मनोरंजनाचा सर्व मसाला असणारा चित्रपट मराठी प्रेक्षकांना नेहमीच आवडतो. दीपक कदम दिग्दर्शित ‘आयपीएल’ हा मराठी चित्रपटदेखील विनोद, संवेदनशील प्रेम आणि नाट्य असा सर्व प्रकारचा मनोरंजनाचा मसाला असणारा चित्रपट आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती पार्श्वगायिका बेला शेंडे हिच्या आवाजात आयटम साँग ध्वनिमुद्रित करून चित्रपटाचा मुहुर्त करण्यात आला. अभिजीत कुलकर्णी लिखित या गाण्याला आशिष डोनाल्डने संगितबध्द केले आहे. चित्रपटात एकूण चार गाण्यांचा समावेश आहे.
एमआरडी फिल्मसच्या बॅनरखाली तयार करण्यात येणाऱ्या या चित्रपटाचे निर्मिते मुश्ताक अली (मिन्टू) आणि मोहनराव पुरोहित हे आहेत. कथा-पटकथा दीपक कदम यांची असून, संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत. छायाचित्रणाची बाजू प्रशांत मिसळे सांभाळणार आहेत. दोन अनाथ मित्रांची कथा असणाऱ्या या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि संतोष मयेकर हे मित्रांच्या भूमिकेत आहेत. क्षितिजा घोसाळकर संतोषच्या नायिकेची भूमिका साकारत असून, स्वप्नीलच्या नायिकेची निवड अद्याप व्हायची आहे. याशिवाय विजय पारकर आणि सिया पाटील या जोडीचीही या चित्रपटात भूमिका आहे. सियावरच हे आयटम साँग चित्रीत होणार आहे.

Story img Loader