|| नीलेश अडसूळ
व्यक्त होणं हे नैसर्गिक आहे आणि त्याच व्यक्त होण्याला विचारांची, शब्दांची, भावनांची विशेष म्हणजे साहस माध्यमाची जोड मिळाली तर त्याची कलाकृती घडते. ‘कलाकृती’ म्हणजे तरी नेमकं काय असतं, याच्या त्याच्या तरल-तलम, बऱ्या वाईट अनुभवातून विणलेला शेलाच. हाच शेला कुणी शब्दरूपात विणतं तर कोणी नाट्य-चित्ररूपात. तसा आपल्याकडे कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र असा शब्दरूपात विणलेला बराच साठा आहे. अगदी अगणित. इतका की या शब्दरूपांना चित्र स्वरूपात आणून त्याला मढवण्याचे काम अनेक सृजनवंतांनी केले. ते आजही सुरूच आहे. अगदी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी साकारलेला पहिला बोलपट ‘राजा हरिश्चांद्र’ ते आजकाल तरुणावर गारूड करणाऱ्या वेबमालिकांपर्यंत साकारलेल्या असंख्य चित्रकृती या एखाद्या पुस्तकाचा, कथेचा किंवा शब्दरूपी ठेव्याचा आधार घेऊन जन्मल्या आहेत. म्हणून आजची शब्दवंदना अशा पुस्तकांना ज्यांनी अविस्मरणीय चित्रकृती घडवल्या. २३ एप्रिल रोजी होऊन गेलेल्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून चित्रासोबतच पुस्तकांशी घट्ट नाते असलेल्या चित्रपटकर्मींच्या ग्रंथालयात डोकावण्याचा प्रयत्न…
‘आपल्याला फक्त वेचायचे आहे…’
वाचन संस्कार आईने माझ्यात रुजवला आणि तो पुढे वाढतच गेला. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या लिखाणाचा माझ्यावर विशेष प्रभाव आहे. दांडेकर यांचे लेखन अत्यंत चित्रदर्शी आहे. म्हणजे त्यांच्या कलाकृती वाचताना त्या तुम्हाला समोर दिसू लागतात. तो गुणधर्म मी माझ्यात रुजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. सुरुवातीला जेव्हा मी मालिका लेखन सुरू केले तेव्हा तसे चित्रदर्शी लिहिण्याचा माझा कल असायचा. आज जेव्हा मी पटकथा लिहितो तेव्हा ती वाचतानाच कलाकारांना चित्ररूप दिसू लागते, ही केवळ पुस्तकांची देण आहे. आमच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात आमच्यामध्ये वाचनाची स्पर्धा लागत असे. त्यावेळी श्री. ना, पेंडसे, वि. स. खांडेकर, आनंद यादव आणि कित्येक लेखकांची पुस्तके आम्ही झपाटून वाचली आहेत. यातून आम्हाला शब्द आणि विचार समृद्धी मिळाली. आज नवीन कलाकारांसोबत काम करताना बऱ्याचदा त्यांना मराठी शब्दांचे अर्थही समजावून सांगावे लागतात. जर आपले वाचनावर प्रभुत्व असेल तर असे होत नाही. प्रत्येक शब्द हा फार महत्त्वाचा असतो, त्याच्या मागे दडलेला त्याचा त्याचा एक अर्थ असतो. शब्दच समजले नाहीत तर वाक्यामधून मांडायचा भावच आपल्याला कळणार नाही. त्यामुळे प्रत्येकानेच खूप वाचावे. वाचन हे आकलनाचे माध्यम आहे. मी कायम म्हणतो की आम्ही लेखक नाही, आम्ही केवळ पटकथा लिहितो. कारण कलाकृती जन्माला घालणारे लेखक हे वेगळेच असतात. कदाचित आज असे लेखक मिळणेच दुर्मीळ झाले आहे. विशेष म्हणजे लेखकांनी लिहून ठेवलेला इतका अमूल्य वारसा आपल्याकडे आहे की आपल्याला केवळ तो वेचून त्यावर काम करायचे आहे आणि लोकांपुढे मांडायचा आहे. – दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक
‘पुस्तके ज्ञानाचे माध्यम’
हल्ली तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माहितीची अनेक माध्यमे आपल्यापुढे उभी राहिली आहेत. म्हणजे जगातली कुठलीही माहिती मिळवायची असेल तर लोक इंटरनेट शोधून मोकळे होतात आणि त्या माहितीला ज्ञान समजून बसतात. वास्तवात ती केवळ माहिती आहे, ज्ञान नाही याचे भान आपल्याला पुस्तकातून मिळते. पुस्तके आपल्या जाणीवा जागृत करतात. सर्व प्रकारची पुस्तके वाचत राहिले की त्यातून आपल्याला आपला विषय कळतो. मग त्या एकाच विषयावर दहा लोकांनी मांडलेले विचार आपण वाचू लागतो, त्या विषयात समृद्ध होऊ लागतो. वाचनाची गोडी लागली की त्यातूनच रूपांतरणाची कल्पना सुचते, पण ते करताना पुस्तकाचे म्हणणे जपायला हवे. पुस्तक वाचताना आपल्याला जे जग दिसले आहे तेच जग चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर असते. ते करताना पुस्तकात काही मर्यादा आल्या असतील ते त्यात बदल करण्याचे स्वतंत्र आपण नक्कीच घेतो, पण पुस्तकाचा खरेपणा अबाधित ठेऊन. विक्रम गोखले यांनी दिग्दर्शित केलेला ‘आघात’ हा चित्रपट ‘निष्क्रिय’ या कादंबरीवरून साकारला गेला. जी वैद्यकीय क्षेत्रातील दुराचारावर भाष्य करते. परंतु मूळ कादंबरीत नायक हा पुरुष होता, चित्रपट करताना प्रमुख भूमिका नायिकेची असेल अशी कल्पना विक्रम गोखले यांनी मांडली. त्यावेळी मूळ कथा तीच राहिली परंतु प्रमुख पात्राचे लिंग बदलल्याने मुख्य पात्राभोवतीचे पदर अधिक संवेदनशील झाले, कथा अधिक सशक्त झाली. मुक्ता बर्वे यांनी ही भूमिका केली होती. त्यामुळे पुस्तकाचे म्हणणे काय आहे हे समजून घ्यायला हवे. – समीर विद्वांस, दिग्दर्शक
‘भरीव पायावर इमारत उभारणे’
जेव्हा पुस्तकावर आधारित कलाकृती घडत असते तेव्हा एक भरीव पाया आपल्याकडे असतो ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ‘समांतर’ भाग एक करताना याचा अनुभव मी घेतला आहे. लेखकाने एक ते शंभरपर्यंतचा प्रवास केलेला असतो, त्यापुढे ते कथानक घेऊन जायची जबाबदारी आपली असते. जेव्हा दोन पाऊल पुढे टाकून ती शब्दरूपातली कथा आपण चित्ररूपात आणू शकतो याची खात्री पटते, तेव्हाच माध्यमांतराची प्रक्रिया सुरू होते. मूळ गाभा तोच ठेऊन त्याला मोठ्या पडद्यावर सजीव करण्याचे काम करताना पुस्तकाला न्याय देता यायला हवा. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात नियोजन, उत्कटता, निर्मात्यांचे सहकार्य आवश्यक असते. कारण केवळ पुस्तक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे नसते ते दुप्पट ताकदीने पोहोचवायचे असते. मी लेखक म्हणून जेव्हा इतर लेखकांच्या कलाकृती वाचतो तेव्हा त्या वाचताना मला समोर दिसू लागतात. म्हणजे लेखकाच्या लेखणीतच इतकी ताकद असते जी तुम्हाला वाचताना एका नव्या जगाची ओळख करून देते. आपण त्याचा कल्पनाविस्तार करू लागतो. कधी कधी एखादे पुस्तक इतके प्रभावी असते की ते वाचताना त्यातली पात्रे आपल्याला जिवंत वाटू लागतात आणि तिथल्या भावविश्वाात घेऊन जातात. त्यावेळी दिग्दर्शक म्हणून अशा गोष्टीला जिवंत करण्याची, त्यातल्या पात्रांना सजीव करण्याची ओढ लागते. ज्यावेळी ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा ते कथानक रक्तामासाचे होऊन जाते आणि असे प्रभावीपण ज्या पुस्तकात असेल, त्या पुस्तकाच्या नक्कीच मागे लागावे. सध्याही मी एक पुस्तक वाचतो आहे, जे लवकरच तुम्हाला चित्ररूपात पाहायला मिळेल. – सतीश राजवाडे, लेखक-दिग्दर्शक
‘लेखक हाच पहिला प्रेक्षक’
दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपण एखाद्या पुस्तकावर आधारलेला चित्रपट करतो, त्यावेळी आपण लोकांना दाखवत असलेले जग त्या लेखकाने खूप आधीच पाहून ठेवले आहे याची जाणीव आपल्याला असावी लागते. ‘नटरंग’ करतानाही त्याचे मूळ लेखक आनंद यादव यांना मी अनेकदा भेटलो, संवाद साधला आणि कादंबरी समजून घेतली. तो काळ, ती माणसे, ते प्रसंग, त्यातली आर्तता त्यांनी उलगडून सांगितली आणि त्या आर्ततेची पूर्तता करण्याचे काम मी दिग्दर्शक म्हणून केले. जेव्हा ‘नटरंग’ चित्रपटाचे संवाद आनंद यादव यांना ऐकवले आणि त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली तेव्हा खरा आनंद झाला, कारण लेखकाला अपेक्षित असलेले जग आपण दाखवत आहोत. मला दिसलेल्या गुणा कागलकरला ते २७ वर्षे आधीच भेटले होते, म्हणूनच तो पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहोचू शकला. कादंबरीतल्या प्रत्येक पात्राचे एक म्हणणे आहे, एक जगणे आहे ज्याला मी तसूभरही धक्का लावलेला नाही. पुस्तकाचा चित्रपट करताना २०० पानांचे कथानक तितक्याच प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे दिग्दर्शकापुढे आव्हान असते. विजय तेंडुलकरांच्या ‘मित्राची गोष्ट’ या पुस्तकावर आधारलेला ‘मित्रा’ हा लघुपट करतानाही मला याचा अनुभव आला आहे. कथेतली सुमित्रा माझ्या आधी तेंडुलकरांनी पाहिली होती मी फक्त लोकांसमोर आणली. लेखकाची कलाकृती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुंदर करण्याचे काम दिग्दर्शक करत असतो. त्यातही दोन प्रमुख गोष्टी असतात, एक म्हणजे चित्रपट करायचा आहे हे ठरवून त्या पुस्तकाचा अभ्यास करणे किंवा पुस्तक वाचता वाचता त्याचा चित्रपट होऊ शकतो हे उमगणे. ‘नाच्या’ हा विषय घेऊन चित्रपट करण्याचे माझ्या बरेच दिवस डोक्यात होते. ‘नटरंग’ या कादंबरीने मनातल्या सगळ्या संकल्पना समोर उभ्या केल्या आणि मी वाचतच गेलो. जेव्हा आपण नामांकित लेखकांच्या कलाकृती घेतो तेव्हा ही जबाबदारी अधिक वाढलेली असते, कारण त्या पुस्तकांनी आधीच लोकांच्या मनात घर केलेले असते. ती आपुलकी जपून आपल्याला चित्रविश्वा उभारायचे असते. – रवी जाधव, दिग्दर्शक