नवाझउद्दीन सिद्दीकीने ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची माफी मागितल्यानंतर अखेर त्यांच्यात उसळलेल्या शाब्दिक चकमकीला विराम मिळाला. याविषयी बोलताना नवाझउद्दीन म्हणाला, ऋषी कपूर यांच्यावर टीका करण्याचा अथवा त्यांच्या विषयी बोलण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता. ते ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि मी त्यांचे चित्रपट पाहात लहानाचा मोठा झालो. माझ्या गावी त्यावेळी चित्रपटगृहे नव्हती, ऋषी कपूर यांचे ‘बॉबी’, ‘खेल खेल में’ आणि ‘कभी कभी’सारखे चित्रपट पाहाण्यासाठी मी शेकडो किलोमीटरचा प्रवास करायचो. ऋषी कपूर हे माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहेत. आपण ऋषी कपूर यांच्याबाबत कोणतेही विधान केले नसल्याचेदेखील नवाझउद्दीन म्हणाला. प्रेमाच्या दृष्याबाबतचा माझा तो सर्वसाधारण दृष्टिकोन होता. त्यांनी ते व्यक्तिगत का घेतले, हे मला माहिती नाही. त्यांना दुखविण्याचा माझा उद्देश नव्हता. ऋषी कपूर यांची माफी मागायला मला जराही संकोच वाटणार नाही, असे नवाझउद्दीन म्हणाला. आपले विधान चुकीच्यापद्धतीने सादर केल्याचे ऋषी कपूर यांनी म्हटल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, माझ्या ज्या मुलाखतीत मी नवाझउद्दीनबाबत विधान केल्याचे म्हटले आहे ती मी अद्याप वाचलेली नाही. परंतु, असे काही मी कोणत्या वार्ताहराशी बोलल्याचे मला आठवत नाही. काही अभिनेत्यांची ठराविक व्यक्तीरेखा असल्याचे या (नवाझउद्दीन) अभिनेत्याने म्हटल्याचा कोणीतरी उल्लेख केला, ज्यावर मी अतिशय नम्र प्रतिक्रिया दिली. माझी प्रतिक्रिया ज्या पद्धतीने सादर करण्यात आली, तशी ती नक्कीच नव्हती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा