रवींद्र पाथरे

आज आधुनिक स्त्री आपल्या सभोवतीची सगळी बंधनं तोडून स्वतंत्र झाली आहे असं वाटावं असं चित्र समाजात एकीकडे दिसत असताना दुसरीकडे स्त्रीची गळचेपी, सर्व तऱ्हेचं शोषण आणि तिच्या सर्वव्यापी घुसमटीच्या घटनाही मोठय़ा प्रमाणावर घडताना दिसत आहेत. हे चित्र ‘इंडिया’ आणि ‘भारत’ अशा दोन्हीकडचं आहे. केवळ सर्वसामान्य स्त्रीच्याच नव्हे, तर सुशिक्षित, उच्चभ्रू आणि स्वतंत्र बाण्याच्या स्त्रीच्या बाबतीतही हेच वास्तव आजही आहे. घराच्या चार भिंतींच्या आड जे घडतं ते सहसा बाहेर जाऊ नये असं कुठल्याही स्त्रीला वाटत असतं. म्हणून ती मुकाटपणे तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करत राहते.. जन्मभर. त्यामुळे आपल्या समाजात स्त्री-शोषणाचं प्रमाण कमी असल्याची आपली (गैर)समजूत होते. ‘आवर्त’ या सुचरिता लिखित आणि रमा नाडगौडा दिग्दर्शित एकपात्री दीर्घाकात हे वास्तव गडदपणे मांडलेलं आहे. आजवर स्त्रीप्रश्नांची मांडणी करणारी बरीच नाटकं मराठी रंगभूमीवर आलेली असली तरी जोवर समाजातलं हे वास्तव बदलत नाही तोवर ती येतच राहणार आहेत. ‘आवर्त’ या नाटकात सर्वसामान्य स्त्रीची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि दैहिक कोंडी, होरपळ पाहायला मिळते.. जी कायम अव्यक्तच राहिलेली आहे. म्हणूनच सत्य घटनेवर आधारित हे नाटक असल्याची उद्घोषणा बरंच काही सांगून जाते. या नाटकातलं वास्तव हे खरं तर कुणाही स्त्रीच्या आयुष्यातली सर्वसामान्य बाब आहे. यातल्या ‘सरी’चं होणारं शोषण या ना त्या प्रकारे प्रत्येक स्त्रीच्या वाटय़ाला कधी ना कधीतरी आलेलं असतं.. येतं. पण कुठलीच स्त्री त्याबद्दल सहसा वाच्यता करीत नाही. परिणामी झाकली मूठ सव्वा लाखाची राहते. म्हणूनच भारतीय समाजाची पुरुषी मानसिकता सहसा उघडय़ानागडय़ा स्वरूपात समोर येत नाही. परंतु हे वरकरणीचं आभासी चित्र आहे. प्रत्यक्षातलं दाहक वास्तव मात्र भयावह व भीषण आहे. ही वास्तविकता मांडणारं ‘आवर्त’ हे नाटक आहे. भोवंडून टाकणाऱ्या भोवऱ्यात अडकलेल्या एका सामान्य, असहाय स्त्रीचं भागधेय चितारणारं हे नाटक आहे.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media
स्कूटरवरून आली अन् वृद्ध महिलेला…, महिला पोलीस अधिकाऱ्याची भररस्त्यात दादागिरी? VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

यातली ‘सरी’ ही मुलगी निमशहरी भागातली आहे. सामान्य रूप, सामान्य गुणवत्ता असलेली. चारचौघींसारखी. पण ती हाडामांसाची ‘माणूस’ आहे. तिला भावभावना आहेत. इतरांसारख्याच वासनाविकार आहेत. तिचीही चारचौघींसारखी (सामान्य का असेनात!) स्वप्नं आहेत. अर्थात तिला आपल्या सामान्यपणाचं भान आहे. लहानपणापासून स्त्री म्हणून तिच्यावर ‘आदर्श स्त्रीत्वा’चे संस्कार झाले आहेत. त्यातून ती एक भिडस्त, संकोची, आत्मविश्वासाचा अभाव असलेली मुलगी बनली आहे. वयात आल्यावर तर तिच्यावर नाना बंधनं लादली गेली आहेत. तिनेही ती मुकाटय़ानं स्वीकारली आहेत. तिची एक ‘फॉरवर्ड’ मैत्रीण तिला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलचे धडे देऊ बघते, पण तिला ते अत्यंत घाणेरडे वाटतात. आजूबाजूच्या सर्वसामान्य स्त्रियांसारखीच ती ‘त्या’ विषयाबद्दल अनभिज्ञ आहे. ‘त्या’संबंधात तारुण्यसुलभ कुतूहल असलं तरी मैत्रिणीकडून जे ‘ज्ञान’ मिळतं ते तिला पचणं शक्यच नसतं. तिचं यौवनात पदार्पण करणारं शरीर वैषयिक मागणी करत असलं तरी लग्नाशिवाय त्या सुखाचा ती विचारही करू धजत नाही.

संदीपशी तिचं लग्न होतं. तो इंजिनीअर असतो. चांगल्या पगाराची नोकरी असणारा. साहजिकपणेच तिचं मन फुलारतं. लग्नानंतर ज्या ‘सुखा’ची तिने अपेक्षा केलेली होती ते ओरबाडून घेऊन तो तिचं हे साधं स्वप्नही चोळामोळा करून टाकतो. पुढे हे असंच चालत राहतं. सरी स्त्रीच्या सोशीक वृत्तीनं निमुटपणे ते सहन करत राहते. आज ना उद्या या परिस्थितीत बदल होईल या आशेवर जगत राहते. ती गरोदर राहते तेव्हा तिची आशा पुन्हा पालवते. पण तिचा गर्भपात होतो आणि त्याबरोबर तिची उरलीसुरली आशाही संपुष्टात येते. कारण यापुढे तिला पुन्हा गर्भ राहू शकणार नाही असं डॉक्टर सांगतात. संदीपचा मग तिच्यातला रस संपतो. तो मित्रांबरोबर पाटर्य़ा, ऐष, स्त्रीसंग यांत रमून जातो. त्याच्या लेखी तिचं अस्तित्व आता पूर्णपणे संपलेलं असतं. स्वत:साठी सगळी सुखं बाहेर शोधताना तिला ‘सौभाग्या’चं सुख आपण देतो आहोत हेच फार आहे असं त्याचं म्हणणं असतं. सुरुवातीला ती त्याला सुधारू बघते. मग विरोध करून बघते. पण आपल्याला मूल देऊ न शकणाऱ्या स्त्रीला त्याच्या लेखी आता काहीच किंमत उरलेली नसते.
ती मग देव-देव करू लागते. त्यात मन रमवू पाहते. समाजाला आपली अपत्यहीनता खटकते हे लक्षात आल्यावर ती शेजारपाजाऱ्यांशी संबंध टाळू लागते. कुणाकडे मंगल कार्याना जाणंही तिला नकोसं वाटू लागतं. तिची ती ‘सर्वज्ञानी’ मैत्रीण तिला ‘तूही संदीपसारखंच इतर पुरुषांना जवळ कर,’ असा मोलाचा सल्ला देते. पण साध्या, सरळमार्गी सरीच्या लेखी तो अध:पतनाचा मार्ग असल्याने तिला तो जमणंच शक्य नसतं. तिची ती कुढू लागते.एकाकीपण तिला खायला उठतं. हळूहळू ती घरातल्या कपडय़ांच्या अतिस्वच्छतेत आपलं मन रमवू बघते. सतत कपडे धुऊन वाळत घालणं हाच तिचा छंद होतो. ती त्यात स्वत:ला बुडवून घेते.

ती मानसिक रुग्णाईत होते. यातून बाहेर यायचं तर मानसोपचारतज्ज्ञांशिवाय पर्याय नाही म्हटल्यावर ती तेही करायला जाते. पण त्यावर उपाय करताना संदीपलाही डॉक्टरांकडे यावं लागणार आहे म्हटल्यावर ते शक्यच नसतं. माहेरीसुद्धा वडील सोडले तर तिचं दु:ख समजून घेणारं कुणीच नसतं.
मग ती तसंच शुष्क आयुष्य जगत राहते.. २५ वर्षे. पुढे वडीलही वारतात. सगळेच पाश तुटतात. वडलांपश्चात माहेरचं घर तिला मिळतं.
आणि ती पहिल्यांदाच एक खंबीर निर्णय घेते : संदीपला पूर्ण मोकळीक देण्याचा! आपलं कुढत, एकाकी आयुष्य जगण्याला पूर्णविराम देण्याचा.. माहेरी जाऊन राहण्याचा!

एका सामान्य स्त्रीचं हे प्राक्तन.. आयुष्यात काहीच धडपणे न घडणाऱ्या, संपूर्ण आयुष्य एक जळता वनवास ठरलेल्या! खरं तर ही कुणा एका सरीचीच फक्त गोष्ट नाहीए. ती तुमच्या आमच्यात वावरणाऱ्या असंख्य स्त्रियांचीदेखील गोष्ट आहे. फक्त त्यांचा आवाज मूक आहे. त्या व्यक्त होत नाहीत. म्हणूनच आपल्यापर्यंत त्यांचं आक्रंदन पोहोचत नाही.

लेखिका (व दिग्दर्शिका) सुचरिता तथा रमा नाडगौडा यांनी स्त्रीजातीचं अगदी आतलं दु:ख या नाटकातून वेशीला टांगलं आहे. खरं तर यात कुठल्याही नाटय़पूर्ण घटना नाहीत, मेलोड्रामा नाही, तरीही ते आपल्याला जागीच खिळवून ठेवतं.. बांधून ठेवतं. यात संदीप हे आणखी एक पात्र असलं तरी ते मंचावर प्रत्यक्ष दृश्यमान होत नाही. सरी एकटीच आपल्या स्वगतातून, स्वसंवादातून आपली कहाणी कथन करते. एकपात्री दीर्घांकात प्रेक्षकांना खिळवून ठेवणं हे येरागबाळ्याचं काम नोहे. कथेत नाटय़ात्मकता असेल, धक्कातंत्र असेल तर ते एक वेळ शक्य होतं. पण सरीच्या गोष्टीत यापैकी काहीसुद्धा नाही. म्हटलं तर ती सर्वानाच ज्ञात असलेली शोकांतिका आहे. तरीही ती आपल्याला घट्ट खुर्चीला जखडून ठेवते. हे यश जसं लेखिकेचं आहे, तसंच ते मोठय़ा ताकदीनं सादर करणाऱ्या शिवकांता सुतार या कलावतीचंही आहे. सरीची कर्मकहाणी त्या ज्या तळमळीनं आणि आर्ततेनं पेश करतात त्याला तोड नाही. खरं तर यात तांत्रिक करामतींनी प्रेक्षकाला धरून ठेवण्यासारखंही काही नाहीए. (ही सर्व तांत्रिक अंगंही रमा नाडगौडा यांनीच जितक्यास तितकी योजली आहेत.) साधी-सरळ, निव्र्याज कथनशैली हे या प्रयोगाचं वैशिष्टय़. तो बाज शिवकांता सुतार यांनीही निगुतीनं सांभाळला आहे. सरीच्या सगळ्या भावभावनांचे आंदोळ, तिचं अपरंपार दु:ख त्यांनी परिपक्वतेनं मांडलं आहे. त्यात पैचाही खोटेपणा नाहीए. म्हणूनच सरीची ही दु:खांतिका प्रेक्षकापर्यंत पोचते. त्याला गदगदून हलवते. आणि अंतर्मुखही करते.स्त्री-समस्येचं हे अनौपचारिक रूप नक्कीच एकदा अनुभवण्याजोगं आहे.