रवींद्र पाथरे

आज भारत सरकारकडून (आणि त्यांचे पित्ते असलेल्या राज्य सरकारांकडूनदेखील!) ‘शायनिंग इंडिया’चं गोडगुलाबी चित्र विविध माध्यमांतून, पान-पानभर जाहिरातींच्या माऱ्यातून देशभरातील सामान्य लोकांसमोर रंगविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असताना प्रत्यक्षात मात्र ‘जमिनी वास्तव’ काय आहे हे ज्यांना परिस्थितीच्या झळा सोसाव्या लागताहेत त्यांनाच खरं तर ज्ञात आहे. कुणीही कितीही नाकारलं तरी अजूनही शेतकरी हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे करोनाकाळाने सिद्ध केलेलंच आहे. असं असतानाही सरकारच्या प्राधान्यक्रमात सगळ्यात दुर्लक्षित आणि उपेक्षित घटक कोण असेल, तर तो शेतकरीच! ग्रामीण भागांतून निवडून आलेल्या आणि सत्तेचे सोपान चढलेल्या राजकारण्यांनाही शेतकऱ्यांशी काही देणंघेणं दिसत नाही. याचं कारण- भल्याबुऱ्या मार्गानी कमावलेला प्रचंड पैसा, उपद्रवमूल्य आणि सत्तेच्या जोरावर ते पुन:पुन्हा निवडून येतात, हे आहे. म्हणूनच ज्यांनी आपल्याला निवडून दिलंय तेही आपलं काही वाकडं करू शकत नाही याची त्यांना खात्री असते. अशा परिस्थितीत मग शेतकऱ्याला वाली कोण? (अदानींसारख्या घोटाळेबहाद्दरांच्या मागे मात्र सरकार ठामपणे उभं राहतं!) नापिकी, कोरडा वा ओला दुष्काळ, कर्जबाजारीपण यांनी संत्रस्त झालेल्या शेतकऱ्याला मग आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग तरी कोणता उरतो? या सगळ्याच्या परिणामी ‘माणूस’ म्हणून त्याचे निघालेले धिंडवडे सहन न होऊन त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला तर त्यात त्याचा दोष काय? आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या क्षुल्लक सरकारी मदतीनं हे नुकसान भरून थोडंच निघतं?
दुसरीकडे जागतिकीकरणानं सगळं जग मोबाइलच्या रूपात सर्वसामान्यांच्या मुठीत आलंय. त्यातून दिसणारं चकचकीत, कधीही न पाहिलेलं श्रीमंती जग आपल्या वाटय़ाला कधीच का येणार नाही, हा भुंगा शेतकऱ्याच्या तरुण पिढीला सतत पोखरत असेल तर याचा दोष कुणाला देणार? स्वप्नं आणि वास्तवातला हा झगडा त्यांना वैफल्यग्रस्त अन् हतबल करणारा न ठरला तरच नवल.

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास

सदानंद देशमुखांनी त्यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीमध्ये या भयाण वर्तमानाचं मर्मभेदी चित्रण केलेलं आहे. नाटककार दत्ता पाटील यांच्या अलीकडेच रंगभूमीवर आलेल्या ‘तो राजहंस एक’ या नाटकातून याच तऱ्हेनं मांडलेलं तरुण शेतकऱ्यांचं दारुण वास्तव आपल्याला अधिकच विकल करतं.
एम. ए. होऊनही नोकरीसाठी लाच म्हणून द्याव्या लागणाऱ्या पैशांअभावी नोकरी न मिळालेल्या आणि त्यापायी लग्न, संसारसुख यांना वंचित झालेल्या तरुण शेतकरी ज्ञानेशची शोककथा हा ‘तो राजहंस एक’चा विषय. एकीकडे वय वाढत चाललेलं. पस्तिशी जवळ येत चाललेली. तरुणाईतली स्वप्नं विरत जाताना अनुभवताना दु:ख, वेदनेचा आगडोंब सतत छळत राहणारा. तरुण शेतकऱ्याला खुद्द शेतकऱ्याच्या घरातली मुलगी मिळणंही दुरापास्त झालेलं. कारण एकच : शेतकऱ्याचे दु:खभोग आपल्या मुलीच्या वाटय़ाला येऊ नयेत, हे! प्रथमवधू तर राहूच दे; विधवा, घटस्फोटित मुलीही ज्ञानेशला नकार देतात. त्याचं मुळातलं कोमल कविमन त्यामुळे आक्रंदत राहतं.. कवितांतून. वास्तवाचे चटके शब्दांच्या अश्रूंतून झरत राहतात. सतत. त्याला जागतिक कवी व्हायचंय. पण गावातदेखील कवी म्हणून कुणी त्याला विचारीत नाही. घरचेही त्याला भुईला भार समजू लागलेत. एक पभ्या सोडला तर त्याचं दु:ख समजून घेणारं दुसरं कुणीच नाहीए.

मधुरा. पस्तिसावं स्थळ. इतके नकार पचवल्यानंतर अगदी नाइलाजानंच तो तिला पाहायला गेलेला. वडलांच्या आग्रहाखातर. प्रथमदर्शनीच ती त्याला आवडलेली. तिलाही त्याचं कविमन जाणवलेलं. पण तरीही ती त्याला नकारच देते. कारण- वास्तव ती नजरेआड करू शकत नाही. पण तिच्यात मनानं गुंतलेला ज्ञानेश मग तिच्या भासातच हरवून जातो. ती आपल्याला माणसात आणू पाहतेय असं त्याला खरंच वाटू लागतं. भास-आभासाच्या या खेळात त्याचं भान हरपू पाहतंय.

त्याचीच ही कहाणी.. ‘तो राजहंस एक’!
लेखक दत्ता पाटील यांनी एका सुशिक्षित, स्वप्नाळू तरुण शेतकऱ्याची विलक्षण घुसमट, दु:ख, वेदना या नाटकात मुखर केलीय. स्वप्न-वास्तवाचा हा खेळ त्यांनी अगदी तळतळून मांडलाय नाटकात. ज्ञानेशच्या आजूबाजूचं जग, त्यातले तिढे आणि एका साध्या, सरळ, निष्पाप तरुणाची त्यात होणारी होरपळ त्यांनी प्रत्ययकारीतेनं चित्रित केली आहे. ते स्वत: कवी असल्यानं कवितेच्या आधारे जगणाऱ्या ज्ञानेशची सर्वव्यापी व्यथा-वेदना त्यांनी तितक्याच तरल भाषेत चितारलेली आहे. प्रसंग-रेखाटन, व्यक्तिरेखाटन यांतला तोल त्यांनी छान सांभाळला आहे. ज्ञानेशचा मनोव्यापार त्याच्या कथनातून, स्वगतांतून, कवितांतून पाझरत राहतो आणि पाहणाऱ्याला तो दु:खार्त करीत राहतो. ‘परिवर्तन, सातारा’ या संस्थेच्या ‘मानसरंग’ या प्रकल्पांतर्गत जरी हे नाटक लिहिलं, मंचित झालेलं असलं तरी ते स्वतंत्रपणे तितकंच सशक्त आणि कसदार ठरलं आहे. नाटकात ज्ञानेशच्या तोंडची जीवनमूल्यविषयक विधानं संवेदनशील मनांना भिडल्याशिवाय राहत नाहीत. कवी असल्यानं स्वप्नांत वावरत असला तरी ज्ञानेशला वास्तवाचंही तितकंच तीव्र भान आहे. या वास्तवाला आपण बेधडकपणे सामोरे जाऊ शकत नाही, ही त्याची खरी व्यथा आहे. त्याचं तंद्रीतलं बाह्य़त्कारी रूप त्याच्या भांबावलेल्या आणि काहीशा गोंधळलेल्या मन:स्थितीचं निदर्शक आहे. पभ्या त्याला भानावर ठेवण्याचा आपल्या परीनं आटोकाट प्रयत्न करतो. मधुराच्या रूपात त्याला त्याचं श्रेयस आणि प्रेयस लाभल्याचा ‘भास’ होत असला तरी त्याच्या कविमनाला याची नितांत निकड आहे. तेही हरपलं तर तो उभाच राहू शकणार नाहीए. दत्ता पाटील यांनी हा मनोविश्लेषणपर गोफ फार सुंदररीत्या विणलेला आहे.

दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी संहितेतली तरलता प्रयोगात संक्रमित होईल याची कसोशीनं काळजी घेतली आहे. मोजकंच नेपथ्य, चपखल ध्वनिसंकेत, संवादी पार्श्वसंगीताची एकलय प्रयोगाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाते. प्रत्येक व्यक्तिरेखेचं जेवढय़ास तेवढं असणं ही या प्रयोगाची खासियत म्हणता येईल. ज्ञानेशभोवती नाटक फिरत राहतं. कारण त्याची- पर्यायानं शेतकऱ्याच्या तरुण पिढीचीच वेदना नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. ज्ञानेशच्या धाकटय़ा भावानं- सुधीरनं हमाल-मापारी होणं, गावातील तरुणाईनं दारू, गांजाच्या आहारी जाणं, रिकामटेकडय़ा उचापती करणं, मोबाइलच्या आभासी विश्वात हरवून जाणं.. हे यापरतं वेगळं काय आहे?

सगळ्याच कलाकारांची मन:पूत कामं हे या नाटकाचं वैशिष्टय़. ज्ञानेश झालेले प्राजक्त देशमुख हे स्वत:ही एक उत्तम लेखक आणि रंगकर्मी असल्याने त्यांनी कविमनाच्या ज्ञानेशचे सारे भावकल्लोळ, व्यथावेदना उत्कटतेनं व्यक्त केल्या आहेत. भूमिकेच्या अंतरंगात घुसणं म्हणजे काय, हे त्यातून आकळतं. मधुराचं भावस्वप्नदर्शी रूप अनिता दाते यांनी समजून उमजून साकारलंय. पभ्याचं समजूतदारपण अमेय बर्वे यांनी नेमकेपणानं पकडलंय. धनंजय गोस्वामी (सुधीर) आणि हेमंत महाजन (वडील) यांनीही आपल्या वाटय़ाचं काम चोख केलंय.

चेतन-लक्ष्मण यांचं सूचक नेपथ्य नाटकाची मागणी पुरवणारं. रोहित सरोदे यांनी संगीतातून स्थळकाळाचे संदर्भ जिवंत केले आहेत. प्रफुल्ल दीक्षित यांची प्रकाशयोजना यथार्थ वातावरणनिर्मिती करणारी आहे. नयना शिंदे (रंगभूषा) आणि सचिन शिंदे (वेशभूषा) यांचीही कामगिरी चोख.
एक जिवंत जीवनानुभव देणारं हे नाटक संवेदनशील प्रेक्षकांनी आवर्जून पाहायलाच हवं.

Story img Loader