रवींद्र पाथरे

गेली तीनेक दशकं आपल्याकडे जरी ‘रामराज्य’ आलेलं नसलं तरी रामाला मात्र बरे दिवस आले आहेत. रामाची प्रखर नैतिकता, सत्यनिष्ठा, जनतेप्रती बांधिलकी वगैरे आपल्याला तितकीशी महत्त्वाची वाटत नसली तरी राम हे आजकाल चलनी नाणं झालेलं आहे. त्याचा जप केला नाहीत तर तुम्ही देशद्रोही ठरता. असो. हे वास्तव या ठिकाणी मांडायचं कारण हे की, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित ‘जाळियेली लंका’ हे नाटक!

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करुन रोकड लूटीचा प्रयत्न; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Action taken against bullet driver who makes loud noise
नागपूर : फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे त्रस्त! पोलिसांनी शेकडो सायलेन्सर…

एका गावात रामलीलेचा खेळ पार पडतो. पण तो फारसा न रंगल्यानं प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवलेली असते. त्यामुळे तो खेळ लावणारा कॉन्ट्र्ॅक्टर भैसाटलेला असतो. आणि काहीही करून या प्रयोगात घातलेले आपले पैसे वसूल करण्यासाठी तो नवा खेळ रचतो.

रामलीला संपली असली तरी त्यातल्या हनुमानाच्या शेपटीला लागलेली आग विझलेली नसते. ती विझवायची कुणी तसदी घेत नाही. त्यामुळे हनुमानाची भूमिका करणारा नट (रघू) मंडपातून निघून जाऊ शकत नाही. आधीच तो बदली नट म्हणून या रामलीलेत काम करत असतो. त्यात आणखीन ही नस्ती आफत ओढवलेली. कॉन्ट्रॅक्टर मंडप काढण्यासाठी हातघाईला आलेला. त्याचा पोऱ्या हनुमानाला विनवतो की, ‘तुम्ही गेलात तर मी मंडप काढायचं काम करून माझ्या शाळेत जाऊ शकेन.’ पण शेपटी विझवल्याशिवाय आपण मंडप कसा सोडणार, ही हनुमानाची पंचाईत. तो याला त्याला प्रत्येकाला विनवून बघतो. पण कुणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही. रामही राज्याभिषेकासाठी अयोध्येला निघून गेलेले.. त्याच्याविना. त्यांनाही त्याची कमी न जाणवलेली.

अशात एक मीडियावाली (वाहिनी) त्याची मुलाखत घ्यायला येते. हनुमान तिच्याकडे शेपूट विझवण्यासाठी पाणी मागतो. तर ती आपल्याकडची बिसलरीची बाटली एका दमात संपवून टाकते. आणि या घटनेचं लाइव्ह प्रक्षेपण सुरू करते.

हनुमानाची शेपटी न विझल्याने रामलीलेचा खेळ कसा अर्धवट थबकलाय, हनुमानाची भलतीच पंचाईत झालीय, त्यामुळे सबंध मंडपालाच कशी आग लागायची दाट शक्यता आहे, या आगीत सबंध गावच कसं भक्ष्यस्थानी पडण्याची भीती आहे.. वगैरे वगैरे ती तारस्वरात सांगतेय. तेवढय़ात आपलं नाईटचं पाकीट न मिळाल्यानं राम आणि रावण माघारी येतात. ते वाहिनीच्या आयतेच तावडीत सापडतात. ती त्यांना या घटनेवरची त्यांची प्रतिक्रिया विचारते. त्यांना त्यात फारसा रस नसतो. ते थातुरमातुर उत्तरं देतात. वाहिनीवरील या बातमीने सगळ्या देशात खळबळ उडते. देशातली सगळी हनुमान मंदिरं बंद केली जातात. कॉन्ट्रॅक्टरच्या लेखी ही बाब फारशी गंभीर नसते. पण मीडियातील बातमीने हलकल्लोळ माजलेला असतो.

वाहिनी गाववाल्यांसह फायर बिग्रेड, सरपंच, तहसीलदार, सीएमओ (ऊर्फ उपमुख्यमंत्र्यांचं ऑफिस.. कारण तेच सीएमच्या वतीनं काम बघतं!), पीएमओ इथवर गोष्टी जातात. जो तो ‘आपला याच्याशी काहीही संबंध नाही’ असं सांगत या घटनेकडे दुर्लक्ष तरी करतो किंवा ती अंगालाच लावून घेत नाहीत, किंवा मग तिसरंच काहीतरी खुसपट काढतात. मूळ प्रश्न तसाच लटकत राहतो. हनुमानाची शेपटी विझवण्यात कुणालाच स्वारस्य नसतं. मात्र, पीएमओ ऑफिसकडे प्रकरण जाताच खडबडून सूत्रं हलतात. फायर बिग्रेडच्या असंख्य गाडय़ा गावात येतात. पण त्या आग विझवायच्या भानगडीत मात्र पडत नाहीत. कारण त्यांना तसा वरून आदेश आलेला नसतो. समारंभपूर्वकच आग विझवायची असते. त्यासाठी नेते दस्तुरखुद्द जातीने गावात येणार असतात आणि स्वत: प्रत्यक्ष आदेश देणार असतात. त्यानंतरच आग विझवण्याची रीतसर कार्यवाही होणार असते. दरम्यान, हनुमान या सगळ्या भानगडींनी कावून जातो. हे सारं काय चाललंय, त्याला कळत नाही. मीडिया सोयीस्कररीत्या ती ‘आग’ पेटवत ठेवते. यानिमित्तानं कुणाची इच्छा असो-नसो, प्रत्येकाचीच ‘मीडिया ट्रायल’ सुरू असते. अर्थातच मीडियाच्या सोयीने!

शेवटी अकस्मात पाऊस येतो आणि हा प्रश्न आपोआपच मिटतो. लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख हे ‘देवबाभळी’सारख्या स्त्रीवादी नाटकानंतर थेट वर्तमानाकडेच वळले आहेत. मध्यंतरीच्या त्यांच्या एकांकिका त्याची साक्ष देतात. आज देशात काय घडते आहे, यावर कुणीच काही बोलायला राजी नाहीए. उगा आपल्या हातून कळत वा नकळत घडलेल्या, किंवा न घडलेल्या गुन्ह्य़ातदेखील स्वत:ला अडकवून घेऊन ईडी, सीबीआयची नस्ती भानगड आपल्यामागे कोण लावून घेणार? त्यापेक्षा अळीमिळी गुपचिळी बरी! अशा नि:शब्द वातावरणात प्राजक्त देशमुख यांच्यासारखा सजग लेखक काहीएक मांडू पाहतोय, म्हणू पाहतोय, हे सध्याच्या काळ्याकुट्ट, कानठळ्या बसवणाऱ्या शांततेत काहीसं आशादायी चित्रच म्हणावं लागेल. इतक्या थेटपणे वर्तमानावर भाष्य करण्यासाठी जे एक धाडस लागतं, ते या तरुण लेखकानं दाखवलं आहे. त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन.

एक लेखक म्हणून ते सर्वपरिचित आहेतच, पण यानिमित्ताने आपण एक चांगले दिग्दर्शकही आहोत हे त्यांनी सिद्ध केलं आहे. नाटकातील आशय प्रत्यक्ष रंगमंचीय सादरीकरणात अधिकाधिक धारदार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांची लोकपरंपरेतील नाळ या ठिकाणी त्यांना उपयोगी पडली आहे. परंपरा आणि नवता यांचं इतकं सुंदर रसायन त्यांनी ‘जाळियेली लंका’मध्ये वापरलं आहे की त्यास भरभरून दाद द्यायला हवी. भोवतालाकडे ते किती सतर्कतेनं पाहतात, आजूबाजूला घडणाऱ्या घटना नीट समजून घेऊन त्यावर उपहास, उपरोधातून कसं व्यक्त होता येतं, हे त्यांनी या आगळ्या ‘प्रयोगा’तून दाखवलं आहे. ज्या त्या गोष्टीचं ‘इव्हेन्टी’करण करून त्या गुंगीत सर्वसामान्यांना मग्न ठेवायचं आणि आपल्याला हवं ते साध्य करायचं- हे आजचं वर्तमान. ते जनतेच्या हिताचं आहे किंवा नाही, हे महत्त्वाचं नाही; पण ते आपल्या राजकारणाच्या दृष्टीनं हिताचं असणं जास्त गरजेचं. त्यासाठी खरं-खोटय़ाचं भ्रमजाल निर्माण करायचं आणि तेच खरंय म्हणत लोकांच्या गळी उतरवायचं, हे आज सर्रास घडताना दिसतं आहे.

अर्थनिरक्षर, राजकारणातले तेढेमेढे न समजणारी किंवा समजूनही ‘मला काय त्याचं?’ म्हणणारी, समाजभान पूर्णता गमावलेली, स्वार्थालाच परमार्थ मानणारी, ‘मुकी, बिच्चारी’ जनता त्यात वाहवून जात आहे. आणि राज्यकर्त्यांना हेच तर हवं आहे. या साऱ्याचं सम्यक दर्शन ‘जाळियेली लंका’मध्ये घडतं. ज्यानं या सगळ्या बाबतीत प्रबोधन करायचं तो मीडिया एकतर विकला तरी गेला आहे किंवा त्याला या ना त्या प्रकारे दबावाखाली तरी ठेवलं जात आहे, किंवा मग टीआरपी व ‘धंद्या’तच त्याला रस आहे.. अशा सर्वागी निराश वातावरणात हे नाटक प्रकाशाची मिणमिणती पणती घेऊन आलं आहे. तिनं अंधार दूर होईल असं नाही, परंतु अंधुकसं तरी काही दिसू शकेल.. अर्थात ज्यांना बघायचं, समजून घ्यायचं आहे, त्यांनाच! या अर्थानं हे आजच्या काळाचं महत्त्वाचं नाटक आहे.

प्राजक्त देशमुख यांनी नेपथ्यादीचा फार फापटपसारा न मांडता सूचक तांत्रिक अंगांतून यातलं नाटय़ अधिक टोकदारपणे बाहेर कसं येईल याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. कलाकारांच्या अचूक निवडीतून त्यांनी अर्धीअधिक लढाई आधीच जिंकलेली आहे. गात्या, नाचत्या कोरसच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील आशयसूत्र अधिकच ठाशीव करण्याचं काम केलं आहे.

‘जाळियेली लंका’ची संहिता ही उत्तम वाङ्मयीन गुणवत्तेचा वानवळा आहे. अतिशयोक्ती, उपहास, उपरोध यांचं चमत्कारिक मिश्रण करीत आपल्याला जे म्हणायचं आहे ते ठोसपणे लेखकानं यातून मांडलेलं आहे. यातली पात्रं, त्यांचं कर्म, त्यांचं व्यक्त होणं हेही ध्वन्यार्थानं बरंच काही सांगून जातं.. बोलकेपणानं मांडतं. त्यांची वेशभूषा, दिसणं, असणं यातूनही प्राजक्त देशमुख खूप काही सुचवून जातात. व्यक्त करतात. नाटक ही सांघिक अभिव्यक्ती आहे हे तर सर्वानाच माहीत आहे. परंतु त्याचा एकजीवी प्रत्यय फार कमी वेळा येतो. ‘जाळियेली लंका’ हा एक सुंदर अपवाद आहे. हा नाटय़ानुभव- नव्हे जीवनानुभव आपलं जगणं समजून घेण्यासाठी प्रत्येकानं आवर्जून पाहायला हवा. नाटकाशी संबंधित प्रत्येकानं या रंगमंचीय सादरीकरणात आपलं सर्वस्व ओतलं आहे.

‘जाळियेली लंका’.

 लेखक-दिग्दर्शक-गीते : प्राजक्त देशमुख, संगीत : श्रीनाथ म्हात्रे, नेपथ्य : रोहन रहाटे, वेशभूषा : श्रेया म्हात्रे, प्रकाश : अमोघ फडके

कलाकार : यादव/ राम : योगेश्वर बेंद्रे, देशमुख/ रावण : अजिंक्य मणचेकर, रघू/ हनुमान : मयूरेश केळुसकर, वाहिनी : साजिरी जोशी, कंत्राटदार : ओंकार सातपुते, बॉडीगार्ड : प्रतीक्षा फडके, पोऱ्या : प्रज्वल कदम, सरपंच/ सीएमओ/ जनता : सानिका शिंदे, पीएमओ/ तहसीलदार : दिव्या जानकर, अन्य : अनिरुद्ध नारायणकर, श्रीनाथ म्हात्रे, मयूर शिंदे, चेतन वाघ, अदित गंगाखेडकर.

Story img Loader