रवींद्र पाथरे

एखादं नातं कसं वर्क होतं याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही. प्रत्येक माणूस स्वभाव, वृत्ती-प्रवृत्तीने वेगवेगळा असतो. त्यातही लग्नाच्या नात्याने एकत्र येणारे दोन भिन्न जीव वेगळं वातावरण, परिस्थिती, भोवताल, माणसं अशा सगळ्याच बाबतींत वेगवेगळ्या तऱ्हेनं घडलेले असतात. त्यामुळे त्यांचं एकत्र येणं अनेकदा एकमेकांना त्रासदायकही ठरू शकतं. राधा आणि समरचं एकत्र येणं असंच ठरतं. राधाला परस्परांचं सगळंच एकमेकांना माहीत असावं, त्यांचं काहीच एकमेकांपासून सीक्रेट असू नये असं वाटत असतं. तर समरला लग्नानंतरही आपली म्हणून एक स्पेस असायला हवी असते. सुरुवातीला सगळं प्रेमात खपून जातं. पण नंतर एकमेकांचं अति एकत्र असणं समरला त्रासदायक वाटू लागतं. आणि ते वेगळे होतात.

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
Grah Gochar September 2024 Chaturgraha yoga
आता पडणार पैशांचा पाऊस! सप्टेंबर महिन्यात निर्माण होणार चतुर्ग्रही योग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार चांदी

पुढे समर सतीच्या प्रेमात पडतो. ती त्याच्यासारखीच स्वतंत्र वृत्तीची असते. तिला तिचं आयुष्य स्वतंत्र राहिलेलं हवं असतं. राधालाही अबीर भेटतो. तो तिच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो. तिच्याशिवाय आपलं आयुष्य पूर्ण होऊच शकत नाही असं त्याला वाटतं. तिच्याभोवतीच त्याचं आयुष्य फिरत असतं. राधाला प्रारंभी ते आवडतंही. पण नंतर तिला त्याचा काच व्हायला सुरुवात होते. ते एके ठिकाणी फिरायला जातात. नेमके समर आणि सतीही तिथंच आलेले असतात. त्यांची समोरासमोर गाठ पडते. तिथं राधा आणि समरने जमीन घेतलेली असते. तिचा व्यवहार पुढच्या आठवडय़ात होणार असतो. पण अचानक ते एकमेकांसमोर आल्यावर सगळ्यांनाच ऑकवर्ड होतं. त्यात ते नेमके शेजारच्याच सूटमध्ये उतरलेले असतात. साहजिकच ते अधूनमधून एकमेकांसमोर येणं स्वाभाविक असतं. त्यातून त्यांच्यात झकाझकी सुरू होते.

अबीरला समरच्या तिथल्या अस्तित्वानं असुरक्षित वाटू लागतं. समरने लगेचच आपल्यापासून वेगळं झाल्यावर सतीत गुंतणं राधालाही पचनी पडत नाही. अर्थात सतीला यानं काहीच फरक पडत नाही. ती प्रॅक्टिकल वृत्तीची असते. त्यात सतीला अचानक दिल्लीच्या नोकरीची ऑफर येते आणि ती जायचं ठरवते. समरला ते मान्य नसतं. तिने त्याचा विचार न करता आपला आपण निर्णय घेणं त्याला आवडत नाही. पण सती आपल्या निर्णयावर ठाम असते. एकेकाळी आपल्याला स्पेस हवी असं म्हणणारा समर आता सतीला तशी स्पेस द्यायला राजी नसतो. त्यात राधाला अबीरचं आपल्यात नको इतकं गुंतणंही डोक्यात जातं. तिलाही आपलं सुटं आयुष्य असावं असं वाटत असतं. आपण अबीरशी जवळीक करण्याची नको इतकी घाई केली असं तिला वाटू लागतं. अजूनही आपण समरमध्ये गुंतलेलो आहोत हेही तिच्या लक्षात येतं. समरलाही आपण राधाच्या बाबतीत चुकलोच हे कळून येतं.

पुढे काय होणार, होतं हे प्रत्यक्ष नाटकात बघणंच योग्य. लेखिका इरावती कर्णिक यांनी नात्यातील तिढय़ांचं हे नाटक अधिक कॉम्प्लेक्स कसं होईल हे पाहिलं आहे. प्रत्येक व्यक्तीची धारणा, स्वभाव, वृत्ती आणि त्यातून घडणारी, बिघडणारी नाती त्यांनी नेमकेपणानं मांडली आहेत. त्यातली गुंतागुंत आणि ते व्यक्त करण्याची पद्धती यांच्या टकरावातून हे नाटक पुढे सरकत जातं. चार भिन्न व्यक्ती, त्यांच्या व्यक्त होण्याच्या, जगण्याच्या तऱ्हा यात त्यांनी मांडल्या आहेत. त्या समजून घेण्याच्या, त्यातून मार्ग काढण्याच्या रीतीचं हे नाटक आहे. प्रेक्षकालाही ते त्रास देतं. जर अमुक घडतं तर काय झालं असतं, असा प्रश्न प्रत्यही त्याला पडत जातो. पण ते कुणाच्याच हातात नसतं. ती, ती व्यक्तीच आपलं बरं-वाईट काय ते ठरवत असते. ते फक्त पाहत राहणं एवढंच आपल्या हाती उरतं.

दिग्दर्शक अद्वैत दादरकर आणि रणजीत पाटील यांनी संहितेतले तिढे, पेच यथातथ्यपणे बाहेर काढले आहेत. चारही व्यक्तिरेखा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं उभ्या राहतील असं पाहिलं आहे. त्यांच्यातले संघर्षांचे क्षण, समजुतीचे प्रसंग, विसंवाद, संवाद सगळं सगळं पारदर्शीत्वानं प्रयोगात उतरतं. आणि शेवटी त्यांनी एकमेकांना समजून घेणं घडतं. संदेश बेंद्रे यांनी हिल स्टेशनचं वातावरण वास्तवदर्शी साकारलं आहे. त्यांनी वेगवेगळी नाटय़स्थळं सांकेतिक आणि वास्तववादी पद्धतीनं उभारली आहेत. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजनेतून नाटय़ांतर्गत ताण वाढवत नेला आहे. श्रीनाथ म्हात्रे यांचं संगीत आपली भूमिका चोख बजावतं. प्राजक्त देशमुख यांचं गीत नाटकाची मागणी पुरवणारं. महेंद्र झगडे (रंगभूषा) आणि श्वेता बापट यांची वेशभूषा पात्रांना व्यक्तिमत्त्व बहाल करतात.

उमेश कामत यांनी समरचं हॅपी गो लकी व्यक्तिमत्त्व छान साकारलंय. पुढची कॉम्प्लिकेशन्सही त्यांनी तितक्याच ताकदीनं व्यक्त केलीयत. प्रिया बापटचं सर्वस्व झोकून प्रेम करण्याची वृत्ती, त्यात आलेलं अपयश आणि त्यातून कोमेजलेलं तिचं मन उत्कटपणे व्यक्त केलंय. तिला आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या त्रुटीची जाणीव झाल्यावर झालेला साक्षात्कारही खराच. अबीरचं प्रेमातलं असुरक्षितपण आणि त्यातून येणारी अनिश्चितता आशुतोष गोखले यांनी कमालीच्या आसक्तीतून दृगोचर केलीय. त्यांचं अ‍ॅब्नॉर्मल वागणं-बोलणं त्याचंच प्रतीक होय. सतीचा बिनधास्तपणा, तिची स्वतंत्र वृत्ती, त्यातून आलेलं आला क्षण भोगायची वृत्ती पल्लवी अजय हिने सार्थपणे दाखवलीय. प्रत्येक गोष्टीत ‘सॉर्ट आऊट’ असणं तिने नीटसपणे दर्शवलंय. मानवी वृत्ती-प्रवृत्तीचं विश्लेषण करणारं हे नाटक नक्कीच आपल्या समजुतीत भर घालतं.