दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिनेश यांचा मुलगा अभिनेता गिरी दिनेशचे निधन झाले. तो ४५ वर्षांचा होता. ‘नवग्रह’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला कन्नड अभिनेता गिरी दिनेशने शुक्रवारी (७ फेब्रुवारी रोजी) सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आकस्मिक निधनाबद्दल इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत. तसेच त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहत आहेत.
गिरी दिनेशचे (Actor Giri Dinesh Passed Away) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी आल्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. गिरी दिनेश शुक्रवारी संध्याकाळी पूजा करत असताना त्याला छातीत दुखू लागलं, नंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. मनी कंट्रोलने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
गिरी दिनेशने ‘बारे नन्ना मुदिना रानी’ या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्याने २००८ मध्ये कन्नड अभिनेता दर्शनचा भाऊ दिनाकर थुगुदीपाने दिग्दर्शित केलेल्या ‘नवग्रह’ चित्रपटात शेट्टीची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याने ‘चमकैसी चिंदी उदासी’ आणि ‘वज्र’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केलं होतं. विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा अभिनेता कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होता.
‘नवग्रह’ या चित्रपटात दर्शन, थरुन सुधीर, धरम कीर्तीराज, विनोद प्रभाकर, सृजन लोकेश यांसारख्या अनेक कलाकारांनी काम केलं होतं. ७ नोव्हेंबर २००८ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला. पुन्हा प्रदर्शित झाल्यावरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.