Navina Bole ‘इश्कबाज’, ‘मिले जब हम तुम’ या टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री नवीना बोलेने दिग्दर्शक साजिद खानवर कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. नवीना म्हणाली साजिद खान हा एक दुष्ट माणूस आहे. त्याने मला घरी बोलवलं आणि कपडे उतरवण्यास सांगितलं होतं असं नवीनाने सांगितलं.

नवीना बोलेने कास्टिंग काऊचबाबत केला खुलासा

नवीना बोले या अभिनेत्रीने सुभोजित घोष यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. साजिद खानने इतर काही लोकांसह मिळून चित्रपट आणि मालिका विश्वातील महिलांची बेअब्रू केली आहे. साजिद खान या भयंकर माणसाचा मी अनुभव घेतला आहे असं नवीनाने सांगितलं.

नवीना बोलेने साजिद खानवर काय आरोप केले?

“माझ्या आयुष्यात सर्वात भयंकर अनुभव मी साजिद खान या माणसाकडून घेतला आहे. साजिद खानला आयुष्यात मी पुन्हा कधीही भेटणार नाही. तो फक्त महिलांची बेअब्रू करतो आणि त्यांनी आवाज उठवला की एक पाकीट त्यांना देतो, त्यांचा अनादार करतो. साजिद खान हे बेबीसाठी कास्टिंग करत होता. त्यावेळी मी खरंच खूप उत्सुक होते. मी त्याच उत्साहात त्याला भेटायला गेले. तेव्हा साजिद खान मला म्हणाला जा तुझे सगळे कपडे काढ आणि अंतर्वस्त्रांमध्ये इथे येऊन बस. मला बघायचं आहे की तू कम्फर्टेबल आहेस? २००४ ते २००६ या कालावधीतली ही बाब आहे. मला ते आठवून अजूनही अंगावर काटा येतो.” असं नवीना बोलेने सांगितलं.

साजिद मला विचारत होता तुला बिकीनी घालून बसायला काय प्रॉब्लेम आहे?

मला तो म्हणत होता की तुला बिकिनीमध्ये माझ्या शेजारी बसायला काय प्रश्न आहे? मी त्याला सांगितलं की जर मला बिकीनी परिधान करायची असेल तर मी चित्रपटात तसा प्रसंग देईन. पण इथे तुझ्या शेजारी बसून मी कपडे काढणार नाही. मी कशीबशी तिथून सुटले. त्यानंतर त्याने मला किमान ५० वेळा तरी फोन केला. मला विचारायचा की तू कुठे आहेस? इथे का येत नाहीस वगैरे. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

वर्षभराने साजिदचा मला पुन्हा फोन आला होता-नवीना बोले

नवीना पुढे म्हणाली, हे सगळं घडल्यानंतर साधारण वर्षभराने मला साजिदने फोन केला. मला म्हणाला तू रोलसाठी माझ्याकडे आली होतीस. सध्या काय करते आहेस? तूला एखादी भूमिका हवी असेल तर मला येऊन भेट. हे सगळं तो मला पुन्हा निर्ल्लजपणे सांगत होता. वर्षभरापूर्वी तो काय वागला आहे हे त्याच्या लक्षातही नसेल. २०१८ मध्ये साजिद खानवर MeToo चेही आरोप झाले होते. त्यावेळी इतर काही अभिनेत्रींनीही त्याच्यावर आरोप केले होते. मात्र नंतर त्याला या प्रकरणी क्लिन चिट मिळाली होती.