‘३८, कृष्ण व्हिला’

रवींद्र पाथरे

गेल्याच आठवडय़ात करोनाकाळापश्चात आलेल्या मनोरंजनपर नाटकांच्या लाटेबद्दल लिहिलं असतानाच ‘३८, कृष्ण व्हिला’ हे गंभीर विषयावरचं नाटक पाहण्याचा योग आला. सध्याच्या वातावरणात गंभीर आशयावरील असं नाटक रंगमंचावर आणणं हे तसं धाडसाचंच. म्हटलं तर हे नाटक रहस्यरंजनपर आहे; आणि नाहीसुद्धा. डॉ. श्वेता पेंडसे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकाची प्रथमदर्शनी ध्यानात येणारी दोन-तीन वैशिष्टय़ं सांगता येतील. एक म्हणजे साहित्य हा विषय केंद्रस्थानी असलेलं असं नाटक बऱ्याच दिवसांनी मंचित झालं आहे. दुसरं- नाटकातील काळ आणि नाटक घडण्याचा काळ एकसमान असणारं आणि दोन्हीही अंक एक-प्रवेशी असलेलं असं हे एक अपवादात्मक नाटक आहे. त्याची आणखी एक विशेषत: म्हणजे खुद्द लेखिकेनंच या नाटकात मध्यवर्ती भूमिकाही साकारली आहे. या सगळ्यातून या नाटकाचं वेगळेपण अधोरेखित होतं.

‘यक्ष’ हे नामाभिधान वापरून लेखन करणारे देवदत्त कामत हे मराठीतील एक सुविख्यात साहित्यिक. नुकताच त्यांच्या एका साहित्यकृतीला देशातील सर्वोच्च मानला जाणारा ‘अक्षररत्न’ (‘ज्ञानपीठ’सदृश!) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि हा पुरस्कार जाहीर होताच त्यांना नंदिनी चित्रे नामक कुणा एक स्त्रीने ‘तुम्ही हा पुरस्कार घेऊ नये, तुमचा त्यावर बिलकूल हक्क नाही..’ असा दावा  करत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एवढंच करून ती थांबत नाही तर त्यांना त्याबद्दल जाब विचारण्यासाठी ती त्यांच्या घरी येते.. ‘३८, कृष्ण व्हिला’मध्ये! तिच्या प्रश्नांच्या सरबत्तीला ते शांतपणे उत्तरं देतात. परंतु ती मात्र एकच हेका धरून बसलेली असते : ‘तुम्ही हा पुरस्कार स्वीकारता कामा नये.’ साहजिकपणेच ते तिला विचारतात : ‘का बुवा, मी हा पुरस्कार का स्वीकारू नये? प्रतिष्ठित साहित्यिकांच्या निवड समितीने माझी या सन्मानाकरता निवड केलेली आहे. त्यांनी सर्वार्थाने विचार करूनच ही निवड केली असणार ना? मग मी हा पुरस्कार का नाकारावा?’

त्यावर नंदिनीचं म्हणणं : ‘मुळात तुम्ही ती कादंबरी लिहिलेलीच नाही. मोहन चित्रे नावाच्या लेखकानं (म्हणजे माझ्या नवऱ्यानं!) ती लिहिलीय. त्यामुळे तुमचा या पुरस्कारावर बिलकूल हक्क नाही.’

त्यावर देवदत्त कामत तिला म्हणतात : ‘याला पुरावा काय?’

ती म्हणते : ‘मला पूर्ण खात्री आहे की, हीच काय, याआधीची तुमची ‘बखर’ कादंबरी वगळता सगळ्याच कादंबऱ्या मोहन चित्रे यांनीच लिहिलेल्या आहेत.’

परंतु हा भोंगळ भावनिक युक्तिवाद कोर्टात टिकणं शक्यच नसतं. त्याकरता सज्जड पुराव्याची गरज असते. केवळ कुणा व्यक्तीला ‘वाटतं’ म्हणून एखाद्याचं (त्याच्याच नावे) प्रसिद्ध झालेलं लेखन दुसऱ्याच कुणीतरी केलंय हे सिद्ध होत नाही, हे देवदत्त कामत तिच्या निदर्शनास आणून देतात. तेव्हा ती त्यांच्या कादंबऱ्यांमधले अनेक तपशील हे केवळ आणि केवळ आपल्याला आणि मोहन चित्रे यांनाच ठाऊक असताना कामत यांनी ते जसेच्या तसे कसे काय आपल्या पुस्तकांतून लिहिले, असा नंदिनीचा सवाल असतो. याचाच अर्थ मोहन चित्रेंनी केलेलं लिखाण त्यांनी चोरलं असावं असा तिचा युक्तिवाद असतो. परंतु अर्थातच तो कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नसतो. साहित्यातील अनेक गोष्टी निव्वळ योगायोगानं कुणाच्या तरी आयुष्यात समांतरपणे घडलेल्या असू शकतात. त्याचा अर्थ त्या व्यक्तीनेच ते लिखाण केलं असेल असा होत नाही. बरं, स्वत: मोहन चित्रे पुढे येऊन तसा काही दावा करत नाहीएत. किंबहुना, त्यांना आपली बायको असं काही करते आहे याचीसुद्धा खबर नाहीए. मग नंदिनीचा दावा कोणत्या निकषांवर खरा म्हणायचा?

नंदिनीच्या प्रत्येक प्रश्नाला देवदत्त कामत अत्यंत शांतपणे व समर्पक उत्तरं देतात. या वितंडवादात त्यांच्या लक्षात येतं की नंदिनीच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी गडबड असावी. तिला आपल्या नवऱ्यानं केलेलं लिखाण कुणीतरी चोरून ते स्वत:च्या नावे प्रसिद्ध करीत असल्याचे भास होत असावेत. याचाच अर्थ ती मनोरुग्ण असावी या निष्कर्षांप्रत ते येतात. त्यामुळे तिने याबाबतीत मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं ते सुचवतात. त्यांच्या बोलण्यातील पारदर्शीपणानं तीही आपल्या आरोपांच्या संदर्भात हळूहळू संभ्रमात पडते. देवदत्त कामत म्हणतात तसे आपण खरोखरीच मनोविकारानं पछाडलेले नाही आहोत ना, असा तिलाही प्रश्न पडतो. ती त्यांची बिनशर्त माफी मागते आणि जायला निघते..

पण..

 हा ‘पण’च नाटकाला कलाटणी देणारा ठरतो. तो काय, हे इथं सांगता येणार नाही. त्यासाठी नाटक पाहणंच उचित ठरेल. लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांनी या नाटकाचा प्रथमार्ध उत्कंठावर्धकरीत्या चढत्या रंगतीने आकारला आहे. पहिल्या अंकाच्या शेवटाकडे नाटकाला अकस्मात कलाटणी मिळते. त्यामुळे स्वाभाविकपणे दुसऱ्या अंकात त्याची उकल अपेक्षित. ती तशी होतेही. परंतु त्यातील रहस्य एकदा उघड झाल्यावर प्रथमांकातील उत्कंठा ओसरते. मग उरते ती फक्त ‘यक्ष’प्रश्नाची चिकित्सा. ती फारशी उत्कंठापूर्ण नाही. अनेक प्रश्नांची उत्तरं या उकलीत मिळत असली तरी अनेक नवे प्रश्नही प्रेक्षकाला पडतात- ज्यांची उत्तरं नाटकात सापडत नाहीत. आपल्या नवऱ्यानं केलेलं लेखन दुसराच कुणीतरी आपल्या नावे प्रसिद्ध करतोय हे लक्षात आल्यावर ती स्त्री इतका काळ गप्प बसेल? बरं, तिच्या नवऱ्यानं ते लेखन तिच्या समोर केलं का, की परोक्ष केलं? तसं जर त्यानं केलेलं नसेल तर तिनं हा दावा कशाच्या आधारे केला? नवऱ्याने तिच्या परोक्ष ‘चोरीछुपके’ लेखन केलं असं जरी गृहीत धरलं, तरी बायको म्हणून तिला याबद्दल इतकी वर्ष कधीच संशय आला नाही? आणि आला, तेव्हा तिने त्याचा शोध का घेतला नाही? देवदत्त कामत यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच तिने त्यांच्याविरोधात कांगावा करावा? त्याआधी का करू नये? आपल्या नवऱ्याला शेअर मार्केटमधून येणारे पैसे त्याने कोणताही व्यवहार (ट्रेडिंग) न करताही कसे काय येतात, हा साधा प्रश्नही तिला पडू नये? ‘यक्ष’प्रश्नाच्या पोटातील असे बरेचसे प्रश्न त्या रहस्याच्या उकलीनंतरही अनुत्तरित राहतात. त्यामुळे नाटकाचा उत्तरार्ध काहीसा प्रश्नोपनिषदाचं काहूर माजवतो. परिणामी पहिल्या अंकात चढत जाणारं नाटक दुसऱ्या अंकात उतरत जातं. मात्र लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांनी वर म्हटल्याप्रमाणे नाटकाच्या रचनेत केलेले प्रयोग निश्चितच दाद देण्याजोगे आहेत. दुसऱ्या अंकात भावनिकतेवर त्यांनी जास्त भर दिला आहे. तथापि रहस्य ‘फूलप्रूफ’ करण्याकडे मात्र तितकंसं लक्ष दिलेलं दिसत नाही. असो.

दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पूर्वार्धातील ‘रहस्य’नाटय़ छान खुलवलं आहे. पण उत्तरार्धात त्याची सहजी उकल झाल्याने दुसरा अंक नाटय़मयतेत कमी पडतो. प्रत्यक्ष घटना-प्रसंगांतील नाटय़ापेक्षा यात शाब्दिक नाटय़ अधिक आहे. ते ठळक करण्यावर दिग्दर्शकानं साहजिकपणे भर दिला आहे. दुसऱ्या अंकात मात्र रहस्याची उकल झाल्यावर हे शाब्दिक नाटय़ाचं पाठबळ संपतं. त्यामुळे नाटकातील उत्सुकता उणावते. प्रेक्षकाला नवे प्रश्न पडतात. त्यांची उत्तरं मात्र मिळत नाहीत. दोन्ही पात्रांना स्वत:चे ‘स्व-भाव’ देण्यात केंकरे यांनी यात कसूर केलेली नाही. त्याने प्रेक्षक नाटकात गुंतत जातो. मोहन चित्रे हे पात्र प्रत्यक्ष रंगमंचावर न अवतरताही त्याचं अस्तित्व सबंध नाटकभर जाणवतं.  

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी लेखकाचं प्रशस्त घर उत्तम उभं केलं आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे नाटय़पूर्णतेत भर घातली आहे. अजित परब यांचं संगीत, मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि राजेश परब यांची रंगभूषा नाटय़ाशयाला पूरक आहे. डॉ. श्वेता पेंडसे यांनी नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आकाशपाताळ एक करणारी नंदिनी तिच्या कन्व्हिक्शनसह उत्तम साकारली आहे. आपला नवरा एक महान लेखक आहे, त्याच्या यशाचं माप त्याच्याच पदरी पडायला हवं म्हणून हाती कोणताही ठोस पुरावा नसतानादेखील ती लेखक देवदत्त कामत यांच्याशी झुंज देते. त्यातून तिच्या हाती जे सत्य लागतं ते चक्रावणारं असतं. एकीकडे तिला सत्याचा विजय झाल्याचा आनंद लाभतो, तर दुसरीकडे त्याला असलेली वेदनेची किनार तिला अस्वस्थ करते. या सगळ्या भावभावना डॉ. श्वेता पेंडसे यांनी उत्कटतेनं अभिव्यक्त केल्या आहेत. डॉ. गिरीश ओक यांनी देवदत्त कामत ऊर्फ ‘यक्ष’ या लेखकाची वैचारिक प्रगल्भता, त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व यथार्थतेनं उभं केलं आहे. नंदिनीच्या धारदार आरोपांच्या सरबत्तीला ते ज्या संयमाने सामोरे जातात, त्यातून एक लेखक म्हणून त्यांनी केलेला स्वत:चा विकास आणि अंगी बाणवलेली परिपक्वता, त्यासाठी घेतलेले कष्ट जाणवतात. या भूमिकेचं वजन डॉ. ओक यांनी उत्तमरीत्या पेललं आहे. एक वेगळा नाटय़ानुभव देणारं हे नाटक आहे. 

Story img Loader