रवींद्र पाथरे

नाटककार प्रेमानंद गज्वी यांची नाटकं ही अवतीभोवतीच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांभोवतीच गुंफलेली असतात. त्यांचा ‘घोटभर पाणी’ या प्रचंड यशस्वी एकांकिकेपासून सुरू झालेला नाटय़प्रवास ‘देवनवरी’, ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘वांझ माती’, ‘तनमाजोरी’, ‘किरवंत’, ‘गांधी-आंबेडकर’, ‘नूर महंमद साठे’, ‘पांढरा बुधवार’, ‘डॅम इट अनु गोरे’, ‘शुद्ध बीजापोटी’ असा निरंतर सुरू आहे. त्यात ‘छावणी’ या नक्षलवादावरील नाटकाची नवी भर पडली आहे.

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”

गज्वींच्या नाटकांतून त्यांनी मांडलेले विषय, त्यांची मांडणी आणि त्यांतून प्रतीत होणारा त्यांचा दृष्टिकोण हे काही वेळा वादग्रस्तही ठरले आहेत. परंतु एक खरंय, की प्रत्येक नाटय़विषय ते पोटतिडिकेनं मांडत असतात. त्यांचं ‘छावणी’ हे नाटक काही वर्षांपूर्वी सेन्सॉरच्या कात्रीत अडकलं होतं. त्यावरून बराच गदारोळ माजला होता. परंतु त्यावेळचे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत या नाटकावरील सेन्सॉरचे आक्षेप बाजूस सारून त्यास प्रयोग परवानगी देत असल्याचे घोषित केले होते. अर्थात तरीही हे नाटक तेव्हा रंगभूमीवर येऊ शकलं नव्हतं. याचं कारण व्यावसायिक रंगभूमीवर अशी गंभीर विषयावरची नाटकं धंदा करू शकत नाहीत, ही निर्मात्यांची भीती! खरं तर प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर हे नाटक व्हायला काहीच हरकत नव्हती. परंतु तेही घडलं नाही. तथापि प्रेमानंद गज्वींच्या पंचाहत्तरीनिमित्ताने मंजूल भारद्वाज यांच्या ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने ‘छावणी’चे तीन सलग प्रयोग सादर करून ते रसिकांसमोर आणलं. 

गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांपेक्षा त्यांच्या शहरी माओवादी समर्थकांवर शासनाची वक्रदृष्टी झाली आहे. अनेक बुद्धिवादी नक्षल समर्थक कोरेगाव भीमा प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. त्यांचे खटले न्यायप्रविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर गज्वी यांचं ‘छावणी’ हे नाटक मंचित झाल्याने नक्षलवादाबद्दल त्यात काही नवी मांडणी गज्वींनी केली आहे का, याची स्वाभाविकपणेच उत्सुकता होती. मुळात नक्षलवादाचा जन्म कोणत्या परिस्थितीत व कशाकरता झाला, या संघर्षांतून आजवर नेमकं काय साध्य झालं, नक्षलवाद्यांचा लढा का यशस्वी होऊ शकला नाही, वगैरे गोष्टींवर ज्या भागांत नक्षलवादी कारवाया होत असतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, या विषयाचे विविध कंगोरे समजून घेत, स्थानिक जनता, नक्षलवादी व शासनाचीदेखील बाजू समजून घेऊन अनेकांनी यावर अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली आहेत. तरीही या विषयाच्या सर्व बाजू लोकांसमोर म्हणाव्या तितक्या प्रमाणात अद्याप आलेल्या नाहीत. अनिल बर्वे यांच्यासारख्या साहसी पत्रकार लेखकाने नक्षलवाद्यांच्या गुहेत शिरून ‘ऑंखो देखा हाल’ सांगणारी वार्ताकने मालिकारूपात प्रसिद्ध केली होती, त्यासही बराच काळ लोटला आहे. गज्वींनी नक्षलवादाचा असा काही अभ्यास केला का, आणि केला असेल तर त्यांचा अनुभव काय आहे, याबद्दल औत्सुक्य होतं. परंतु दुर्दैवानं ही अपेक्षा ‘छावणी’मध्ये पूर्ण होत नाही हे खेदानं नमूद करावं लागतं. नाटकाचा शेवट तर मेलोड्रामा वाटावा इतका अविश्वसनीय आहे. 

नाटकात ‘एम. एम.’ तथा ‘मार्क्‍स माओ’ नावाची नक्षलवादी चळवळीची म्होरकी विद्यमान शासनव्यवस्था नेस्तनाबूत करून दलित-शोषितांची सत्ता आणण्याचा विडा उचलून सक्रीय आहे. तिला जातव्यवस्थापीडित आणि वर्गशोषितांतून कट्टर नक्षली कार्यकर्ते लाभले आहेत. गणी गांगल (वर्गपीडित) आणि सानंदी साठे (जातव्यवस्थापीडित) हे त्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणता येईल. आपल्या कुटुंबांवरील अन्यायाचा सूड घेण्याच्या हेतूने या दोघी नक्षल चळवळीत सामील झाल्या आहेत. यापलीकडे एकूणच मानवजातीवरील अन्याय-अत्याचारांच्या चिडीतून नक्षलवादी झालेले कार्यकर्ते ‘छावणी’त दिसत नाहीत, हे या नाटकातले मोठे न्यून.  नक्षलवाद्यांना बौद्धिक अधिष्ठान पुरवणारे चळवळीचे समर्थक केवळ व्यक्तिगत सूडभावनेने यात सामील झालेल्यांच्या पाठीशी उभे राहतील हे बिलकूल संभवत नाही. या अर्थाने नक्षलवादी चळवळीमागील सीमित पार्श्वभूमी या नाटकाला आहे. मात्र, नाटकाच्या उत्कर्षबिंदूपाशी नाटक येतं तेव्हा त्यामागे भलतंच षडयंत्र असल्याचं उघड होतं आणि नाटकाचा नैतिक डोलाराच कोसळतो. नक्षल चळवळीला आर्थिक रसद पुरवणारा उद्योगपती भारतीय संविधानावर निष्ठा व्यक्त करून इथली शासनव्यवस्था उलथवू पाहणाऱ्या या ‘चिनी’ कटास साफ विरोध करतो, हे नक्षलवादी चळवळीचं अविश्वसनीय सुलभीकरण होय. नक्षलवादी कारवायांत गुंतलेल्यांना आपल्या म्होरक्याचं मुख्य उद्दिष्टच माहीत नसणं, हे अतिच झालं. असो.

प्रेमानंद गज्वी यांनी नक्षलवादावरील या नाटकात वैदिक ब्राह्मणी विचारांना थेट आव्हान दिलेलं आहे. या विचारांचे अध्वर्यु असलेल्या शंकराचार्याचे अपहरण करून त्यांच्याचकडून जातव्यवस्था नष्ट करण्याचं आवाहन करण्याची कृती ही हास्यास्पदच होय. कारण समस्त हिंदू शंकराचार्याच्या विचारांचे अनुपालन करतात, हा भाबडा विचार यात अध्याहृत आहे. अगदी हिंदू बहुसंख्याकांचं उन्मादी, धार्मिक राजकारण करणारा भाजपदेखील शंकराचार्याना धूप घालीत नाही, हे प्रत्यक्ष वास्तव आहे. त्यांनी फक्त आणि फक्त सत्तेकरताच धर्माचं कातडं पांघरलं आहे; जे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात संविधानाच्या चौकटीलाच आव्हान देणारं आहे. असो.

राहता राहिली गोष्ट : नक्षलवाद्यांच्या समानतेच्या व शोषित-पीडितांच्या हाती सत्ता देण्याच्या आकांक्षेची! त्याबद्दल कुणाही संवेदनशील व्यक्तीचं दुमत होणं अशक्यच. ती कळकळ मात्र नाटकात बहुतांशी उत्तम प्रकारे व्यक्त झाली आहे. व्यक्तिगत आयुष्य की समाजहित महत्त्वाचं, यावरही नाटकात चर्चा केली गेली आहे. याची निवड खरं तर ज्याची त्यानंच करायची असते. नक्षलवादी सानंदी साठे आणि ‘एम. एम.’चा साधं-सरळ कौटुंबिक आयुष्य जगू इच्छिणारा मुलगा विधान यांच्यात रुजूू घातलेलं नातं.. आणि उभयतांच्या अतिरेकी विचारांमुळे त्यांच्यात पराकोटीचा संघर्ष होणंही अपरिहार्यच. त्यातून या दोन्ही दरडीवर पाय ठेवून आयुष्य जगू पाहणाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची फरफटदेखील अपरिहार्यच. खुद्द ‘एम. एम.’नेच व्यक्तिगत आयुष्यात ती अनुभवली आहे. मात्र, नक्षलवादी चळवळीचा खरा चेहरा आपला देश चिनी ड्रॅगनच्या घशात घालणं हा असेल तर अशी चळवळ भारतात कदापि यशस्वी होऊ शकत नाही. नक्षल चळवळीचा हा अन्वय लेखकानं कुठल्या अभ्यासाधारे काढला आहे, कळायला मार्ग नाही. शहरी बुद्धिवादी मंडळी अशा फुटीरतेला समर्थन देताहेत, हेही काहीसं न पटणारं.   

दिग्दर्शक मंजूल भारद्वाज यांनी हे डाव्या विचारांचं वाहक नाटक सादर करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. मात्र, नाटक ही मुळात कला आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. प्रचारनाटय़ आणि नाटक यांत मोठा फरक आहे. प्रचारनाटय़ासारखंच ‘छावणी’ पेश केल्याचं प्रकर्षांनं जाणवतं. कलावंतांनीही डाव्या विचारांशी बांधिलकी दाखवत ते जोशपूर्णरीत्या सादर केलं आहे. जोशीले संवाद आणि त्यामागील भावनांची कळकळ नाटकात प्रखरतेनं व्यक्त होत असली तरी रंगमंचावर एका ओळीत उभं राहून संवादफेक करणं म्हणजे नाटक नव्हे. तिला श्रुतिका म्हणता येईल. फार तर ‘सवेष नाटय़वाचन’!  एक मात्र खरंय, की एखाद् दुसरा अपवाद करता कलावंतांनी झोकून देऊन कामं केली आहेत. त्यातून त्यांची वैचारिक बांधिलकी स्पष्ट होते. परंतु कला ही यापल्याडची गोष्ट आहे.. अश्विनी नांदेडकर (एम. एम.), कोमल खामकर (सानंदी साठे), सायली पावसकर (गणी गांगल) यांनी जोशपूर्ण, समर्पित नक्षलवादी उत्तमरीत्या साकारले आहेत. पण त्यांना अन्यांची त्या तोडीची साथ लाभलेली नाही. दिग्दर्शक मंजूल भारद्वाज यांनी नाटक ही कला आहे ही बाब ध्यानात घेणं आवश्यक आहे. विचारांची बांधिलकी आणि समाजहिताची कळकळ या गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या आणि प्रबोधन हे नाटकाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असलं तरीही नाटक ही प्राय: कला आहे याकडे काणाडोळा करणं बिलकूल उचित नाही. त्यातली तांत्रिक अंगंही तितकीच महत्त्वाची असतात. आशयाच्या अंगानं अर्थपूर्ण नाटकं पेश करणं हा त्यांच्या संस्थेचा प्रथम उद्देश असला तरी अग्रलेखस्वरूप नाटय़वाचन हे कदापिही स्वीकारार्ह नाही. 

Story img Loader