रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याकडे रंगभूमीवर कोणते विषय चालू शकतात याचे काही ठोकताळे ठरलेले आहेत. आणि बहुधा त्यानुसारच नाटकं लिहिली आणि केलीही जातात. गेले काही दिवस नवरा-बायकोच्या नात्यावरच इतकी नाटकं आलीत, की त्यांचं अजीर्ण व्हावं. त्यात आता आणखी एका नव्या नाटकाची भर पडलीय. ती म्हणजे सागर देशमुख लिखित-दिग्दर्शित ‘किरकोळ नवरे’ या नाटकाची. अनामिका आणि युवांजनी नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित हे नाटक मात्र नेहमीच्या पठडीतल्या नवरा-बायको नात्यातील समज-गैरसमजांपेक्षा वेगळंच आहे, ही त्यातली सकारात्मक गोष्ट आहे.

इथे एका दाम्पत्यातील नवरा कंपनीतील वरिष्ठांच्या दबावामुळे एका घोटाळ्यात अडकल्याने जेलमध्ये गेलाय. यादरम्यान त्याच्या बायकोने त्याच्याशी घटस्फोट घेऊन त्यानंतर दुसरं लग्नही केलंय. आणि अचानक तीन वर्षांनंतर तो माजी नवरा निर्दोष सुटून परत आपल्या घरी येतो, तेव्हा बायको त्याच्याच घरात राहत असते. आणि तोही तुरुंगातून सुटून आल्यावर आपल्या त्याच घरी परत येतो; जिथे त्याच्या बायकोनं आपला नवा संसार थाटलेला असतो. कारण ते घर त्यांच्या संयुक्त नावावर असतं.

आता आली का पंचाईत!

आपला माजी नवरा (आनंद) असा अकस्मात घरी आल्यावर अनामिका आणि संजय (तिचा आताचा नवरा) यांना ऑकवर्ड वाटणं स्वाभाविकच. पण आनंदचं म्हणणंही बिनतोड.. माझं हे घर आहे, तर मी इथेच येणार ना! हवं तर त्यांनी (अनामिका-संजयने) नवं घर घ्यावं आणि इथून बाहेर जावं. पण अनामिका उलट त्यालाच दुसरं घर बघ म्हणून सांगते. तो म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीएत. आणि माझा या घरावर अर्धा का होईना, हक्क आहेच की! मात्र, यात संजयची पुरती गोची होते. बायकोच्या माजी पतीबरोबर एकत्र राहायचं, तर कसं? अनामिकाचीही चीडचीड होते. ती तो सगळा राग संजयवर काढते. तो बिचारा आधीच होयबा. अनामिकापुढे त्याचं काहीएक चालत नाही. पण प्रेम म्हटल्यावर तडजोड आलीच असं समजून तो अनामिकाचं सगळं भलंबुरं ऐकत असतो. पण आनंदचं म्हणणंही त्याला पटतं. त्याचं घर आहे, तो राहणारच ना इथे. हळूहळू आनंदचं तिथं असणं अनामिकाला दिवसेंदिवस डोक्यात जातं. त्याचं तिथे असणं, त्याचा घरातला वावर. सगळंच. पण आनंद मात्र शक्यतो त्यांच्याशी जुळवूनच घेत असतो. तो बाहेरच्या सोफ्यावरच आपला मुक्काम ठोकतो.

संजय मात्र अनामिकाच्या परोक्ष आनंदशी चांगलंच वागत, बोलत असतो. त्यांचं चांगलं जमतं. पण अनामिकाला ते सहन होत नाही. संजयला एकदा कॉन्फरन्ससाठी बंगलोरला जावं लागणार असतं. अनामिकाला तो आपल्याबरोबर चल म्हणतो. पण तिला ते शक्य नसतं. पण त्याने मात्र जावंच असं तिचं म्हणणं पडतं. अनामिकाचा माजी नवरा घरात असताना आपण बंगलोरला जाणं त्याला कसंतरीच वाटतं. तो विमानतळावरून परत घरी येतो. तेव्हा त्याचा आपल्यावर विश्वासच नाही, म्हणून ती जाम भडकते. त्याच्याशी संबंध तोडते. तो बिचारा बाहेर आनंदबरोबर सोफ्यावर झोपतो. एकाच घरात राहत असल्याने त्यांच्यात परस्परांशी संबंध हे येतातच. ते टाळणं तिघांनाही अशक्यच असतं. मध्यंतरी आनंदला तुरुंगात त्याला मेडिटेशन शिकवणाऱ्या प्रियाचा फोन येतो.. नाइटआऊटला जाण्यासंदर्भात. तेव्हा तो या दोघांना ‘तुम्ही बाहेर जा. मी प्रियाला इथेच बोलवतो,’ असं म्हणतो. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाजतं. पण प्रिया त्यांच्या घरी येते तेव्हा संजय अवाक् होतो. ती त्याची गोव्यातली पूर्वाश्रमीची प्रेयसी जेनी निघते. जिला तो काकाच्या धाकानं तिथंच सोडून काही न सांगतासवरता पळून पुण्याला आलेला असतो.. आता हा एक नवाच तिढा निर्माण होतो. प्रिया ही पूर्वाश्रमीची जेनी आहे, हे कळल्यावर संजयचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तो तिची माफी मागतो. झालं-गेलं विसरून जा म्हणतो.

पुढे काय होतं, हे पाहणं नाटकातच योग्य होईल.

सागर देशमुख यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं एक स्त्री आणि तिच्या आजी-माजी नवऱ्यांची गोष्ट यात मांडली आहे. स्त्री-पुरुषातलं नातं कसकशी वळणं घेतं, हा या नाटकाचा गाभा. नेहमीच्या पठडीबाहेर जाऊन लेखकानं तो चितारला आहे. यातली अनामिका ही भडक डोक्याची, आपण म्हणू तेच खरं मानणारी आणि करणारी स्त्री आहे. तिच्याबरोबर संसार थाटणारे आनंद आणि संजय हे मात्र वेगळ्या मुशीतले आहेत. संजय परिस्थितीपुढे मान तुकवणारा. तर आनंद प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारा. त्यांच्या या वृत्ती-प्रवृत्तीतूनच हे नाटक ‘घडत’ जातं. या त्रिकोणी तिढय़ाच्या गुंतागुंतीत प्रेक्षक गुंतून जाईल हे पाहिलं गेलं आहे. त्यांच्यात घडणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टी, क्रिया-प्रतिक्रिया-प्रतिक्षिप्त क्रिया यांच्या घडण्या-बिघडण्यातून नाटक पुढं पुढं सरकतं. याचा शेवट नक्की काय होणार आहे हे कळत नाही. पण तो बांधून ठेवतो खरा. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सागर देशमुख यांनी नाटकाचा बाज उत्तम रेखला आहे. पात्रांमधील परस्परसंघर्ष, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीतला फरक, त्यांतून घडणाऱ्या गमतीजमती यांचा छान वापर त्यांनी केला आहे. त्यातून माणसाचा मूळ स्वभाव कसकशी वळणं घेतो हेही त्यांनी दाखवलंय. हा सगळा पेच शेवटी त्यांनी योग्य तऱ्हेने हाताळलाय.

संदेश बेंद्रे यांचं घराचं नेपथ्य पात्रांचा आर्थिक स्तर दर्शवणारं आहे. सौरभ भालेराव यांचं संगीत नाटय़ांतर्गत ताण वाढवतं. विक्रांत ठकार यांची प्रकाशयोजना नाटकाची मागणी पुरवणारी. सोनल खराडे यांची वेशभूषा पात्रांचं अस्तित्व ठसवणारी आहे. जितेंद्र जोशी यांच्या गीताला गायक जसराज जोशींनी न्याय दिला आहे.

आनंदच्या भूमिकेत सागर देशमुख फिट्ट बसले आहेत. त्याची गोची, परिस्थितीची अपरिहार्यता आणि त्यातून आलेलं लाचारपण, त्यातूनही सर्वाना खूश ठेवण्याचं त्याचं तंत्र वगैरे गोष्टी त्यांनी दिलखुलासपणे साकारल्या आहेत. त्यांचा मुक्त वावर नाटकातला ताण कमी करतो. संजय झालेले पुष्कराज चिरपुटकर यांनी खालमानेनं जगणारा अनामिकाचा नवरा, पण मुळातला भला माणूस, भूतकाळाच्या ओझ्याखाली दबलेला प्रियकर, त्यातून आत्मविश्वास गमावलेला, सगळ्यांशीच जुळवून घेणारा असा संजय नेमकेपणाने आणि तपशिलांत उभा केला आहे. त्यांचा साधा-सरळ स्वभाव नाटकातली रंगत वाढवतो. अनिता दाते यांनी भडक माथ्याची, नवऱ्यावर वर्चस्व गाजवणारी, माजी नवऱ्याला कह्य़ात ठेवू पाहणारी स्त्री साक्षात केली आहे. जेनी ऊर्फ प्रियाची परिस्थितीनं वाकलेली, सरळमार्गी, काहीएक मूल्यं मानणारी प्रेयसीही त्यांनी तितक्याच ताकदीनं व सफाईनं वठवली आहे.एकुणात, एका वेगळ्या मांडणीचं हे नाटक आहे. ते प्रेक्षकाला खिळवून ठेवतं, हे नक्की.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natyarang plays theater produced by anamika and yuvanjani natak mandeli saisakshi published amy
Show comments