मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने खारदांडा येथे ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत नाटय़ोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसांच्या या नाटय़ोत्सवात नृत्य, नाटय़, व्याख्यान,, अभिवाचन, कथा व कविता सादरीकरण असे विविधरंगी कार्यक्रम होणार आहेत. दररोज सायंकाळी खारदांडा येथे होणार असलेले हे कार्यक्रम नाटय़वेडय़ा तरुणाईसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरणार आहेत. ‘हाईव्ह’ अशी याची ओळख तयार झाली आहे.
नाटय़ोत्सवाची सुरुवात प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना धनश्री खंडकर यांच्या नृत्य सादरीकरणाने होणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांचे व्याख्यान होणार असून समकालिन रंगभूमीविषयी ते आपली निरिक्षणे मांडणार आहेत. रात्री ८.३० ते १० या ेवळेत तरुण नाटककार स्वप्नील चव्हाण त्याच्या नव्या नाटकाचे अभिवाचन करणार आहे.
६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत नाटककार ओंकार भाटकर त्यांच्या नव्या नाटकाचे अभिवाचन करणार आहेत. रात्री ८ ते १०.३० या वेळेत संदीप पाठक यांचा ‘वऱ्हाड निघालाय लंडनला’ हा एकपात्री प्रयोग होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत नव्या रंगकर्मींचा मुक्त अविष्कार सादर होणार असून त्यानंतरच्या सत्रात कथा, कविता यांच्या सादरीकरणाचा ‘अंतर्नाद’ हा कार्यक्रम होणार आहे.
नाटय़ोत्सवाची सांगता ८ नोव्हेंबर रोजी होणार असून दिग्दर्शक रवींद्र लाखे व अभिनेत्री प्रिया जामकर हे कमल देसाई यांच्या कथांवर आधारित ‘रंग कमळ’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तरुण रंगकर्मींसाठी ‘खुला रंगमंच’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून या रंगमंचावर युवा रंगकर्मी आपला अविष्कार सादर करू शकतील. हा उपक्रम चारही दिवस सुरु राहणार आहे.