‘मोस्ट वेलकम’
रवींद्र पाथरे
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. पाणसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांनी काही वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता. समाजाच्या वैचारिक विश्वाचं नेतृत्व करणारी ही मंडळी. नव्वदच्या दशकात देशात धार्मिक उन्माद निर्माण करून त्याद्वारे धार्मिक ध्रुवीकरण करत सत्तासोपान पादाक्रांत केलेल्या आणि लाभलेलं सिंहासन अबाधित राखू इच्छिणाऱ्यांना समाजाला विचारप्रवण करणारी माणसं नेहमीच शत्रू वाटत आली आहेत. साहजिकपणेच अशी माणसं त्यांच्या डोळ्यांत खुपत असतात. त्यांना संपवलं की धर्म नामक अफूची गोळी चढवलेला समाज थंडगार गोळ्यासारखा निपचित पडून राहील, आपल्याला कसलेही प्रश्न विचारणार नाही आणि आपला मार्ग निर्वेध होईल अशी त्यांची समजूत असते. म्हणूनच अशा विचारक मंडळींच्या हत्येमागील मारेकरी वर्षांनुवर्षे सापडत नाहीत. कारण प्रस्थापित व्यवस्थेला ते सापडणे नकोच असतं. देशात आज अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती आहे. बहुसंख्याकवादाचा भस्मासुर धुडगूस घालतो आहे. शतकानुशतके सर्वधर्मसमभावावर उभी राहिलेली समाजाची वीण विशविशीत करण्याचे हरप्रकारे प्रयत्न होत आहेत. माणसाच्या जगण्याच्या मूलभूत प्रश्नांऐवजी मंदिर-मशीद वादास महत्त्व प्राप्त झालं आहे. गुंगीतल्या समाजाला जाग येऊ नये म्हणून पाळीव समाजमाध्यमी टोळ्या डोळ्यांत तेल घालून सतर्क आहेत. उलट, त्या आगीत तेल ओतण्याचं काम इमानेइतबारे करीत आहेत. समाजात जागले निर्माण होऊ नयेत; आणि चुकूनमाकून निर्माण झालेच तर त्यांना हास्यास्पद कसं ठरवता येईल याची रणनीती सतत आखली जात आहे. अशा अराजकी वातावरणात आपण सारे जगतो आहोत. परंतु याची कसलीही जाणीव समाज म्हणून आपल्याला नाही. साहित्य, कलांच्या माध्यमातून या अराजकाबद्दल वाचा फोडली जाणं अपेक्षित असताना या क्षेत्रांतील मंडळीसुद्धा या ना त्या सबबीची ढाल पुढे करून निष्क्रिय राहणंच पसंत करताना दिसतात. क्वचित कुठे विरोधाचा क्षीण आवाज जरी उमटला तरी तो चिरडू पाहणाऱ्या शक्ती त्यावर तुटून पडतात. मग त्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करायलाही मागेपुढे पाहिलं जात नाही.
अशा ढगाळ परिस्थितीत सुनील हरिश्चंद्र लिखित-दिग्दर्शित ‘मोस्ट वेलकम’ हे नाटक यावं हे आजच्या घडीला संवेदना जिवंत असलेल्यांना काहीसं दिलासादायक वाटल्यास नवल नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निमित्तानं काहीएक वैचारिक मीमांसा करणारं हे नाटक आहे. गौरी लंकेश यांची हत्या करायला आलेला तरुण आणि त्यांच्यामध्ये झडलेल्या काल्पनिक संवादातून हे नाटक उलगडत जातं. चर्चानाटय़ाच्या अंगानं जरी हे नाटक जात असलं तरी त्यात ‘नाटय़’ ठासून भरलं आहे. गौरी लंकेश या त्यांना मारायला आलेल्या तरुणाशी संवाद साधू पाहतात. सुरुवातीला तो तरुण त्यांना बिलकूल दाद देत नाही. परंतु गौरी लंकेश यांच्या प्रश्नांना (हळूहळू नाइलाजानं) उत्तरं देता देता आपल्या हत्येसाठी आलेल्या या तरुणाचं (आणि पर्यायानं समाजाचंही!) त्या प्रबोधन करतात. या संवादात गौरी लंकेश प्रचलित समाजस्थिती, धर्म, आस्तिक-नास्तिकता, ‘देव’ संकल्पना, माणूस अशा निरनिराळ्या विषयांना हात घालतात.
‘नाटकातील नाटक’ अशी या नाटकाची रचना असल्याने नाटकाच्या तालमीतच हे ‘नाटक’ घडत जातं. लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी अत्यंत हुशारीनं हा ‘डिव्हाइस’ वापरला आहे. त्यात सामान्य प्रांजळ पापभिरू माणसं तसंच धर्माधांच्या दहशतीखाली वावरणारी माणसं कशी वागतात, बोलतात, व्यक्त होतात हे वास्तव चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून समोर येतं. माणूस जन्माला येतो तेव्हा निर्गुण, निराकार असतो. त्याच्यावर घरातली मंडळी हळूहळू देव, धर्म वगैरेचे ‘संस्कार’ करतात. त्यातून मग तो ‘धार्मिक अभिनेता’ बनतो. ते त्याचे मूळ विचार नसतात. धर्माचे टिळे लागल्यावर त्याच्यातला ‘माणूस’ हळूहळू लोप पावत जातो. काही वेळा या ‘संस्कारां’ना प्रश्न विचारण्याची बुद्धी एखाद्याला वाचन, चिंतन, मनन, अनुभवांतून प्राप्त होते. तो प्रत्येक गोष्टीसंबंधात ‘हे असंच का, ते तसंच का?’ असे प्रश्न उपस्थित करू लागतो. त्यातून विवेकाच्या कसोटीवर घासून, लख्ख करून तो मिळालेल्या उत्तरांची विवेकानं चिकित्सा करतो आणि मगच ती उत्तरं स्वीकारायची की नाही, हे ठरवतो. आपल्या आजूबाजूच्या समाजातही ही चिकित्सकता वाढावी, विवेकाची रुजवात व्हावी यासाठी ती व्यक्ती मग धडपडू लागते. परंतु कट्टर धर्माधांचं तसं नसतं. त्यांना विचारांशी काही देणंघेणं नसतं. स्वार्थ- मग तो भल्याबुऱ्या कुठल्याही मार्गाने साध्य होवो- त्यांना साधायचाच असतो. मग ती सत्ता असो, पैसा असो की आणखी काही. ते मिळवण्यात आडवे येणारे त्यांना चालत नाहीत. म्हणूनच समाजातील विचारवंत त्यांना बिलकूल खपत नाहीत. प्रसंगी आडवे येणाऱ्यांना संपवून ते आपला मार्ग निष्कंटक करू बघतात. परंतु अशानं समाजहितैषी विचार मरत नसतात. कुणाच्या हत्येनं विचार मरत असते तर जगात अंदाधुंदी माजली असती. गांधीजींच्या हत्येनं गांधीविचार मेला नाही. कारण तो शाश्वत आहे. हाच मौलिक विचार ‘मोस्ट वेलकम’ नाटकात सुनील हरिश्चंद्र यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. नाटकाच्या तालमीत ‘नाटक’ घडत असताना समांतरपणे त्याचे परिणामही अधोरेखित करण्याचं काम त्यांनी केलं आहे. परंतु ही विचारांची विचारांशी लढाई आहे ही त्यांची भूमिका त्यांनी कुठंच सोडलेली नाहीए. त्याचबरोबर त्यांनी शेवटाकडे माणसाचं नाव ठेवण्याची पद्धती बदलली तर माणसाकडे ‘माणूस’ म्हणून बघण्याचा विचार समाजात रुजू शकेल अशी एक शक्यताही मांडली आहे. या नाटकातील सगळ्याच कलाकारांनी सर्वस्व झोकून कामं केली आहेत. त्यामागे त्यांचं पक्कं वैचारिक अधिष्ठानही जाणवतं. विचारप्रवृत्त व अंतर्मुख करणारा हा नाटय़ानुभव प्रत्येकानं एकदा तरी जरूर घ्यायला हवा.