‘कानामागून आला आणि तिखट झाला’, असं कित्येकदा आपण उपरोधिकपणे म्हणत असतो. बॉलिवूडला मात्र सध्या अशा कानामागून येऊन तिखट झालेल्या लोकांचे प्रचंड कौतूक वाटते आहे. इरफान खान, नवाझुद्दीन सिद्दीकी, निम्रत कौर अशी काही मोजकी नावं आहेत कलाकारांच्या यादीतली. जे आले तेव्हा फार छोटय़ा भूमिकांमध्ये होते, मात्र अल्पावधीतच बॉलिवूडच्या तथाकथित ‘स्टार’पणाच्या साच्यातले कुठलेही गुण नसताना त्यांनी आपल्या अस्तित्वाची स्वतंत्र दखल इंडस्ट्रीला घ्यायला लावली आहे. फेब्रुवारीत प्रदर्शित झालेल्या ‘बदलापूर’ चित्रपटात वरुण धवनला पडद्यावर आणि प्रत्यक्षातही खलनायकाच्या भूमिकेत राहून मात देणाऱ्या नवाझुद्दीन सिद्दीकीला या यशाबद्दल विचारलं तर तो थेट सांगतो की प्रेक्षकांच्या मनावर ‘हिरो’ राज्य करत नाहीत. दिग्दर्शकांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या मनाशी खेळतात, त्यांना जिंकतात. पडद्यावर या व्यक्तिरेखा जिवंत करून तुम्हाला प्रेक्षकांच्या मनात शिरता आलं पाहिजे..
नवाझुद्दीन सिद्दीकी.. चेहऱ्याने अगदी साधा दिसणारा, उत्तर प्रदेशच्या छोटय़ा शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेला ‘नवाझ’ (त्याचे इंडस्ट्रीतील नाव) विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्याने अभिनयाचे धडे गिरवलेत. तरी त्याची सुरुवात चटकन आठवणारी नाही. अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये, आमिरच्या ‘पीपली लाईव्ह’मध्ये.. तो नीट लक्षात आला तो सुजॉय घोषच्या ‘कहानी’मधला आयबी ऑफिरसरच्या भूमिकेत, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’चा फैझल म्हणून किंवा रीमा कागती दिग्दर्शित ‘तलाश’मधील तैमूर म्हणून.. अशी आपणच आपली उदाहरणं द्यायला लागलो की नवाझुद्दीनने सांगितलेल्या ‘व्यक्तिरेखांचं महत्त्व’ आपल्यालाही लक्षात यायला लागतं. अगदी आत्ताही ‘बदलापूर’मधला ‘लायक’ ही त्याची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे आणि तरीही नवाझुद्दीन सिद्दीकी या नावाचं पारडं इंडस्ट्रीत वेगळ्या अर्थाने जड होऊ लागलं आहे.
आतापर्यंत नवाझुद्दीन सिद्दीकीने केलेल्या व्यक्तिरेखा दमदार होत्या. मात्र, सलमान खानच्या ‘किक’मध्ये त्याने शिव गजरा हा खलनायक साकारला. सलमान समोर असतानाही नवाझचा शिव लोकांच्याच काय, खुद्द सलमानच्याही लक्षात राहिला आहे. म्हणूनच, सलमानबरोबर ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात नवाझ पुन्हा दिसणार आहे. शिवाय, शाहरूखच्या ‘रईस’मध्येही फरहान अख्तरच्याऐवजी नवाझची वर्णी लागली आहे. या दोन चित्रपटांमुळे तो चांगलाच चर्चेत आला. सलमानबरोबर मी काम केलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या तद्दन व्यावसायिक चित्रपटात त्याच्याबरोबर काम करायला मिळणार ही माझ्यासाठी कलाकार म्हणून आनंदाची गोष्ट आहे. शाहरूख खानबरोबर पहिल्यांदा काम करणार याचीही उत्सुकता आहे. पण, त्याहीपेक्षा जास्त उत्सुकता आहे ती ‘रईस’ हा राहुल ढोलकिया या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. ढोलकियांचे चित्रपट, त्याच्या व्यक्तिरेखा या अफलातून असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची जास्त उत्सुकता आहे, असं नवाझुद्दीनने सांगितलं. माझं यश हे या दिग्दर्शकांमुळे आहे. नव्या पिढीचे हे दिग्दर्शक फार वेगळा विचार करतात, वेगळ्या व्यक्तिरेखा लिहिल्या जातात. त्यामुळे चांगल्या भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या आहेत, असं तो म्हणतो. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी तो पुन्हा ‘बदलापूर’चंच उदाहरण देतो. ‘लायक तुंगारे’ या तरुणातलं स्थित्यंतर लोकांना जास्त भावतं. ‘तुम्ही चित्रपट पाहिला आहे.. ‘खलनायक’ म्हणजे नकारी प्रतिमा असणारा लायक कधी बदलतो? माझ्या वडिलांमध्ये काही चांगुलपणा होता का? असा प्रश्न लायक त्याच्या आईला विचारतो. तिचं मौन ही त्याच्या बदलाची सुरुवात असते. माझ्यासाठी हे समजून घेणं आणि लायकमधलं वाईटातून चांगल्याकडे होणारं स्थित्यंतर दाखवणं हे खूप मोठं आव्हान होतं. इथे बदल चेहऱ्यावरचा नसतो. माझ्या रंगभूषाकारांनी १५ वर्षांनंतरचा चेहऱ्यावरचा बदल दाखवण्यासाठी अप्रतिम काम केलं होतं. पण, त्याचा बदललेला आत्मा लोकांपर्यंत पोहोचवणं हे सोपं नव्हतं आणि हीच श्रीराम राघवनसारख्या दिग्दर्शकांची ताकद आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो.’
मोठे चित्रपट केले तर त्या जोरावर इतर चांगल्या पण, छोटय़ा बजेटच्या चित्रपटांची प्रसिद्धी होते. या एकाच कारणास्तव मला व्यावसायिक चित्रपटही करायचे आहेत, म्हणून मी ‘बजरंगी भाईजान’सारखा चित्रपट करतो आहे, असं तो म्हणतो. पण, माझे आवडते चित्रपट आहेत ते म्हणजे राहुल ढोलकियाचा ‘रईस’, त्यानंतर अनुराग कश्यप आणि विकास बहल यांची निर्मिती असलेला पुष्पेंद्र मिश्रांचा ‘धूमकेतू’ हा चित्रपट टोटल विनोदी चित्रपट आहे. पुष्पेंदुने असा विषय हाताळला आहे की लोकांना पाहताना गुदगुदल्या व्हाव्यात..शिवाय, दशरथ मांझींवरचा ‘माऊंटन मॅन’ आहे. हे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला व्यावसायिक चित्रपटांचे यश महत्त्वाचे वाटते, असं तो सांगतो.
‘एनएसडी’चा विद्यार्थी असला तरी ‘मेथड’ अॅक्टर म्हणवणं नवाझला पसंत नाही. एकेक भूमिका समजून घेताना नवं काही हाती लागतं. लोकांनाही आश्चर्य वाटतं अरे, हे नवाझने कसं काय केलं? प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा जितक्या वाढतील ना तितकंच त्यांना आपल्या भूमिकांमधून आश्चर्याचा धक्का देण्याची माझी हाव वाढत जाईल. माझ्यासारख्या कलाकाराला प्रेक्षकच अशा रीतीने घडवत असतात, असे सांगणारा नवाझुद्दीन आजच्या प्रेक्षकांच्या बदलत्या वैचारिकतेचंही स्वागत करतो. तुम्ही आताच्या प्रेक्षकाला चित्रपटाच्या नावाखाली काहीही खपवू शकत नाही. त्यांच्या आवडीनिवडी या बदललेल्या आहेत, असं तो म्हणतो. मराठी चित्रपटांबद्दल त्याला विशेष कौतुक आहे. मराठी चित्रपट सध्या यशाच्या शिखरावर आहेत. खूप वेगळे मराठी चित्रपट आहेत. ‘कोर्ट’ मी आताच पाहिला. असे चित्रपट असले म्हणजे कलाकारांना मनापासून काम करावंसं वाटतं, असं तो आग्रहाने नमूद करतो.
आताच्या दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटात मुळात नायक-खलनायक अशा दोन प्रस्थापित भूमिकाच झुगारून टाकल्या आहेत. सध्या चित्रपटातून तुमच्यासमोर येणाऱ्या व्यक्तिरेखा या सामान्य माणसाचेच प्रतिबिंब असतात. त्यांच्यात चांगुलपणा असतो तसंच दोषही असतात. प्रसंगानुरूप आणि त्यांच्या मूळ स्वभावानुसार ते चांगल्या किंवा वाईट पद्धतीने व्यक्त होतात. त्यामुळे त्या सामान्य माणसाच्या रोजच्या अनुभवाशी जोडल्या जातात आणि हा हिंदी चित्रपटांच्या मांडणीत झालेला खूप मोठा स्वागतार्ह बदल आहे. व्यावसायिक चित्रपटांमधून मी भूमिका करतो. त्या लोकांना आवडत असल्या तरी मला त्यात अडकून पडायचं नाही.
नवाझुद्दीन सिद्दीकी
कानामागून आला..
‘कानामागून आला आणि तिखट झाला’, असं कित्येकदा आपण उपरोधिकपणे म्हणत असतो. बॉलिवूडला मात्र सध्या अशा कानामागून येऊन तिखट झालेल्या लोकांचे प्रचंड कौतूक वाटते आहे.
First published on: 08-03-2015 at 07:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui