रवींद्र पाथरे
गेल्या काही काळात रहस्यनाटकांची एक लाट येऊ पाहतेय की काय असं वाटावं अशा तऱ्हेनं रहस्यनाटय़ं रंगभूमीवर येत आहेत. या लाटेचे प्रवर्तक लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे हे आहेत. केंकरे यांनी सगळ्याच पठडीतली नाटकं दिग्दर्शित केलेली आहेत. सामाजिक, विनोदी, फार्सिकल, रहस्यरंजक, प्रायोगिक, समांतर अशा सगळ्या प्रवाहांत त्यांनी मुशाफिरी केलेली आहे. शेक्सपीअरचीही अनेक नाटकं त्यांनी करून पाहिली आहेत. येत्या काही दिवसांत ‘काळी राणी’ हे त्यांचं शंभरावं नाटक घेऊन ते येत आहेत. यावरून किती दीर्घ पल्ला त्यांनी गाठला आहे याची कल्पना यावी. त्यांच्या लेखी काहीच वज्र्य नाही. सतत नवे ‘प्रयोग’ करत राहणं आणि त्यातून स्वत:लाच आव्हान देणं ही यामागची त्यांची भूमिका आहे. त्यात ते कधी यशस्वी होतात, तर कधी अयशस्वी. पण ‘प्रयोग’ करायला ते घाबरत नाहीत. सध्या त्यांना त्यांचा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधील विद्यार्थी नीरज शिरवईकर लेखक म्हणून सापडला आहे. ज्याच्या लेखणीतून उतरलेली नाटकं ते एकापाठोपाठ रंगभूमीवर आणत आहेत. त्यातही सध्या ते विशेषत्वानं रहस्यनाटय़ं प्राधान्यानं करताहेत. ‘अ परफेक्ट मर्डर’च्या यशानंतर पुनश्च या दुकलीनं ‘यू मस्ट डाय’ हे अॅगाथा ख्रिस्ती यांच्या नाटकावर आधारित (नाटकाचं नाव सांगणं उचित ठरणार नाही. कारण त्यानं नाटकातला सस्पेन्स संपेल.) नवं नाटक सादर केलं आहे.
खुनाची उकल ही सर्वसाधारणत: कुठल्याही रहस्यनाटय़ाची थीम असते. तशी ती इथेही आहे. मात्र, यात कुठल्याही प्रकारचा थरार वगैरे बिलकूल नाही.. तर अनेक पात्रांकडे संशयाची सुई दाखवत शेवटी अगदी भलताच एक खुनी निघतो. रहस्यनाटय़ात हे असतंच. असायलाच हवं. तर.. नाटकाच्या प्रारंभी पडदा उघडायच्या आधीच एका नवरा-बायकोत संशयावरून कडाक्याचं भांडणं होतं आणि एका क्षणी बायको आपल्या या क्रूरकर्मा नवऱ्याच्या भयानक छळाला कंटाळून त्याला गोळ्या घालून ठार करते.. आणि पडदा उघडतो.
त्यावेळी रात्रीच्या कभिन्न काळोखात कुणी एक महेश माने नामक इसम त्याची गाडी त्या बंगल्याला धडकल्याने मदतीच्या आशेनं बंगल्यात शिरतो. खंडाळ्याच्या त्या कडाक्याच्या थंडीत रात्री प्रचंड धुक्यामुळे दीड-दोन फुटांवरचा रस्ताही नीट दिसत नसल्याने त्याच्या गाडीचा अपघात झालेला असतो. मात्र, तो बंगल्यात प्रवेश करतो तेव्हा तिथं आधीच कुणा अपंग माणसाचा खून झाल्याचं त्याला दिसतं. समोर उभी असते भीतीनं थरथरणारी मालती. आपणच आपल्या नवऱ्याचा (अनुरागचा) खून केल्याचं कबुलीजबाब देणारी! क्षणभर तो गडबडतो. मग यथावकाश सावरतो. तिच्याकडे नेमकं काय आणि कसं घडलं याची चौकशी करतो. ती खरं काय ते सांगून टाकते. व्हीलचेअरला खिळून असलेल्या नवऱ्याच्या छळकथांचा जणू पाढाच वाचते ती. तिला पोलिसांच्या स्वाधीन व्हायचंय. ती त्याला पोलिसांना फोन करायला सांगते. महेशला तिची खून करण्यामागची अगतिकता कळते. तिनं ज्या परिस्थितीत खून केला आहे ते तिच्या भावनोद्रेकाच्या तिरमिरीत घडलंय. या खुनाच्या आरोपातून तिला बाहेर काढायला मदत करण्याचं मग तो ठरवतो. मालतीला यातून बाहेर काढायचं तर दुसऱ्या कुणीतरी तो खून केला असणार हे भासवण्यासाठी तो प्रथमदर्शनी पुराव्यांची मांडामांड करतो!
खुनाची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी येतात. तपास सुरू होतो. घरातल्या सगळ्यांचे रीतसर जाबजबाब घेतले जातात. मालती, अनुरागची सावत्रआई मनोरमा, तिचा मतिमंद मुलगा अमोघ, घरातले नोकर गोविंद आणि ज्युली, आगंतुक महेश माने तसंच या घटनेची खबरबात घ्यायला आलेला तिथला युवा राजकारणी सिद्धेश वर्दम अशा सगळ्यांची चौकशी इन्स्पेक्टर घारगे करतात. अनुरागचा कुणी शत्रू होता का, याचीही चाचपणी केली जाते. तेव्हा काही वर्षांपूर्वी अनुरागच्या गाडीच्या धडकेत एक कुटुंब बळी पडल्याची घटना समोर येते. त्या कुटुंबातील वाचलेल्या गृहस्थाने बदला घेण्याच्या उद्देशाने तर हा खून केला नसेल ना..? या दिशेनंही मग तपास सुरू होतो.
दरम्यान, मालतीच्या घरातील मंडळींची संशयास्पद संभाषणं या गुंत्यात आणखीनच भर घालतात. त्यामुळे खुनी हीच व्यक्ती तर नसेल, अशी संशयाची सुई प्रत्येकाकडे वळत राहते. शेवटी रहस्याचा पर्दाफाश होतो तो एका वेगळ्याच नोटवर..
लेखक नीरज शिरवईकर यांना रहस्यनाटय़ाची किल्ली सापडलीय असं वाटावं अशीच या नाटकाची एकूणात रचना त्यांनी केली आहे. वातावरणनिर्मितीपासूनच याची सुरुवात होते. खंडाळ्यातील दाट धुकं हेही नाटकातील एक महत्त्वाचं पात्र आहे. त्याच्या असण्यातून हे रहस्य अधिकाधिक गडद होत जातं. सगळ्याच पात्रांचं संशयाचा काटा आपल्याकडे वळावा अशा तऱ्हेचं वर्तन नाटकातील रहस्याचा गुंता आणखीनच वाढवतं. प्रेक्षकही या गुंत्यात मग हळूहळू अडकत जातो.
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘यू मस्ट डाय’ नाटकाद्वारे रहस्यनाटय़ावरची आपली पकड घट्ट केल्याचं जाणवतं. पात्रांचे स्वभावविभाव, त्यांचं वागणं-बोलणं, देहबोली, लकबी यांतून रहस्याची वीण ते हळूहळू बांधत जातात. शेवटाकडे रहस्याच्या उलगडय़ाचा अदमास येतो खरा, परंतु तोवर आपण त्यात पुरते गुंतून गेलेलो असतो. असो. एकंदरीत नाटक खिळवून ठेवतं.
नीरज शिरवईकरांनी खंडाळ्यातील श्रीमंती बंगल्याचं नेपथ्य उत्तमरीत्या आकारलं आहे. शीतल तळपदे यांनीही प्रकाशयोजनेतून दाट धुक्याची गूढ रात्र वास्तवदर्शी साकारली आहे. अशोक पत्की यांच्या पार्श्वसंगीतानं यातल्या रहस्यमयतेला आपला ‘आवाज’ दिला आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि राजेश परब यांच्या रंगभूषेनं पात्रांना व्यक्तित्वं प्रदान केली आहेत. सौरभ गोखले यांनी आगंतुक महेश मानेची गूढ रहस्यमयता शेवटपर्यंत कायम राखली आहे. नवऱ्याच्या भीषण क्रौर्याने हवालदिल झालेली, त्यापायी वेगळ्याच धारेला लागलेली मालती (अनुरागची पत्नी) शर्वरी लोहोकरे यांनी तिच्या द्विधावस्थेनिशी समूर्त केली आहे.
प्रमोद कदम यांनी नोकर गोविंदाचं रहस्यमय पात्र रंजकतेनं साकारलं आहे. अजिंक्य भोसलेंनी तरुण होतकरू, हिशेबी राजकीय नेता (सिद्धेश वर्दम) संयत अभिव्यक्तीद्वारे छान वठवला आहे. संदेश जाधव यांनी इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे मुद्राभिनयातून पुरेशी पोलिसी जरब व्यक्त केली आहे. नेहा कुलकर्णी यांची गोवन ज्युली लोभस! हर्षल म्हामुणकर (अमोघ), विनिता दाते (मनोरमा पाठारे) धनेश पोतदार (इन्स्पेक्टर शिंदे) यांनीही आपली कामं चोख केली आहेत.