पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांचा कला, साहित्याचा वारसा घेऊन पुढील पिढीतील नाथ पुरंदरे आता स्वत:ची वाट निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीमधून औपचारिकरीत्या चित्रपट माध्यमाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता थेट हॉलीवूडमध्ये धडपड करून स्वत:चा नवा प्रवास सुरू करण्यासाठी नाथ सज्ज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘साहसी खेळांमध्ये मी सक्रिय होतो. ते आवडतही होतं, मात्र अचानक ते सगळं बंद झालं. शाळेत असताना नाटकात काम केलं असल्यानं साहसी खेळाला पर्याय म्हणून नाटक करावंसं वाटू लागलं. स. प. महाविद्यालयाच्या कला मंडळात बॅकस्टेज करणं, ड्रम्स वाजवणं इथपासून सुरुवात झाली. पुढे अभिनय, दिग्दर्शन केलं. अनेक पारितोषिकंही मिळाली. ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्येही दोन एकांकिका सादर केल्या होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये एकांकिका, दीर्घांक, दोन अंकी नाटक, व्यावसायिक नाटकं केली. समविचारी मित्रांबरोबर गप्पाटप्पा, तालमी करणं हे नाटकाचं वातावरण आवडत होतं, मात्र या सगळ्यांत गोष्ट सांगण्याची आवड, उत्सुकता जास्त होती,’ असं नाथनं सांगितलं.

हेही वाचा >>>अंकिता वालावलकरने तिची आवडती कार का विकली? कारण सांगत ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणाली…

‘करोनाकाळात नाटक करणं बंद झालं. त्यामुळे नाटकापेक्षा वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नातून नाथनं त्याच्या मित्रांबरोबर लघुपट करण्याचा घाट घातला. ‘बार्बरिक’सारखे काही लघुपट केल्यानंतर त्याला चित्रपट या माध्यमाची आवड निर्माण झाली. अधिक आकर्षण वाटू लागलं, मात्र ते केवळ हौशी पातळीवर राहण्यापेक्षा त्याचं रीतसर शिक्षण घेण्याचीही त्याला गरज जाणवू लागली. त्यामुळे त्याने अॅकॅडमीत प्रवेश घेऊन चित्रपटाचं रीतसर शिक्षण घेतलं. या दोन वर्षांच्या काळात त्याला अनेक लघुपटांसाठी काम करता आलं. अभ्यासक्रम पूर्ण होताना कराव्या लागणाऱ्या लघुपटासाठी अभिनेते जॅकी श्रॉफ, अनुजा साठे या कलाकारांना घेऊन नाथनं ‘जमीर’ हा लघुपट दिग्दर्शित केला. हा लघुपट स्टुटगार्ड, पुणे, बंगळूरु, लंडन येथील महोत्सवांमध्ये दाखवला गेला.

न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीतील शिकण्याच्या अनुभवाविषयी नाथ म्हणाला, ‘अतिशय समृद्ध करणारा असा अनुभव होता. चित्रपटाच्या विविध अंगांविषयी बारकाईनं शिकता आलं. कलात्मकतेच्या पलीकडे जाऊन चित्रपट क्षेत्र हे व्यवसाय म्हणून कसं आहे हे समजून घेता आलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन लघुपट, काही म्युझिक व्हिडीओसाठी काम केलं. ‘जमीर’ हा लघुपट यू ट्यूबद्वारे सादर करणार आहे. जेणेकरून तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल. तसेच आता हॉलीवूडमध्ये जाऊन व्यावसायिक म्हणून माझा स्वत:चा प्रवास सुरू होणार असल्याची उत्सुकता आहे.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nath purandare new york film academy film hollywood entertainment news amy