अर्थकारणाच्या गणितात चित्रपटांच्या तुलनेत नाटकं कशी चालणार हा प्रश्न निर्माण झाला होता. नाटक ही जिवंत कला आहे. नाटक एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सोपं नाही. कलाकार, कारागीर, प्रवासाची धांदल या सगळ्या गोष्टी नाटकांच्या दौऱ्यात होतात. कलाकार थकवा आला म्हणून तसं रसिकांना नाटकात दाखवता येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. नाटकाच्या चित्रफितीही आल्या आहेत पण समोर सादर होणारा जिवंतपणा त्यात राहात नाही असं शरद पवार म्हणाले. १०० व्या नाट्यसंमेलनात त्यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले आहेत शरद पवार?

“नटराजाची सेवा करत असताना बऱ्याचदा लक्ष्मी प्रसन्न होत नाही. मुंबई या मायानगरीला बॉलिवूड म्हटलं जातं. इथे हिंदी चित्रपट जास्त प्रभाव पाडतात. कारण जगाचं लक्ष मुंबईकडे आहे. इथे मराठी चित्रपटही चालतात. पण मराठी रंगभूमी ओस पडणार की काय? असं चित्र निर्माण होण्याची भीती वाटते. कलाकार, निर्माते यशस्वी झाले की त्यांना चित्रपट क्षेत्र खुणावू लागतं. यात गैरही काही नाही. मात्र रंगभूमीवर काम करणं माझं पॅशन आहे हे सांगण्यापुरतं उरतं.” असं शरद पवार म्हणाले आहेत.

प्रशांत दामले, भरत जाधव यांचं कौतुक

“प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यासारखी बरीच मंडळी पॅशन जपतात याचं मला कौतुक वाटतं. नाट्यरसिकांना पुन्हा रंगभूमीकडे वळण्यासाठी कोणती नाटकं आली पाहिजेत? याकडे प्रेक्षक भूमिकेतून पाहिलं तर निखळ मनोरंजन, हास्यनिर्मिती करणारी नाटकं येत राहवीत असं मला वाटतं. अवतीभवतीचे राजकीय प्रश्न आणि त्यांवर अहिंसक प्रहार करणारीही नाटकं आली पाहिजेत असंही मला वाटतं. ब्लॅक कॉमेडीसारखा प्रकार आणखी हाताळला गेला पाहिजे” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

वसंत कानेटकर यांच्या नाटकाबाबत काय म्हणाले शरद पवार?

ऐतिहासिक नाटकांचं सादरीकरण हे अधिक संवेदनशील झालं आहे. वसंत कानेटकर यांनी रायगडाला जेव्हा जाग येते नाटक लिहिलं त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करणारे आहे. आजच्या प्रेक्षकांना या नाटकात महाराज अधिक हतबल झाले आहेत असं वाटतं. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या शीर्षकात जाग म्हणजे उभारी हा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र नाटकात महाराजांच्या मनातील शल्य अधिक तीव्रतने दाखवलं आहे. हे नाटक मी दिल्लीत पाहिलं आहे. सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातले महाराज का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि त्याचे पुरावेही मागतील.

हे पण वाचा- “अभिनेते प्रशांत दामले यांना विधानपरिषदेवर घ्या”; शंभराव्या नाट्य संमेलनात मागणी

ऐतिहासिक नाटकांची प्रेक्षक वाट पाहात असतात. मात्र सोयीचा इतिहास दाखवणं, इतिहासाचा विपर्यास करणं, इतिहासातील काही खलप्रवृत्ती यांचं उदात्तीकरण थांबवण्याची गरज आहे. वास्तव इतिहास आणि नाट्यमय घटनांचा मसाला कमी असला तरीही प्रेक्षक ते स्वीकारतील. ओटीटी त्यावर येणारे चित्रपट आणि मालिका, माहितीपटांना जो प्रतिसाद मिळतो आहे त्यावरुन वाटतं की सध्याच्या प्रेक्षकांना सत्य शोधण्यात जास्त रस आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natya sammelan speech sharad pawar indirect criticism on play raigadala jenva jaag yete which written by vasant kanetkar scj
Show comments