‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपट मालिकेतील फैजल खान या भूमिकेने लोकप्रिय झाला असला तरी नवाझुद्दिन सिद्दिकी १९९९ साली ‘सरफरोश’ आणि ‘शूल’ या चित्रपटांतील छोटय़ाशा भूमिकांमधून बॉलीवूडमध्ये आला हे खूप जणांना माहीत नसेल. कमी उंची, चेहऱ्यावर आम आदमीचे भाव असे दिसणारा हा कलावंत रुपेरी पडद्यावरच्या प्रत्येक भूमिकेतून आपले अस्तित्व  दाखवून देतो. आता ‘स्टार’पदी पोहोचत असलेला नवाझुद्दिन सिद्दिकी प्रथमच बॉलीवूडच्या दोन खानांबरोबर चित्रपटातून झळकणार आहे. हे दोन खान आहेत सलमान खान आणि शाहरूख खान. ‘बदलापूर’ या नुकत्याच गाजलेल्या चित्रपटातील लायक या भूमिकेमुळे नवाझुद्दिन सिद्दिकी सध्या लोकप्रियतेच्या शिगेला पोहोचला आहे.
आजच्या बॉलीवूड सिनेमामध्ये व्यक्तिरेखा हीच ‘हिरो’ असते असे विधान अलीकडेच नवाझुद्दिन सिद्दिकीने केले होते. त्यामुळेच त्याच्या आगामी चित्रपटांतील भूमिकांविषयी प्रेक्षकांमध्ये निश्चितच कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु, आतापर्यंत अनेक बडे चित्रपट नवाझुद्दिन सिद्दिकीने केले असले तरी प्रथमच तो दोन बडय़ा खानांबरोबर रुपेरी पडद्यावर झळकणार असल्यामुळे खानांपेक्षाही आता तो कोणत्या भूमिकेत भाव खाऊन जाणार याविषयी बॉलीवूडमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘तलाश’ चित्रपटातील तैमूर, ‘ब्लॅक फ्रायडे’मधील असगर मुकादम, ‘पीपली लाईव्ह’मधील राकेश कपूर, ‘कहानी’मधील आयबी ऑफिसर ए. खान, ‘बॉम्बे टॉकीज’मधील पुरंदर अशा असंख्य व्यक्तिरेखा नवाझुद्दिन सिद्दिकीने पडद्यावर जिवंत केल्या आहेत. ‘लंचबॉक्स’मधील शेख या भूमिकेद्वारेही त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.
सलमान खानच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’ या जुलैमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात नवाझुद्दिन सिद्दिकी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून त्यानंतर २०१६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही खान म्हणजे प्रेक्षकांची निव्वळ करमणूक करणारे नायक अशी त्यांची प्रेक्षकांमध्ये प्रतिमा आहे. दोन्ही खानांच्या चित्रपटांत सर्वसाधारणपणे नायिकेसह अन्य व्यक्तिरेखांचाही फारसा पडद्यावर वावर पाहायला मिळत नाही. त्यामुळेच खानांच्या या गल्लाभरू चित्रपटांमध्ये नवाझुद्दिन सिद्दिकीचे काम काय, असा प्रश्न पडू शकतो. परंतु, आपल्याला दिलेली कोणतीही भूमिका आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या नजरेत भरविण्याची किमया करणारा हा कलावंत आहे एवढे नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा