रवींद्र पाथरे

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा..’ अशी राणाभीमदेवी गर्जना करून सत्तेवर आलेल्यांचा गेल्या आठ-नऊ वर्षांचा सत्ताकाळ लोकांनी जवळून पाहिलाय.. पाहताहेत. ‘गेल्या ७० वर्षांत कॉन्ग्रेसने देशाला भ्रष्टाचारानं पार पोखरून काढलं.. या काळात देशाचा विकासच झालेला नाही,’ असंही उच्चरवानं सांगितलं जातं. (यात काळाच्या संदर्भाची बहुधा काहीतरी गल्लत झालेली दिसतेय. किंवा मग सत्य मान्य करण्याचं धाडस तरी या विधानात असावं. कारण देशाला स्वातंत्र्य मिळून आत्ता कुठं ७५ र्वष होताहेत. आणि त्यात जनता पक्ष, अटलबिहारी वाजपेयींचा कार्यकाल तसंच मोदींची पहिली दोन-तीन वर्षेंही येतात.) अर्थात प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे जे नागरिक खरंच सुजाण, सुबुद्ध आणि विवेकी आहेत त्यांना नक्कीच माहीत आहे. बाकी बोलबच्चनगिरी व दामटून खोटं बोलण्याने भापणाऱ्या भाबडय़ा लोकांना आणि अंध भक्तांना वास्तवाशी काही देणंघेणं नाहीए, हे खरंय.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस

एक मात्र झालंय.. विरोधी पक्षांतल्या खाबूरावांना (आणि आपल्याला न जुमानणाऱ्यांना) ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या यंत्रणांचा चाप लावून अंधारकोठडीची हवा दाखविण्याचं परमपवित्र कार्य सध्या जोमानं सुरू आहे. स्वपक्षातील सगळे राजकारणी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले की लगोलग त्यांना ‘क्लीन चीट’ची सर्टिफिकेट्सही छापूनच ठेवलेली आहेत. त्यांना संसदीय चौकशी, तसंच पोलिसी वा आर्थिक गुन्हे तपास शाखेच्या ससेमिऱ्यांस तोंड द्यावं लागू नये म्हणून ही चोख व्यवस्था! (अलीकडेच एका उद्योगपतीच्या हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्यानं देश ढवळून निघालेला असताना त्याची साधी चौकशीही होऊ नये म्हणून किती सव्यापसव्य केले गेले, हे लोकांनी उघडय़ा डोळ्यांनी पाहिलंय!) तसंच ज्या विरोधीपक्षीय नेत्यांच्या विरोधात आपणच पूर्वी भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे देऊन आरोप केले होते, त्यांनी ईडीफिडी मागे लागू नयेत म्हणून आपल्या पक्षात प्रवेश केला की लगेचच ते वाल्याचे वाल्मीकी झाल्याचं घाऊक प्रमाणपत्र देऊन त्यांना पावनही करून घेतलं जातंय. त्यांच्यासाठी ‘स्पेशल लॉन्ड्री’ दिवस-रात्र काम करते. अशांना मग रात्री बिनघोर झोप लागते. बक्षिसी म्हणून वर आमदार-खासदारकी तसंच गेला बाजार मंत्रिपदही मिळतं. आणखीन काय हवं? बरं, हे सगळं राजरोस आणि सार्वत्रिक व सर्वपक्षीय आहे. कुठल्याही गल्लीपातळीवरील राजकारण्याची आर्थिक प्रगती ज्या झपाटय़ानं होते, ती पाहता आपण आपलं शिक्षण, गुणवत्ता, कार्यक्षमता वगैरे सिद्ध करण्यासाठी का जिवाचा एवढा आटापिटा करतो असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडत असतो. असो.

पण सारासार विवेकबुद्धी शाबूत असलेली सामान्य माणसं यातलं खरं काय अन् खोटं काय हे पक्कं जाणून असतात. मात्र, ती हतबल आणि अगतिक असतात. राजकारण्यांचं ती काहीच वाकडं करू शकत नाहीत. कारण ‘जनतेच्याच भल्यासाठी आणि विकासासाठी’ राजकारण्यांचा हा ‘बाजार’ भरलेला असतो ना! निदान तोंडदेखला तरी!!

हे सगळं वर्तमान वास्तव आठवायचं कारण- ‘सुयोग’ निर्मित, विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘येतोय तो खातोय’ हे नवं लोकनाटय़! ‘सत्तापूर’ राज्याच्या राजाला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी टपून बसलेले त्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री सुभानराव हे सतत काही ना काही कटकारस्थानं करत असतात. दिल्लीश्वर सम्राटांच्या वरदहस्ताने राज्यात सत्तापालट करण्याचे मनसुबे ते रचतात. परंतु ते खात्रीनं आपल्या अंकित राहतील याबद्दल दिल्लीश्वरांना शंका असते. त्यामुळे मग स्वत:चा ‘चेहरा’ नसलेल्या, बिनकण्याच्या (पण सत्ताकांक्षी) शांतीसिंह या नवख्या नेत्याला हाताशी धरून सम्राटांचे बगलबच्चे असलेले खोकेलाल आणि बोकेलाल (किती समर्पक नावं!) हे सत्तेचे एजंट सत्तापालट घडवून आणतात. त्यामुळे सुभानरावला हात चोळत बसण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. असंतुष्ट सुभानरावला (त्यानं नस्त्या उचापती करत बसू नये म्हणून) मंत्रिपदी नियुक्त केलं जातं. आपण बंड करून काहीही साध्य होणार नाही हे ध्यानी आलेला सुभानराव अपमान गिळून (योग्य संधीची वाट बघत) सत्तेचा फेकलेला तुकडा निमुटपणे चघळत राहतो.

शांतीसिंह सत्ताधीश होताच आपल्या खुर्चीची योग्य ती बांधबंदिस्ती करण्याच्या प्रयत्नांना लागतो. दिल्लीधीशांना कात्रजचा घाट दाखवून आपली खुर्ची बळकट करण्याचा त्याचा डाव असतो. पण सम्राट अतिशय धूर्त, निष्ठुर आणि ‘पोचलेले’ असतात. त्यांचे एजंट खोकेलाल व बोकेलाल त्यांना शांतीसिंहाच्या कारनाम्यांची इत्थंभूत माहिती पुरवीत असतात. सुभानरावला यात मोठीच संधी दिसते. तो खोकेलाल-बोकेलालना हाताशी धरतो. शांतीसिंहाला त्याच्या गोंडाघोळू मैत्रिणीच्या- मेनकेच्या मार्फत कैचीत पकडून त्याची गादी खालसा करण्याचे ठरते. मेनकेलाही राजगादीवर बसण्याची आकांक्षा असते. ती खोकेलाल-बोकेलालच्या साहाय्यानं कट रचते. आपली मैत्रीण राधा आणि तिचा प्रियकर असलेल्या कोतवालालाही ती त्यात सामील करून घेते.

त्यामुळे सत्तापालट अटळ असतो. याचं कारण- शांतीसिंहाने सर्वशक्तिमान सम्राटांनाच आव्हान दिलेलं असतं. आणि आपल्या विरोधात सम्राट काहीही खपवून घेत नाहीत अशी त्यांची ख्याती असते.काय होतं या सत्तांतर-नाटय़ात? सुभानरावला राजगादी मिळते का? की ती मेनकेला मिळते? की शांतीसिंहच त्यांचा डाव उलटवतो?.. या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकातूनच मिळवणं उचित ठरेल.

या नाटकाचे लेखक विजय कुवळेकर हे हाडाचे पत्रकार असल्याने त्यांना राजकारणातील छक्केपंजे, डावपेचांची खोलात माहिती असणार यात शंकाच नाही. सध्या राजकारणाला जे विकृत स्वरूप आलंय त्याने सामान्य जनताही उद्विग्न झालेली आहे. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण याआधी कधीच गेलं नव्हतं. त्यामुळे या परिस्थितीला वाचा फोडणारी कलाकृती रंगभूमीवर येणं अपरिहार्यच होतं. ते काम कुवळेकरांनी केलं आहे. फक्त त्यांनी त्यासाठी मुक्तनाटय़ाचा फॉर्म वापरला आहे. ज्यात म्हटलं तर थेट भाष्य करता येतं, वा म्हटलं तर ते ‘फिक्शन’ असल्याचा दावाही करता येतो. सत्तापूरच्या सत्तासंघर्षांत सद्य:राजकारणाचे अनेक रंग प्रकर्षांनं दिसतात. खोकेलाल-बोकेलाल यांचं वानगीदाखल उदाहरण देता येईल. ‘जनतेच्या कल्याणा.. राजकारण्यांच्या विभूती’ असं तोंडानं ते कितीही म्हणत असले तरी त्यांची आपल्या सात पिढय़ांची तरतूद करण्याची राक्षसी इच्छा कधीच लपवता लपत नाही. लोकही ते जाणून आहेत. आजच्या राजकारणाचं हे अत्यंत हिडिस चित्र ‘येतोय तो खातोय’ या शीर्षकापासूनच स्पष्ट होतं. नाटकात राजकारण्यांच्या प्रत्यक्ष ‘खाण्याचं’ चित्रण नसलं तरी त्यांचे नाना उद्योग, उचापती कशासाठी चालतात हे लोकांना चांगलंच ठाऊक आहे. त्याचं स्वच्छ, पारदर्शी दर्शन या नाटकात होतं. ‘सत्ताकारण हे लोकांच्या भल्यासाठी असावं’ ही राज्यघटनेतील अपेक्षा केव्हाच पायदळी तुडवली गेली आहे. आजचं विकृत राजकारण आणि ते करणारे राजकारणी खरं तर लोकांच्या डोक्यात जातात. पण त्यांचं काहीही वाकडं करणं त्यांच्या हाती नाही, ही त्यांची खरी खंत आहे.

दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनी हा मुक्तनाटय़ाचा फॉर्म उत्तम हाताळला आहे. ठसठशीत व्यक्तिरेखाटन ही या नाटकाची गरज होती, ती त्यांनी अचूक पात्रनिवडीतून पुरवली आहे. ‘रंजनातून प्रबोधन’ हे लोकनाटय़ाचं प्रयोजन त्यांनी कुठंही दृष्टीआड होऊ दिलेलं नाही. विशेषत: ‘कुणी पाठिंबा देता का पाठिंबा’ हे शांतीसिंहाचं स्वगत बहारदार झालं आहे. राजकारणानं किती केविलवाणं रूप धारण केलं आहे हे त्यातून दिसून येतं. सुभानरावचं ‘आणि त्या ठिकाणी’ हे पालुपद असंच भन्नाट! खोकेलाल व बोकेलालच्या जेश्चर-पोश्चरमधून आणि वेशभूषेतून दिग्दर्शकाला कुणाकडे निर्देश करायचाय हेही स्पष्ट होतं.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी राजदरबार आणि अन्य नाटय़स्थळं वास्तवदर्शी आणि सूचक सांकेतिकतेतून उभी केली आहेत. विजय कुवळेकर यांची प्रसंगानुरूप चपखल गाणी संगीतकार अजित परब यांनी सुश्राव्य केली आहेत. महेश शेरला (वेशभूषा), शरद सावंत (रंगभूषा), माधुरी जाधव (केशभूषा) यांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे.

संतोष पवार हे उपजतच सोंगाडे असल्याने आणि लोककला हा त्यांच्या हातचा हुकमी एक्का असल्याने कोतवालाच्या (आणि रंगरावच्याही!) भूमिकेत ते धम्माल करतात. त्यांचं रंगमंचावरचं मुक्त बागडणं नाटकात मस्त रिलीफ देतं. शांतीसिह झालेले स्वप्नील राजशेखर यांनी ‘पािंठंबा देता का कुणी पाठिंबा’ या स्वगतातील आर्तता छान पकडलीय. भार्गवी चिरमुले यांनी राधाची विविध रूपं नेमकेपणानं साकारली आहेत. मयुरा रानडेंची मेनकाही ठसकेबाज. खोकेलाल आणि बोकेलालच्या भूमिकेत अनुक्रमे अधोक्षज कऱ्हाडे आणि सलीम मुल्ला यांनी बनेलपणाचा अर्क सादर केला आहे. ऋषिकेश वांबुरकरांचा सुभानराव एका विद्यमान नेत्याचं समर्पक अर्कचित्र उभं करतो. महेंद्र वाळुंज शाहिराच्या भूमिकेत खणखणीतपणे व्यक्त झालेत.
आजच्या राजकारणाचं एक छानसं व्यंगचित्र पाहायचं असेल तर ‘येतोय तो खातोय’ला पर्याय नाही.

Story img Loader