झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सध्या कर्णिक कुटुंबाच्या घरी मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. नुकतंच लालबागच्या राजाच्या दरबारात या मालिकेचे शूटींग पार पडलं. या मालिकेच्या टीमनं प्रत्यक्ष लालबागच्या राज्याच्या दरबारात जाऊन लाखोंच्या गर्दीत मालिकेच्या भागाचे चित्रीकरण केले आहे. या मालिकेच्या लेखकाने हा अनुभव कसा होता याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लालबागचा राजा म्हटलं की डोळ्यासमोर भक्तांच्या लांबच लांब रांगा उभ्या राहतात. त्यात या गर्दीत शूटींग करायचा अनुभव या मालिकेच्या लेखकानं सांगितला आहे. त्यासोबतच त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेचे लेखन सर्वांचा लाडका पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतरकर याने केले आहे. प्रल्हाद हा मूळचा लालबाग परळमध्ये राहणारा आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची गर्दी ही त्याच्यासाठी काही नवी नाही. पण या गर्दीतही त्यानं मालिकेचं शूटींग फार उत्तमरित्या पार पाडलं आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ प्रल्हादने शेअर केला आहे. त्याला त्याने फार सुंदर कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!

प्रल्हाद कुरतडकरची पोस्ट

“लालबागच्या राजाचा विजय असो..” ही घोषणा करत, ऐकत गिरणगावात बालपण गेलं..

एकांकिका स्पर्धा करताना प्रत्येक एकांकिका सुरू होताना हाच जयघोष आम्ही करायचो.. राजाचा आशीर्वाद कायम पाठीशी असायचा.. तोच आताही आहे.. त्यामुळेच लालबागच्या राजाच्या इथे मालिकेचं शुटींग ही गोष्ट कुणालाही सांगितल्यावर अशक्य वाटली.. अर्थातच भाविकांची राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी.. त्याची सगळ्यांना असणारी ओढ.. ह्यामुळे सगळ्यांना असं वाटून गेलं..

पण लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने झी मराठीवरील “नवा गडी नवं राज्य” ह्या मालिकेचं चित्रीकरण झालं.. त्यामागे अर्थातच सगळ्या टीमची मेहनत आहे.. झी मराठी वाहिनीने ठेवलेला विश्वास आहे.. आणि विशेष उल्लेख करावासा वाटतो तो लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा.. भाऊंनी (सुधीर साळवी) दिलेलं सहकार्य खूपच महत्वाचं होत.. त्याशिवाय हे अशक्य होतं.. शिवाय तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला कार्यक्रम आहे, आपल्या लाडक्या वाहिनीच , आपल्या आवडत्या मालिकेचं चित्रीकरण आहे.. म्हणून खूप सहकार्य केलं..

त्या गर्दीतही आपल्या माणसाची काळजी घ्यावी तशी काळजी घेतली.. हे प्रेमच आहे जे आम्हाला तुमचं मनोरंजन करण्याचं बळ देतं.. हे प्रेम बापाच्या आशीर्वादाने कायम कायम राहीलच..

नवा गडी नवं राज्य मालिकेची टीम.. झी मराठीची टिम.. आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ह्या सगळ्यांच्या मेहनतीने हे भाग चित्रित झाले आहेत.. राजाचा आशीर्वाद आहे.. आता तुम्ही हे भाग बघून “नवा गडी नवं राज्य ” ह्या मालिकेला आणि झी मराठी वाहिनीला खूप सारं प्रेम द्याल ह्याची खात्री आहे.. लोभ असावा..”लालबागच्या राजाचा विजय असो..”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा :प्राजक्ता माळीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पाहा फोटो

दरम्यान ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत सध्या धामधुमीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या गणेशोत्सवादरम्यान चिंगीला तिच्या मित्र मैत्रिणी सोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचे आहे. चिंगीसह आनंदीची देखील तशीच इच्छा आहे. राघव या दोघींची इच्छा पूर्ण करण्यासाठी लालबाग राजाच्या दर्शनाला घेऊन जातो, असे या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच मालिकेत लालबागच्या राजाचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. या मालिकेच्या टीमने प्रत्यक्ष लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊन लाखोंच्या गर्दीत या मालिकेचं शूटींग केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nava gadi nava rajya zee marathi serial shoot at lalbagcha raja writer pralhad kudtarkar share instagram post nrp