हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रवींद्र पाथरे
करोनाकाळानंतर मनोरंजनपर विनोदी नाटकांची एक लाट सध्या मराठी रंगभूमीवर आलेली दिसते. दोन वर्षांच्या त्या काळोख्या कालखंडानंतर पुनश्च आभाळ निरभ्र होत असताना असं होणं स्वाभाविकच म्हणता येईल. या लाटेतलंच एक नवं नाटक आहे- ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ निर्मित ‘खरं खरं सांग..’! फ्लॉरियन झेलरच्या ‘द ट्रथ’वर आधारित नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित हे नाटक म्हणजे अक्षरश: एक ‘अशक्य धूमशान’ आहे. क्षणोक्षणी लोटपोट हशांनी प्रेक्षक गडाबडा लोळायचाच तेवढा बाकी उरेल असं हे नाटक. बऱ्याच वर्षांपूर्वी आलेल्या ‘आम्ही आलो रे..’ (कलाकार : संजय नार्वेकर आणि विजय कदम) या हृषिकेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित नाटकानंतर असं हे ‘भीषण सुंदर’ (बंगाली भाषेत!) करमणूक करणारं नाटक रंगमंचावर आलं आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. अर्थात नाटकाच्या कथानकात नवं काही नाहीए (नेहमीचा प्रेमाचा त्रिकोण-चौकोनच आहे!), परंतु तरीही तुम्ही त्यात गुंगून, गुंतून जाता.
अंकुर हा इब्लिस इसम आपल्या लग्नाला २० वर्षे झालेली असतानादेखील आपल्या सख्ख्या मित्राच्या (रजतच्या) बायकोच्या (इरा) प्रेमात पडतो. साहजिकच या चोरीछुपके अफेअरमध्ये लपवाछपवी असतेच. कधी इराला तिच्या क्लीनिकमधून वेळ मिळाला की, तर कधी अंकुरला सवड मिळाली की ते एकांतात हॉटेलमध्ये भेटत असतात. गेले सहा महिने अशा लपूनछपून झालेल्या भेटीगाठींतून इराचं समाधान होत नाही. अंकुरसोबत आपण एखाद्या वीकएन्डला कुठंतरी बाहेर जाऊन एकमेकांच्या सहवासात पूर्ण वेळ घालवायला हवा असं तिच्या मनानं घेतलेलं असतं. पण अंकुरला ही असली भानगड नकोच असते. ‘चाललंय हे ठीकच चाललंय की. हे कसं तासाभरात निपटता येतं. कुणाला याचा अतापता लागण्याची शक्यता नाही. दोन दिवस बाहेर जायचं तर बऱ्याच खटपटी लटपटी कराव्या लागणार. पण मुळात त्याची गरजच काय?’ असं त्याचं म्हणणं. पण इराला ते मान्य नाही. ती अगदी इरेलाच पेटल्यामुळे अंकुरला तिला नाही म्हणणं अशक्य होतं. तो येत्या वीकएन्डला आपण कुठंतरी जाऊ म्हणून तिला आश्वासन देतो. ऊर्मिलाला (बायकोला) बिझनेस मीटिंगसाठी आपण दोन दिवस बाहेरगावी जात असल्याचं सांगून तो लोणावळ्याला ठरलेल्या हॉटेलात येतो. इराही रजतला आपण विरारला आत्येला भेटायला जात असल्याचं सांगून तिथे येते. आपला हा प्लॅन ‘फूलप्रूफ’ आहे असं दोघांनाही वाटत असतानाच इराला रजतचा फोन येतो. आत्येची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी तो तिच्याशी बोलायची इच्छा व्यक्त करतो. आता आली का पंचाईत! इरा त्याला थातुरमातूर कारणं सांगून हा अनवस्था प्रसंग टाळू पाहते. पण त्याला आत्येशी थोडं तरी बोलायचंच असतं. ‘आत्ये झोपली असल्यानं तिच्याशी बोलता येणार नाही,’ वगैरे ती सांगून बघते. पण तरीही तो हट्टाला पेटल्यानं आणि तिचा खोटं बोलण्याचा आत्मविश्वास हळूहळू ढासळू लागल्यानं शेवटी तिला या संकटातून वाचवण्यासाठी अंकुरलाच आत्येची ‘भूमिका’ निभावावी लागते.
मात्र या प्रसंगानं इराचा किल्ला ढासळतो. सतत भीती, चोरटेपणाच्या सावटाखाली राहण्यापेक्षा ती रजतला एकदाच काय ते खरं खरं सांगून टाकून होणाऱ्या परिणामांना सामोरं जायचं ठरवते. अंकुर तिला वेडय़ात काढतो. आपल्या जीवश्चकंठश्च मित्राला आपलं त्याच्या बायकोशी अफेअर असल्याचं कळलं तर त्याची काय अवस्था होईल याची अंकुरला जास्त काळजी वाटते. त्यापेक्षा रजतच्या भल्यासाठीच (!) त्याला आपल्या अफेअरबद्दल न कळणंच कसं नैतिकदृष्टय़ा योग्य ठरेल, हे तो इराला समजावू पाहतो. पण इराला आता हे असं चोरीछुपके अंकुरला भेटणं नकोसं झालेलं असतं. किंबहुना, या नात्यातली गंमतच त्यामुळे किरकिरी होत असल्याची तिची भावना असते. अर्थात या ‘प्रकरणा’चं पुढे काय होतं, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच इष्ट ठरेल. कारण तीच तर ‘खरी’ गंमत आहे!
लेखक नीरज शिरवईकर यांनी हा रूपांतरित ‘हाय होल्टेज ड्रामा’ इतका मस्त फुलवलाय, की ज्याचं नाव ते! डोळे मिटून दूध पिणाऱ्याला जसं आपल्याला कुणीच पाहत नाही असं वाटत असतं, तसंच अंकुरलाही वाटत असतं. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असू शकते, ही बाब त्याने लक्षातच घेतलेली नसते. बायकोपासून आपलं हे ‘अफेअर’ लपवून ठेवण्याच्या भानगडीत तो आणखी आणखीनच खोल गर्तेत कोसळत जातो. पण त्याच्यातला लफंडू रोमिओ प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढताना ज्या क्लृप्त्या योजतो, ज्या सराईतपणे थापा मारतो, आणि वर त्या थापांचं समर्थन करताना त्याची जी त्रेधातिरपीट उडते, त्याचं भयंकर हास्यस्फोटक रूप म्हणजे ‘खरं खरं सांग..’ हे नाटक. लेखकानं नाटकाचं स्वरूप निश्चित करताना ‘द्विपात्री प्रवेश’ असा रचनाबंध योजला आहे; ज्यामुळे नाटकाची रचना एपिसोडिक पद्धतीनं झाली आहे आणि त्यातलं ‘नाटय़’ अधिकाधिक टोकदार होत गेलं आहे. अंकुर हे मध्यवर्ती पात्र योजून त्याच्या थापेबाजीनं निर्माण होणारे गोंधळ, गुंते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने केलेली नवनवी थापेबाजी आणि त्यातून त्याचं आणखीनच उघडं पडणं.. मग त्या संकटांतून बाहेर पडण्याकरता त्याने योजलेल्या हिकमती, नाटकी अभिनय.. वगैरे वगैरे. म्हणजे एका माणसाच्या नाना कारनाम्यांतून हे नाटक ‘घडत’ जातं. त्यातून त्याची होत जाणारी अवनती हाच या हास्यस्फोटक नाटकाचा दारूगोळा आहे. बरं, हे सगळं त्याच्याच बाबतीत घडतंय/ घडलंय असं त्याला वाटत असतानाच एक वेगळंच धक्कादायक ‘सत्य’ त्याला कळतं. आणि मग आपलं जे अफेअर त्याला त्याच्या दृष्टीनं ‘नैतिक’ वगैरे वाटत असतं, तेच दुसऱ्यानं केल्यावर मात्र ते ‘अनैतिक’ असल्याचा साक्षात्कार त्याला होतो. आणि हीच या नाटकातली खरी गंमत आहे. प्रेक्षक या वेगवान प्रवाहात वाहवत जात असताना त्यांनाही हा प्रचंड ‘धक्का’ हादरवून सोडतो. (चाणाक्ष प्रेक्षकांनी तो अगोदरच अपेक्षिलेला असतो!) प्रेक्षकांच्या मनातल्या तथाकथित नैतिकतेला त्यामुळे तडा जातो. लेखकाने नाटकातल्या प्रत्येक पात्राचं वेगळेपण त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीतून, परस्परांशी होणाऱ्या संवाद, विसंवाद आणि असंवादातून आकारलं आहे. त्यांच्यातल्या क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रिया यांतला विनोद छान बुद्धिगम्य आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी मन आणि मेंदूलाही आनंद देणारं नाटक पाहायला मिळाल्याचं समाधान आपल्याला मिळतं.
दिग्दर्शक विजय केंकरे यांचं दिग्दर्शकीय कौशल्य अशा नाटकांतून विशेषत्वानं खुलतं. पात्रांना त्यांचं अस्तित्व देण्यापासून ते त्यांच्यातील आंतरक्रिया आणि त्यातून उमलणारं नाटय़ या सगळ्यावर त्यांची एक विलक्षण हुकमत जाणवते. पात्रांमधील तरल व्यवहार त्यांनी नि:शब्दतेतून आणि निव्वळ मुद्राभिनयातून समूर्त केले आहेत. अंकुरच्या वाह्य़ातपणात प्रेक्षकांना एकीकडे गुंतवून ठेवत नाटकाअखेरीस ऊर्मिलाच्या अव्यक्त भावनिक आंदोळाचाही प्रत्यय ते शब्दांविना देतात. केवळ दोन पात्रांचाच प्रवेश या फॉरमॅटमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात विजय केंकरे यशस्वी झाले आहेत.
प्रदीप मुळ्ये यांनी सांकेतिक नेपथ्यातून नाटय़स्थळं अधोरेखित केली आहेत; ज्यामुळे नाटकाचा आशय अधिक गडद होतो. अजित परब यांचं शीर्षकगीत व पार्श्वसंगीत नाटकात महत्त्वाची भूमिका बजावतं. विशेषत: अंकुर संकटात आल्याक्षणी वाजणारी अॅम्बुलन्सची टय़ून हास्याचे स्फोट घडवते. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून यातल्या नाटय़ाला उठाव आणला आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि शेखर केमनाईकांची रंगभूषा पात्रांना ‘चेहरा’ देते.
सगळ्याच पात्रांनी आपापल्या मर्यादेत राहून नाटकाची रंगत वाढवली आहे. यात फक्त ‘सुटलेले’ आहेत ते अंकुर झालेले आनंद इंगळे. या इसमाला रंगमंचावर नुसतं सोडून देऊन ‘तू तुला काय वाट्टेल ते कर..’ असं सांगितलं तरी ते प्रेक्षकांचं भरपेट रंजन करू शकतात. अंकुरच्या भूमिकेत तर ते अक्षरश: रंगमंचावर बागडले आहेत. इराबरोबरच्या अफेअरमुळे अंकुर कधी स्वत:हून, तर कधी इरामुळे गोत्यात येतो. त्या, त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मग नाना शाब्दिक कसरती करत, कोलांटउडय़ा मारत आणि तर कधी भावनांचं अतिरेकी प्रदर्शन करत तो समोरच्याला गोंधळवतो आणि तेल लावलेल्या मल्लासारखं त्यातून आपण सहीसलामत सुटतो. या साऱ्या करामती आनंद इंगळे ज्या बनेलपणे आणि बनचुक्याच्या झोकात करतात, त्याने प्रेक्षागृहात हास्याचे स्फोटावर स्फोट घडत राहतात. ऊर्मिला झालेल्या ऋजुता देशमुख संयत अभिनयातून आणि टोकदार संवादफेकीतून नवऱ्याला (अंकुरला) सहजी सापळ्यात अडकवतात. त्याचे ‘धंदे’ शांतपणे त्याच्या निदर्शनास आणून देतात; ज्याने तो अधिकच गोत्यात येतो आणि शेवटी आपला गुन्हा आपल्याच तोंडाने कबूल करतो. पण ऊर्मिला स्वत: ‘सीतासावित्री’च्या भूमिकेतून जराही ढळत नाही. नवऱ्याला फसवून त्याच्याच मित्राबरोबर अफेअर करणारी आणि त्यापायी नैतिकतेची बोच लागलेली इरा- सुलेखा तळवलकर यांनी सूक्ष्म तपशिलांनिशी साकारली आहे. विशेषत: अंकुरच्या भावनाशून्यतेचा प्रत्यय आल्यावर त्याच्यापासून अंतर राखण्याचा निर्णय ती घेते आणि नवऱ्याला खरं खरं काय ते सांगून टाकते. राहुल मेहेंदळे यांनी शांत डोक्याचा रजत कमालीच्या ‘सुपर कूलनेस’सह नेमकेपणानं उभा केला आहे. पात्रांची हीच परस्परविरोधी स्वभाववैशिष्टय़ं नाटकाची खुमारी आणखीन वाढवतात आणि एक ‘धूमशान’ रंगभूमीवर आकारत जातं..