‘आविष्कार’ नाटय़संस्थेचे एक संस्थापक अरविंद देशपांडे यांच्या स्मृत्यर्थ २६ वा नाटय़महोत्सव यंदा ३ ते १० जानेवारीदरम्यान विलेपार्ले पूर्व येथील साठय़े महाविद्यालय ऑडिटोरियममध्ये होणार आहे. श्याम मनोहर लिखित आणि दीपक राजाध्यक्ष रंगावृत्तीत आणि दिग्दर्शित ‘शंभर मी’ या आविष्कारच्या निर्मितीनेच गुरुवारी, ३ जानेवारी रोजी सायं. ७ वा. या महोत्सवाचा प्रारंभ होईल. शुक्रवार, ४ जानेवारी रोजी सायं. ७.३० वा. पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ‘चाफा’चा प्रयोग होईल. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे नाटय़रूपांतर ऋषिकेश पेटवे यांनी केले असून, दिग्दर्शन सचिन जोशी यांचे आहे. रविवार, ६ जानेवारी रोजी सायं. ७.३० वा. आविष्कार निर्मित, विजय तेंडुलकर लिखित आणि विश्वास सोहोनी दिग्दर्शित ‘मधल्या भिंती’चा प्रयोग होईल. तर सोमवार, ७ जानेवारीला सायं. ७.३० वा. नाटय़शाला, मुंबई निर्मित ‘मंकू माकडे’ हे बालनाटय़ पेश होईल. त्याचे लेखन डॉ. विजया वाड यांचे असून, दिग्दर्शन व संगीत संदीप कश्यप यांचे आहे. मंगळवार, ८ जानेवारी रोजी सायं. ७.३० वा. आविष्कार निर्मित, अरुण नाईक लिखित आणि नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘दान्तॉं’चा प्रयोग होईल. तर बुधवार, ९ जानेवारीला सायं. ७.३० वा. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली निर्मित ‘अभिजात जंतू’ हे नाटक सादर होईल. लेखन प्रेमानंद गज्वी यांचे असून, दिग्दर्शन रघुनाथ कदम यांचे आहे. या महोत्सवाचा समारोप गुरुवार, १० जानेवारी रोजी सायं. ७.३० वा. सांख्य, मुंबई निर्मित ‘फ्रॅग्रन्सेस’ या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता व कथेवरील रंगनृत्याविष्काराने होईल. वैभव आरेकर दिग्दर्शित या प्रयोगाचे नृत्य-दिग्दर्शन संजुक्ता वाघ आणि वैभव आरेकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्याधर गोखले नाटय़महोत्सव
रंगशारदा महोत्सव योजनेंतर्गत १६ वा विद्याधर गोखले नाटय़महोत्सव शुक्रवार, ४ जानेवारी ते रविवार, ६ जानेवारीदरम्यान माटुंग्याच्या यशवंत नाटय़संकुलात होणार आहे. नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात शुक्रवारी, ४ जानेवारी रोजी दु. ४ वा. सुयोग निर्मित, सुरेश खरे लिखित आणि विक्रम गोखले दिग्दर्शित व अभिनित ‘सरगम’ हे नाटक सादर होईल. शनिवारी, ५ जानेवारीला दु. ३.३० वा. पुण्याच्या भरत नाटय़ संशोधन मंदिर निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित आणि रवींद्र खरे दिग्दर्शित ‘संगीत ययाति आणि देवयानी’ (प्र. भूमिका- रवींद्र खरे, संजीव मेहेंदळे आणि अस्मिता चिंचाळकर) हे नाटक होईल. तर रविवारी, ६ जानेवारी रोजी दु. ३.३० वा. मराठी रंगभूमी निर्मित, काकासाहेब खाडिलकर लिखित ‘संगीत स्वयंवर’ (प्र. भूमिका- कीर्ती शिलेदार, ज्ञानेश पेंढारकर आणि अरविंद पिळगावकर) या नाटकाने या महोत्सवाचा समारोप होईल.

शेक्सपीअरच्या नाटकांचे शिबीर
अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या बोरीवली शाखेतर्फे प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर येथे शेक्सपीअरच्या ‘अ‍ॅज यू लाइक इट’ आणि ‘र्मचट ऑफ व्हेनिस’ या नाटकांवर आधारित नाटय़शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयसीएससी बोर्डाचे आठवी ते दहावीचे विद्यार्थी आणि बी. ए.- एम. ए. (इंग्रजी साहित्य) च्या विद्यार्थ्यांना हे शिबीर विशेष लाभदायक ठरू शकेल. इतर नाटय़-अभ्यासकांनाही हे शिबीर खुले आहे. वर्षभर चालणाऱ्या या शिबिरात हिंदी, मराठी, गुजराती नाटकेदेखील समाविष्ट केली जातील. शेक्सपीअरन नाटकांची भाषा व उच्चार समजावून देण्यासाठी ब्रिटिश शिक्षक असतील. संपूर्ण शिबिराचे संचालन आशा सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. हे शिबीर जानेवारीपासून सुरू होणार आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क- अ. भा. मराठी नाटय़ परिषद- बोरीवली शाखा, दूरध्वनी- ६५७२८३२० (सायं. ७ ते ९), आशा सारंग- मोबाइल क्र.- ९२२६१०९८२४.  

आदिवासी मुलांचे नाटय़गीतगायन
‘शुभश्री’ संस्थेच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठानतर्फे सोमवार, ७ जानेवारी रोजी सायं. ६ वा. यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे आदिवासी पाडय़ांतील ३० बालकलाकार ‘अगाध किती तव करणी’ या शीर्षकांतर्गत कोरस नाटय़गीतगायन सादर करणार आहेत. तर उत्तरार्धात प्रतिष्ठानचे आजी-माजी युवा कलाकार ‘पंडितराज ते बावनखणी’ हा रंगभूषा, वेशभूषा आणि नाटय़प्रवेशांसहित नाटय़संगीताचा कार्यक्रम पेश करतील. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.       

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natyavartaarvind deshpane memorial drama festival