रवींद्र पाथरे

माणसाचं आयुष्य प्रचंड गुंतागुंतीचं असतं. आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येकाशी त्याचं नातं, वागणं-बोलणं, व्यक्त होण्याची पद्धती वेगवेगळी असते. याचं कारण प्रत्येक नात्यातले गुंते, पेच आणि न दिसणारे अंधारे कोपरे भिन्न असतात. त्यांना कसं सामोरं जायचं हे त्या व्यक्तीच्या पूर्वानुभवांतून ती ठरवीत असते. भरीस भर म्हणजे सभोवतालच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरणातले नाना तिढे त्या व्यक्तीचं जगणं आणखीनच पेचदार बनवत असतात. त्यातून नवे प्रश्न, नव्या समस्या उभ्या ठाकतात. या सगळ्याला एकाच वेळी तोंड देता देता माणसं पिचून जातात.. नैराश्यग्रस्त होतात. मानसिक, भावनिक, शारीरिक व्याधींनी त्रस्त होतात. सत्तर-ऐंशीच्या दशकातील किंवा त्याही आधीचं माणसाचं आयुष्य काहीसं साधं, सरळ, बाळबोध होतं. आज ते प्रचंड व्यामिश्र, गोंधळाचं अन् संभ्रमित झालं आहे. त्यामुळे त्याचं मन:स्वास्थ्य हरपलंय. अशात वाढत्या व्यक्तिवादानं या गुंत्यांचा पीळ अधिकच काचदार केला आहे. माणसं आज माहिती महाजालाने संपूर्ण जगाशी जोडली गेली असली तरी खूप एकटी, एकाकी होत चाललीयत. नैराश्य, बेचैनी, विमनस्कता, दुभंगलेपण, अस्थैर्य यांनी ती आतून पोखरलीयत. अशात जर का ती व्यक्ती संवेदनशील लेखक/ कलांवत असेल तर तिच्यापुढचे जगण्याचे आणि व्यक्त होण्याचे पेच आणखीनच जीवघेणे ठरतात. या सगळ्याचं उत्कट, कठोर अन् तितकंच संवेदनशील चित्रण संदेश कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित-अभिनित ‘पुनश्च हनिमून’ नाटकात पाहायला मिळतं. काही वर्षांपूर्वी याच नावाचं त्यांचं नाटक रंगमंचावर आलं होतं. परंतु ते आजच्यापेक्षा अनेकार्थानं भिन्न होतं. लेखकाचं वय आणि अनुभवपरत्वे त्याचं जगण्याचं आकलन विस्तारल्याने नवं नाटक अधिक प्रगल्भ, परिपक्व व व्यामिश्र झालं आहे. कथाबीज तेच असलं तरी आयुष्य आणि भवतालाबद्दलचं आकलन अधिक सखोल आहे.

chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

सुहास-सुकन्याच्या लग्नाला सात वर्षे लोटलीएत. मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खूप सारे काच, साचलेपण, परिस्थितीनं केलेली फरफट, भवतालानं लादलेली कम्प्लशन्स यांनी दोघांच्या आयुष्यातला रोमान्स आणि जगण्याची ऊर्जा संपून गेलीय. ती परत मिळवण्यासाठी सुकन्या सुहासला पावसाळ्यात माथेरानला घेऊन जायचं ठरवते. तिथे ज्या वातावरणात पहिला हनिमून अनुभवला होता, तशाच वातावरणात आणि त्याच ‘ड्रीमलॅंड’ हॉटेलमध्ये त्यावेळच्या त्याच सूटमध्ये पुनश्च हनिमूनसाठी ते दाखल होतात. प्रवासात पूर्वीसारख्या त्याच घटना घडताना पाहून सुकन्याचं मन हरखतं. परंतु आता ‘हॉटेल ड्रीमलॅंड’च्या पाटीवरील ‘ड्रीम’ हे शब्द पुसले गेले आहेत. सुकन्याने बुक केलेली ‘ती’(च!) रूम दुसऱ्या कुणाला तरी दिली गेलेली आहे. त्यामुळे ती प्रचंड अपसेट होते. इथंसुद्धा काहीच आपल्या मनासारखं होत नाही म्हणून ती भयंकर चिडते. संतापते. सुहास तिला शांत करायचा प्रयत्न करतो. 

खरं तर त्यांच्यातल्या बिनसलेल्या नात्यातला ताल तिला पुन्हा समेवर आणायचा आहे. मुख्य म्हणजे सुहासच्या दुभंगलेपणावर, त्याच्या नैराश्यावर इथं निवांत उपचार करता येतील या हेतूनं ती त्याला घेऊन आलेली आहे. तिचं स्वत:चंही विस्कटलेलं जगणं तिला मार्गावर आणायचंय. मुंबईची थकवणारी गर्दी, गडबड, धावपळ, तिथल्या धबडग्यात हरवलेलं त्यांचं जग, त्यांच्यातला विसंवाद (खरं तर असंवाद!) हे सारं तिला ताळ्यावर आणायचंय. उभयतांमधला हरवलेला संवाद पुन:स्थापित करायचाय. आणखीन एक : पहिल्या हनिमूनच्या वेळी सुहासने लिहिलेल्या पहिल्या कादंबरीला उत्तम यश लाभलं होतं. त्यानंतरही त्यानं बरंच लेखन केलं तरी ते सगळं अर्धवटच राहिलं होतं. सध्या तो एका कादंबरीवर काम करतो आहे. पण कादंबरीत कशा तऱ्हेनं व्यक्त व्हायचं, या ठिकाणीच त्याचं गाडं अडलंय. त्याचा ‘मेंटल ब्लॉक’ घालवण्यासाठी माथेरानचा हनिमून सत्कारणी लागेल अशी तिला आशा आहे.

माथेरानच्या या दुसऱ्या हनिमूनमध्ये त्यांच्यात बरंच काही घडतं. जुने पेच, तिढे लाव्हारसाप्रमाणे उफाळून  येतात. भूत-वर्तमानाची चिरफाड होते. आरोप-प्रत्यारोप, जुने हिशेब, समज-गैरसमज, परस्परांच्या वर्तनाचा लेखाजोखा असं साचलेलं खूप सारं उफाळून येतं. आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवायची त्यांची धडपड! या सगळ्या धडपडीतून त्यांचं ‘इमोशनल बॅगेज’ हळूहळू हलकं होत जातं. दोघंही मोकळी, रीती होत जातात. आपल्या आयुष्याचा धांडोळा घेणारी, परंतु सार्वत्रिक आशयाची कादंबरी लिहिण्याची त्याची असोशी हळूहळू आकार घेऊ लागते..

लेखक संदेश कुलकर्णी यांनी ‘पुनश्च हनिमून’ हे नाटक अनेक पातळ्यांवर खेळवलेलं आहे. काळाचे तुकडे पुढे-मागे करत फ्लॅशबॅक पद्धतीनं त्यांनी त्यात आशय भरत नेला आहे. काळाचे सतत बदलणारे हे तुकडे समजून घेताना आपली काहीशी दमछाक होते खरी. हनिमून म्हणजे दाम्पत्याच्या आयुष्यातला अत्यंत मधुर काळ. इथं दोन हनिमूनच्या मध्यंतरात बरंच काही घडून गेलंय दोघांच्या आयुष्यात. व्यक्तिगत, तसंच सुहासच्या बाबतीत सर्जनशील जीवनातही! ज्यामुळे उभयतांचं जगणं पार कोलमडून गेलंय. त्यात एक प्रकारची कर्कश्शता आलीय. त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी दोघं माथेरानला आलीयत. माथेरानच्या या दुसऱ्या हनिमूनमध्ये त्यांच्यात जे काही घडतं, ते म्हणजे हे नाटक होय. लेखकाने नाटकात अनेक फॉम्र्सची सरमिसळ केलीय. सुकन्या टीव्हीवर वृत्तनिवेदिका असल्याने मधूनमधून ती माथेरानमध्ये घडत असलेल्या घडामोडी बातम्यांच्या स्वरूपात कथन करते. कधी भूतकाळाचा कोलाज अवतरतो. दोघांच्या आयुष्यातले तिरपागडे प्रसंग व घटना त्यातून मांडल्या गेल्या आहेत. त्यांचे स्वभावविभाव, भावनिक, मानसिक, वैचारिक प्रवास त्यांतून उलगडत जातो. त्यातले गुंते आणि निरगाठी हळूहळू सुटत जातात. लेखकाला पात्रांची वेगळी मनोभूमिका मांडण्याचे कष्ट त्यामुळे घ्यावे लागलेले नाहीत. ते आपातत:च येतात.

दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी सुहास-सुकन्या यांच्यातली मानसिक-भावनिक दरी अत्यंत निर्घृणपणे आकारली आहे. त्यांनी कुठल्याही पात्राला सहानुभूतीचं कवचकुंडल दिलेलं नाही. दोघांच्या खोल अंतरंगात शिरून, त्यांना सोलून त्यांनी समोर ठेवलं आहे. त्यांच्या जगण्याच्या अनुषंगानं येणारी अन्य पात्रं- हॉटेल मॅनेजर, व्यक्ती, आकृती, थेरपिस्ट, पब्जी, कृष्णा, मेकअपमन, उनाड मुलगा, एजंट, कॅमेरामन, स्पॉटबॉय वगैरे- जितक्यास तितकीच वापरली आहेत. नाटकातील आशयाचं केंद्र बिलकूल हलणार नाही याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली आहे. सुहासचा त्रिस्तरीय ‘डायलेमा’ वर्णतातीत आहे. एक मानसिक रुग्ण, संवेदनशील लेखक, समाजचिंतक, समंजस पती या नात्यांनी सुहासची झालेली गोची संदेश कुलकर्णी यांनी सर्वार्थानं उभी केली आहे. त्यांनी स्वत:च ही भूमिका साकारल्यानं त्यांनी तिला उत्तम न्यायही दिला आहे. लेखक-दिग्दर्शकाला जे म्हणायचं आहे ते अभिनेते म्हणून त्यांनी अक्षरश: जिवंत केलं आहे. विलक्षण बोलकी, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची, सुहासच्या समस्येनं भ्यायलेली आणि तरीही त्यावर मार्ग शोधण्यासाठी जिवाचं रान करणारी सुकन्या- अमृता सुभाष यांनी सर्वस्व झोकून साकारली आहे. तिची चिडचीड, वैताग, सुहासला समजून घेताना होणारी घुसमट.. आणि तरीही नव्या दिवसाला सामोरं जाताना नव्या आशेनं तिचं मोहरणं.. हे सारं खूप आतून आल्याचं जाणवतं. आशुतोष गायकवाड आणि अमित फाळके हे विविधरंगी भूमिकांत चपखल बसले आहेत.

मीरा वेलणकर यांनी सांकेतिक नेपथ्यातून अनेक गोष्टी सूचित केल्या आहेत. दालीचं काटे नसलेलं घडय़ाळ, बेड आणि खिडकीचं दुभंगलेपण यांतून नाटय़ाशयाला बळकटी येते. नरेंद्र भिडे यांनी प्रसंगांनुरूप सांगीतिक वातावरण योजलं आहे. आशुतोष परांडकरांनी प्रकाशयोजनेद्वारे काळाचे विविध तुकडे जिवंत केलेत. श्वेता बापट यांची वेशभूषाही उल्लेखनीय.

माणसाच्या जगण्यातली फरफट, परिस्थितीचे तडाखे आणि त्यातून निर्माण होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक गुंते यांचं समन्वयित दर्शन घडवणारं हे नाटक चुकवू नये असंच! एक अप्रतिम कलाकृती पाहिल्याचं समाधान ते निश्चितपणे देतं.