्यांचं जगातील दहा भाषांवरचं प्रभुत्व, फ्रेंच राजांकडून फ्रेंचबद्दल त्यांचा झालेला गौरव, इंग्रजी अमदानीतील पहिले एतद्देशीय प्राध्यापक होण्याचा त्यांना मिळालेला बहुमान, कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून त्यांची झालेली नियुक्ती आणि त्यांची सर्वात महनीय कामगिरी म्हणजे ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत त्यांनी काढली. आणि हे सगळं त्यांनी केलं ते अवघ्या ३४ वर्षांच्या आपल्या तुटपुंज्या आयुष्यात! असे अनेकानेक विलक्षण भारावून टाकणारे संदर्भ मराठी भाषेच्या या प्रदीर्घ प्रवासात आपल्याला कळत जातात, तेव्हा अक्षरश: दिग्मूढ व्हायला होतं. आणि आपण या भाषेचे एक पाईक आहोत याचा सार्थ अभिमान वाटायला लागतो. ‘मधुरव’मध्ये लोकप्रिय साहित्यिकांच्या साहित्याचा वापर कटाक्षानं टाळलेला आहे. कारण ते सर्वपरिचित आहे. त्याऐवजी मराठीच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासातले वेगवेगळे टप्पे दाखवताना त्यातल्या गमतीजमती, अपरिचित माहिती यांवर अधिक भर दिलेला आढळतो. त्यामुळेच अगणित व्याख्यानं, लक्षावधी पृष्ठांचं वैविध्यपूर्ण साहित्य आणि कायद्यच्या बडग्यानं जे साध्य होणार नाही ते या ‘मधुरव’ने साध्य होतं याचा सार्थ प्रत्यय हा ‘प्रयोग’ पाहणाऱ्याला आल्याशिवाय राहत नाही.

कविता, गाणी, नृत्य, शाहिरी पोवाडे, निवेदन, सवाल-जबाब अशा विविधांगी कलांचा वापर ‘मधुरव’मध्ये केलेला आहे; जेणेकरून हा प्रवास उत्तरोत्तर रंजक होत जातो. लेखिका समीरा गुजर यांचा मराठीचा दांडगा अभ्यास आणि त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनशैलीनं ‘मधुरव’ची संहिता ओघवती आणि रोचक उतरली आहे. मधुरा वेलणकर-साटम यांनी संहितेतील आशय उत्कटपणे पोचवण्याचं काम दिग्दर्शनातून केलेलं आहे. आजच्या पिढीला हा प्रवास समजावून देताना त्यांना त्यात रस निर्माण होईल हे त्यांनी कसोशीनं पाहिलं आहे. सोनिया परचुरे यांची नृत्यरचना, श्वेता बापट-अंकिता जठारांची सांकेतिक वेशभूषा, श्रीनाथ म्हात्रे यांचं संगीत, शीतल तळपदे यांची नाटय़ाशय उठावदार करणारी प्रकाशयोजना, प्रदीप पाटील यांचं अर्थवाही नेपथ्य यांनी या रंगाविष्काराचं दृश्य-श्राव्य रूप उत्तमरीत्या सजवलं आहे. कलाकार मधुरा वेलणकर-साटम, आकांक्षा गाडे आणि आशीष गाडे यांनी प्रसन्नतेचा शिडकावा करत मराठीचा हा प्रवास नेत्रसुखद आणि श्रवणीय केला आहे. त्यांची अंतरीची कळकळ त्यातून प्रतिबिंबित होते.

Story img Loader