Navra Maza Navsacha 2 Bharud Viral: सचिन पिळगांवकर दिग्दर्शित आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, निर्मिती सावंत, वैभव मांगले अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात भारूड प्रकारातील एक गाणं आहे, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारूड प्रकाराने कित्येक वर्ष महाराष्ट्राचं प्रबोधन केलं. या गाण्यातूनही आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल भाष्य करत नेते, पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चिमटे काढले गेले आहेत. विशेष म्हणजे ‘५० खोके, एकदम ओके’ असं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलं होतं. या गाण्यातही ५० खोक्याचा उल्लेख येतो. ज्यावरून जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवनं एका राजकीय नेत्याची भूमिका चित्रपटात साकारली असून तो हे भारूड गाताना दिसतो. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ जाधव श्री गणरायाला ५० खोक्यांचा मुकूट घालण्याची भाषा वापरतो.
काय आहे भारूडात?
अभिनेता सिद्धार्थ जाधव गणपती बाप्पाला ट्रेनमधून घेऊन जाताना दिसतो. त्याच्याबरोबर कार्यकर्ते आहेत. “देवा जर का तू मला पावला, सत्ताधारी, खासदारी लाभली मला, मुकूट घालीन ५० खोक्यांचा तुला..”, असा नवस सिद्धार्थ जाधव करतो. यानंतर स्वप्निल जोशी प्रश्न विचारतो की, हे नवस बोलतायत की लाच देत आहेत? यावर टीसीचे पात्र साकारणारे अशोक सराफ म्हणतात, जगात जसं चालतं, तसंच साहेब बोलतात.
“जनतेचं भलं कराया…”, असं सिद्धार्थ जाधव म्हणताच. सचिन पिळगांवकर जनता म्हणजे साहेबांची पत्नी, मुलं, सासू-सासरे, मेव्हणा, मेव्हणी असल्याचं सांगतात. तर अशोक सराफ विचारतात की, कार्यकर्त्यांचं भलं कोण करणार? कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणार, असं उत्तर पिळगांवकर देतात. त्यावर जयवंत वाडकर मध्येच उडी घेऊन म्हणतात की, साहेबांच्या सतरंज्या उचलणं आम्हा कार्यकर्त्यांचं भाग्य आहे.
सचिन “पिळगावकर आणि स्वप्नील “जोशी” असल्यामुळे नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट फ्लॉप असणार,पांचट असणार अशा प्रकारचा नरेटिव्ह पसरवायला काही लोकांनी सुरवात केली…
— R.R.Mhatre (@MhatreFrmAlibag) September 21, 2024
पण यात एक भारूड आहे,ज्यात ५० खोके,पक्ष फोडणे असा उल्लेख आहे,
त्यामुळे आता ती लोकंही तो चित्रपट पाहायला जाऊ शकतात. pic.twitter.com/w3bS4Eigdf
भारूडाच्या प्रकारात ज्याप्रकारे संवाद आणि गाण्याच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर मार्मिक टिप्पणी करण्यात येत असते, त्याचप्रकारे या भारूडातही राजकारणाच्या सद्यस्थितीवर नेमकं भाष्य करण्यात आलं आहे.
दरम्यान शुक्रवारी, २० सप्टेंबरला ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ होता. याच दिवशी ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रदर्शित झाला. ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ असल्याने प्रेक्षकांना कोणताही सिनेमा फक्त ९९ रुपयांत पाहण्याची संधी होती. या ऑफरचा फायदा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ला देखील मिळाला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळालं. ‘नवरा माझा नवसाचा २’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
‘नवरा माझा नवसाचा २’ चे कलेक्शन
नवा नवस अन् एसटीऐवजी रेल्वेचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृत आकडेवारी शेअर केलेली नाही. पण मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. परिणामी चित्रपटाने चांगली ओपनिंग केली आहे.