माणूस जे आयुष्य जगत असतो, जगण्याच्या वाटेवर त्याच्या वाटय़ाला जे बरे-वाईट अनुभव येत असतात, त्यावर तो कळत-नकळत चिंतन, मनन करत असतो अन् त्यावर प्रतिक्रियाही देत असतो. कधी ती व्यक्त स्वरूपातली असते, तर कधी अव्यक्त! ज्यांना सृजनाचा परीसस्पर्श झालेला असतो आणि ज्यांच्यापाशी प्रतिभा असते, असे थोडके भाग्यवंत कलेच्या माध्यमातून त्यावर व्यक्त होत असतात. परंतु बहुतांश सर्वसामान्य माणसं मात्र आपल्या सुहृदांकडे मन मोकळं करून आपली जगण्यावरची प्रतिक्रिया देत असतात. काही स्वत:शीच संवाद करत राहतात आणि त्याद्वारे स्वत:ला व्यक्त करतात. पण ज्यांना एखादी कला वश असते असे कलावंत निव्वळ आपले अनुभव, आपलं जगणं आणि त्याबद्दलचं आपलं आकलन कलेतून मांडून थांबत नाहीत, तर आजूबाजूचं जग, त्यातली माणसं, भोवताली घडणाऱ्या घटना याही त्यांना खुणावत असतात. त्यांच्यातला अस्वस्थ कलावंत त्यावर व्यक्त होऊ मागतो आणि त्यातूनच जन्मते त्यांची कलाकृती!
परंतु त्या कलाकृतीचा अन्वय लावताना मात्र रसिक आपापली कल्पनाशक्ती लढवत असतात. त्यातून कधी कधी कलाकाराला अभिप्रेत नसलेला किंवा त्याहीपलीकडचा अर्थही त्या कलाकृतीतून काढला जातो. मात्र, कलाकार आणि त्याची कलाकृती यांच्यात त्याच्या स्वरूपाबद्दल संवाद घडवून आणला तर त्या कलाकृतीतलं नेमकं मर्म सामान्य रसिकांना कळू शकतं. असा एक अभिनव ‘प्रयोग’ आविष्कार संस्थेनं चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रकृतींसंदर्भात प्रथमच रंगमंचावर सादर केला आहे. यापूर्वी कथा, कादंबरी, कविता, ललित लेख अशा विविध साहित्यकृतींचं रंगमंचीय सादरीकरण बऱ्याचदा झालेलं आहे. ते कधी यशस्वी झालंय, तर कधी बाळबोध सादरीकरणामुळे प्रेक्षकांची निराशाही झालेली आहे. तथापि अशा तऱ्हेनं चित्रांचं रंगमंचीय गोष्टीरूप सादरीकरण भारतीय रंगभूमीवर बहुधा पहिल्यांदाच होत असावं. लेखिका-समीक्षक शांता गोखले आणि रंगकर्मी सुषमा देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ‘चित्रगोष्टी’तून सुधीर पटवर्धन यांच्या चित्रकृतींचं नाटय़ात्म आविष्करण यशस्वी झालं आहे यात शंका नाही. काही आक्षेप जरूर आहेत; परंतु एकुणात हा ‘प्रयोग’ खिळवून ठेवणारा आहे, हे निश्चित.  
मूळचे पुण्याचे असलेले चित्रकार सुधीर पटवर्धन मुंबईत आले तेव्हाची मुंबई आणि कालौघात तिच्यात झालेले बदल, स्थित्यंतरं, इथली नाना स्तरांतली माणसं, आर्थिक-सामाजिक बदलांनी या शहराचं आमूलाग्र बदललेलं रूपडं, माणसा-माणसांतील नातेसंबंधांत येत गेलेलं तुटलेपण, कलावंतांचं कलावंतपण आणि त्याचं व्यक्तिगत जीवन.. अशा अनेक गोष्टी चित्रकार सुधीर पटवर्धन यांना भावल्या आणि त्यांनी त्या आपल्या चित्रांतून बद्ध केल्या आहेत. त्यांतून एक कलाकार म्हणून जसा त्यांचा प्रवास दिसतो.. जाणवतो, तसंच त्यांच्यातल्या अतिशय संवेदनशील अशा ‘माणसा’चंही दर्शन घडतं. त्यांच्या वैविध्यपूर्ण कलाकृती एका सूत्रात बांधणं तसं अवघडच. तरीही एखादी नाटय़कृती त्यातून साकारायची तर त्याला एक समान सूत्र, समान दुवा हवा. लेखक-दिग्दर्शक सुषमा देशपांडे यांनी ‘चित्रकाराला घडलेलं जीवनदर्शन’ या दुव्याभोवती हा रंगाविष्कार गुंफला आहे. त्यासाठी सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांतली पात्रं त्यांच्याशी संवाद करताहेत, हा फॉर्म त्यांनी निवडला. परंतु यात गोची अशी झालीय, की ही पात्रंच मग त्यांच्या चित्रातल्या आशयावर कॉमेन्ट करू लागलीत. चित्रांतल्या विषयाचं रंगमंचीय सादरीकरण आणि त्यावरचं त्यातल्या पात्रांचं भाष्य यामुळे या रंगाविष्कारात अनाठायी पुनरुक्ती झालीय. त्याचबरोबर  बाळबोधपणाही! सुषमा देशपांडे यांना हे नक्कीच टाळता आलं असतं. यातल्या पात्रांचं जगणं चित्रविषयाच्या प्रत्यक्ष सादरीकरणातून व्यक्त होतंच; मग आणखीन पात्रांकरवी त्यावर शेरेबाजी करण्याची काय आवश्यकता? तुमची कलाकृतीच बोलायला हवी. तशी ती बोलतेही. पण मग हा आणखीन शेरेबाजीचा मोह कशासाठी? तो सहजगत्या आविष्कारात एकजीवही होत नाही. असो.
पन्नास-साठच्या दशकातल्या मुंबईपासून या शहराचं अंतरंग कसकसं बदलत गेलं, याचा आलेख ‘चित्रगोष्टी’मध्ये पाहायला मिळतो. त्याकाळी मुंबईत इराण्याच्या हॉटेलांची चलती होती. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक घडणीत इराण्याच्या हॉटेलांचा मोठा वाटा आहे. कालौघात इराण्यांची हॉटेलं आज नामशेष झाली आहेत. त्यांचं क्वचितच कुठेतरी चुकार अस्तित्व आता जाणवतं. इराणी हॉटेलांच्या अस्ताबरोबरच तत्कालीन मुंबईकरांच्या निवांत, सुशेगात, आत्मीय जीवनशैलीचाही शेवट झाला. अशाच एका इराणी रेस्टॉरण्टच्या मालकाचा त्याच्या ‘टेबलू’बरोबरचा भावोत्कट संवाद सुधीर पटवर्धन यांच्या ‘इराणी रेस्टॉरण्ट’ या चित्रातून होतो. मुंबईत जन्माला आलेल्या आणि इथंच लहानाचा मोठा झालेल्या या माणसाचं व्यक्तिगत आयुष्य जसं त्यातून उलगडतं, तसंच मुंबईच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली ही हॉटेल संस्कृती काळाच्या तडाख्यानं कशी भुईसपाट केली त्याचं मन पिळवटून टाकणारं चित्रही आपल्यासमोर उभं राहतं.  एकेकाळी हे शहर कामगारांचं शहर होतं. पोटापाठी आलेल्या या कष्टकऱ्यांचं आयुष्य आणि त्यांनी आपल्या हक्कांसाठी बांधलेली कामगार चळवळ- यांच्यातले चढउतार ‘द सिटी’ या चित्रातून समोर येतात. कामगार चळवळीचा लाल बावटा खांद्यावर घेऊन आपल्या मागण्यांसाठी लढणाऱ्या कामगारांचं मुबईच्या लोकल प्रवासाशी बांधलेलं आयुष्याचं रहाटगाडगं कधीतरी अकस्मात एखाद्या रेल्वे अपघातात संपूनही जातं. परंतु जाणाऱ्यासाठी दोन अश्रू ढाळायलाही इथं कुणाला उसंत नसते. ‘अ‍ॅक्सिडण्ट ऑन मे डे’मधलं हे क्रूर वास्तव आपल्याला अंतर्मुख करतं. एकेकाळी गिरण्यांच्या भोग्यांनी, तिन्ही पाळ्यांत चालणाऱ्या गिरण्यांनी गजबजलेल्या गिरणगावावर ८२ च्या संपानं मरणकळा आणली. आज त्या गिरण्यांच्या जमिनींवर टोलेजंग टॉवर्स उभे राहिलेत आणि गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागलाय. लोअर परेल पुलाच्या चित्राच्या पाश्र्वभूमीवर मुंबईची ही बदलती स्कायलाइन आणि लोकसंस्कृती यांचा वेध घेणारा देवदत्त साबळे यांचा पोवाडा काळजात कळ उठवून जातो.  १९९३ साली मुंबईत हिंदू-मुस्लीम दंगली घडवून माणसा-माणसांत अविश्वासाचं बीज पेरणाऱ्या समाजविघातक शक्तींमुळे बदललेलं इथलं लोकमानसही सुधीर पटवर्धनांच्या चित्रातून व्यक्त झालंय. समोरच्या माणसाच्या सरळ-साध्या वागण्याचे वाकडे संदर्भ लावण्यापर्यंत त्यामुळे माणसांची मजल गेलीय.
घरच्यांच्या छळाला कंटाळून छिंदवाडय़ाहून मुंबईत पळून आलेल्या एका मुलाला मुंबई कशी पोटाशी घेते आणि त्याला आश्रय देणाऱ्या एका गृहस्थाकडून गाद्या विणण्याची विद्या प्राप्त करून पुढे तो आपल्या स्वत:च्या पायावर कसा उभा राहतो, हेही एका चित्रात आढळून येतं. कलावंत स्त्रीची विविध रूपं पटवर्धनांच्या ‘अभिनेत्री’ या चित्रातून प्रकट होतात, तर ‘रनिंग वुमन’ या चित्रातून नोकरदार स्त्रीचं घडय़ाळाच्या काटय़ांवर अविश्रांत चोवीस तास धावणं त्यांनी चितारलंय. स्केचेसमध्ये स्त्रियांची नाना रूपं पाहायला मिळतात. तर ‘सायलेन्स’मध्ये म्हातारपणी आपल्या नातेसंबंधाचं मूक, तटस्थ सिंहावलोकन करणाऱ्या एका दाम्पत्याचं दर्शन घडतं. अवाक्षरही न बोलता त्यांच्यात झडणाऱ्या या संवादातून मानवी नात्यांतले अनवट तिढे आपल्यासमोर प्रकट होतात. या मूक चित्राचं मूक सादरीकरण खूपच ‘बोलकं’ आहे. त्यात गीता पांचाळ आणि मंगेश क्षीरसागर या कलावंतांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील नुसत्या हावभावांतूनच त्यांच्या मनात काय खदखदतंय हे कळून येतं. मानवी नात्यातले पेच आणि स्वार्थ यांतलं अद्वैत बापजाद्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असलेल्या एका तरुण जोडप्याच्या वर्तनातून दिसून येतं. सुषमा देशपांडे यांनी लिखाणात सुधीर पटवर्धनांच्या ‘चित्रां’तली ‘गोष्ट’ अचूक पकडली आहेच; पण प्रत्यक्ष सादरीकरणातही त्यांनी ही ‘चित्रं’ तितकीच विलक्षण बोलकी केली आहेत. प्रत्येक प्रसंगात त्यातल्या माणसांची बोली, देहबोली, त्यांचे व्यवहार आणि त्यांची अभिव्यक्ती त्यांनी नेमकेपणानं टिपली आहे. चित्रांतील नाटय़पूर्ण गोष्ट उकलून दाखविण्यात त्या दोनशे टक्के यशस्वी झाल्या आहेत. मात्र, चित्रकार आणि चित्रांतली पात्रं यांच्यातील संवादात पुन्हा त्या चित्रावर वेगळं भाष्य करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. चित्राचं रंगमंचीय सादरीकरणच पुरेसं बोलकं होतं. अर्थात यातले काही प्रवेश थोडेसे लांबले आहेत. (उदा. इराणी रेस्टॉरण्ट, अभिनेत्री) ते संपादित करण्यास वाव आहे. चित्रकथीप्रमाणे सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांच्या केलेल्या वापराने एक सुंदर दृश्यात्मकताही आपसूक साधली आहे.
नेपथ्यकार विश्वास कणेकर यांनी पन्नास-साठच्या दशकांतील मुंबईतल्या कळाहीन इमारती आणि झोपडपट्टीचे कटआऊट्स, तसंच मध्यभागी विजेचा खांब या पाश्र्वभूमीवर लेव्हल्सचा वापर करून नाटय़स्थळांसाठी मुक्त अवकाश उपलब्ध करून दिला आहे. नितीन कायरकर यांनी पाश्र्वसंगीतात त्या- त्या काळाशी निगडित संगीत-तुकडे वापरून काळाचं सूचन केलं आहे. तर रवी-रसिक यांनी प्रकाशयोजनेद्वारे प्रसंगांतलं नाटय़ अधिक गहिरं केलं आहे. देवदत्त साबळे यांच्या लोअर परेल पुलाच्या पोवाडय़ात त्यांच्या आत्मानुभूतीचा प्रत्यय येतो.  या रंगाविष्काराच्या यशस्वीतेत सगळ्या कलाकारांचाही तितकाच मोठा वाटा आहे. आपापल्या वाटय़ाला आलेली भूमिका त्याच्या आत्म्यासह नीट समजून घेऊन त्यांनी साकारली आहे. तेवढं पात्रांच्या अनाठायी भाष्याचं ठिगळ न लागतं तर हा चित्ररंगाविष्कार संपूर्ण निर्दोष झाला असता.

Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…