पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाठराखण करणारे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेता नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांची ‘द कपिल शर्मा शो’ मधून गच्छंती करण्यात आली होती. आता ते ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू आहे.
कपिलनं नुकतीच एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी कपिलला सिद्धू शोमध्ये परतणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे कपिल सिद्धूंच्या वापसीबद्दल सकारात्मक दिसला . सिद्धू सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये व्यग्र आहेत, त्यामुळे ते शोमध्ये परतणार नाहीत मात्र निवडणुकांनंतर ते शोमध्ये येतील’ असं कपिल म्हणाला.
पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रियेत त्यांनी एकप्रकारे पाकिस्तानची पाठराखण केली. सिद्धू यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांनी त्यांना शोमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर त्यांची ‘द कपिल शर्मा’ शोमधून गच्छंती करण्यात आली होती.
सलमान खान हा ‘कपिल शर्मा शो’चा निर्माता आहे. सिद्धू यांच्यावर असलेला प्रेक्षकांचा राग लक्षात घेऊन वाहिनी आणि सलमान खान याने सिद्धूनां शोपासून दूर ठेवले होते. मात्र आता त्यांना परत आणण्याची वेळ आली आहे असे संकेतच कपिलनं दिले आहेत.